ललित कला अकादमीच्या चित्र प्रदर्शनातल्या सहभागामुळे एवढ्यात रोज जेजेत जाणं होतंय.
मुक्काम मुलुंडमधे. जेजे अगदी व्हिटीजवळ (छशिमट😒). साहजिकच सुटसुटीतपणे लोकल्सनेच जा ये करत आहे.
लेडीजचा सेकंडचा डबा. कधी गर्दी असते, नसते पण रोज जाता येता बसायला जागा मिळतेच आहे. मग काय बसल्या ठिकाणी ऑबझर्वेशन सुरु आहे अस्मादिकांच.
सकाळची अकराची वेळ म्हणजे लोकलने प्रवास करणा-या मुंबईकरांसाठी जरा निवांत वेळ त्यामुळे बरेच विक्रेते हिरीरीने डब्यात फिरुन विक्री करतात. लोकलच्या डब्यात सोईने असा माल अडकवू शकणारे हॅंगर्स जवळपास सर्वच विक्रेत्यांकडे असतात. हे विक्रेते चालत्या गाडीत सटिकपणे फिरतात, हाकारे देत विक्री करतात.
या मधल्या प्रहरी हेयर पिन्स, क्लिप्स, क्लचेस, कानातले, तांब्याची दातकणं-कडी, रंगबिरंगी स्टोल्स, समोसे, केक्स असं तत्सम साहित्य विकतात. काही फळवाल्या, गजरेवाल्याही हाकारुन जातात. सहसा महिला-मुली विक्रेत्याच प्रामुख्याने महिला डब्यात फिरतात.
तर रोज एक से एक नमुने दिसताहेत. काहींना बघून महानगरीय संघर्षमय रेटा जाणवतोय तर काहींना बघून विस्मय वाटतोय.
हा एक वयस्क तृतीयपंथी. खुपसा थकलेला, आयुष्यात हरलेला. लांबसडक जटाधारी केस, साडी-ब्लाऊज, सुरकुतलेल्या व बसलेल्या निबर गालफडावर वाढलेली हिरवट-पांढरी खुंट, निब्रटलेल्या हातात एक वेताची टोपली, त्यात एक पितळी चकचकीत देव, मोरपीसात, हिरव्यागार कपड्यात सजवून-धजवून ठेवलेला. जगण्यासाठी अगदी पर्यायच नाही म्हणून कसबसा तो तृतीय पंथी असा झगमगीत देव महिलांच्या डब्यात पैशाच्या आशेने फिरवत आहे. न त्याच्या आवाहनात दम आहे न ही महिलांमधेही उत्सुकता आहे. त्याचं ते रया गेलेलं, थकलेलं आणि कावलेलं तृतीयपंथी रुप आणि डोक्यावरचा झळाळता देव जीवाला अस्वस्थच करुन गेला.
ही एक महिला म्हणजे जेमतेम विशीची बाई. तांब्याच्या फुटकळ वस्तु विकत आहे. बहुदा सहावा-सातवा महिना चालू आहे तिचा.
अक्षरशः सर्वांग टपोरंल आहे तिचं. गाल भरलेत, नाक चमकतयं, ओठ रसरसून भरलेत, हाती-पाठी-पोटी केवड्यासारखी सोनसळी चमक आलीये. बरगड्यांच्या खाली आणी टपोरलेल्या पोटामध्ये एक वळणदार ताण जाणवत आहे. आणि मुख्य म्हणजे नजरेत एक भावूक, स्वप्नाळू हरवलेपण आहे.
जगण्यासाठी, पोटासाठी, पोटातल्या बाळासाठी तिला ही मरमर करावी लागत आहे. खरंतर आयुष्याच्या या लोभसं टप्प्यावर मुलींनी आत्मरत व्हावं, झोक्यांवर पहुडावं, मोगरीचे गजरे ल्यावे, स्वप्नाळू डोळ्यात काजळ रेखावं, दाराशी रांगोळी काढावी, गाणं गुणगुणत वेणी घालावी नसता निवांतपणे पहुडत पोटातल्या बाळजीवाशी मंद श्वासांनीच संवाद साधावा, आपलाच हात पोटावरनं हळुवारपणे फिरवावा, आरश्यातल्या आपल्याच उमलत्या रुपाकडे बघून खुदकन हसावं,
पण नाही असे होणे नाही.
या जगण्याच्या, या शहरात तगण्याचा रेटाच इतका आहे की अशा मखमली संवेदना उपभोगताच येत नाहीत अशा असंख्य उमलत्या टपोरलेल्या कळ्यांना.
प्रवासाच्या अखेरीस रिकाम्या गाडीत चढलेल्या या लहान पोरी. दोघीही इतक्या लहान आहेत की त्या काय विकताहेत यापेक्षा त्यांच वय आणि त्यांना करावा लागणारा हा व्यवसाय हेच पाहून मी स्तंभित झाले. दोघीतली एक मुलगी तर जेमतेम ६-७ वर्षांची असावी. माझ्या आयुष्यातील स्वतंत्रपणे विक्री करणारी सर्वात लहान व्यक्ती म्हणजे ही मुलगी आहे. अक्षरशः जीव गलबलून गेला.
विक्री-नफा-तोटा कळण्याचं तिचं वय नक्कीच नाहिये तरीपण ती तडफेने विक्रीचे हाकारे देत आहे. दोघींचे फोटो काढायला गेले तर पहिल्यांदा लपणारी हिच मुलगी आहे. का लपली असेल ही ? बाल कामगारांचा धोका तिला माहित असेल का ? माझी भिती वाटली असेल का ? साधारण या वयातल्या मुला-मुलींना फोटोंची आवड असतेच.
मग का बरं ही मागे लपली ? कुणाच्या आहेत या मुली ? यांचे आई-बाप आहेत का ? असतील तर त्यांना या अजाण आणि अबोध मुलींच्या कामाची जाणीव आहे का ? या मुलींचं आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, स्वत:ला सांभाळून रहाणं, त्यांचं भविष्य...एक ना दोन त्यांच्या बद्दलचे मनातले प्रश्न संपायच्या आतचं माझं डेस्टिनेशन आलं आणि माझ्या आयुष्यातील माझ्या प्रश्नांच भेंडोळ घेऊन मी उतरले आणि चालू लागले.
No comments:
Post a Comment