Monday, 11 March 2019

रव्याचे आप्पे.

काल फेसबुकवर एक रेसिपी पाहिली. बारीक रव्याचे झटपट आप्पे. परवाच फ्रिज साफ केला तर फ्रिजमधे दडलेला भरपूर बारीक रवा सापडला. लगेच ती रेसिपी करुन बघायचा घाट घातला.

एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ कालवून ठेवलं. पीठ चमचावाढ होण्यासाठी जरा पाणीही घातलं. साधारण तासभर भिजवून ठेवलं. (रेसिपी नुसार अर्धा तासही चालेल)
मग त्या पीठात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व गाजर किसून घातले. थोड्या तेलातली मिरची, कढीपत्त्याची फोडणी टाकली आणि साधारण अर्धा चमचा खायचा सोडा टाकून मिश्रण एकसारखे करुन घेतले. मध्यम आचेवर तापत ठेवलेल्या आप्पेपात्रात थोडंसं तेल टाकलं, प्रत्येक वाटीत चिमुटभर मोहरी टाकली व लगेच रव्याचं मिश्रण ढवळून पात्रात टाकलं व झाकून वाफवायला ठेवलं. तीनेक मिनिटांतच आप्पे वाफवलेकी वरुन परत थोडंसं तेल लावलं व आप्पे उलटवून परत तीनेक मिनिटांसाठी वाफवून घेतले. सुरेख सगळीकडनं शिजत हे आप्पे चांगलेच गरगरीत होत टंब फुगतात. बाहेरुन क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे झटपट होणारे स्वादिष्ट आप्पे चांगलाच प्रकार आहे.
माझा पहिलाच प्रयोग असल्यामुळे चटणी वगैरे करायच्या भानगडीत मी पडले नाही.
मला व्यक्तीश: सोडा, बेकिंग पावडर, इनोसॉल्ट वा व्हिनेगर अशा जिनसा वापरुन स्वैपाक करायची सवय नाही. उलट जरा रिझर्वेशन्सच आहेत याविषयी. पण हा झटपट होणारा रुचकर आप्प्यांचा प्रकार आवडला. आता कणिक, ज्वारी पीठ, बेसन आणि रवा या कॉंबिनेशचे पण अशाच पद्धतीचे आप्पे करुन बघायचा विचार आहे.
चवीसाठी भिजलेल्या पीठात फोडणी घालणं आणि प्रत्येक आप्पेवाटीतल्या गरम तेलात तडतडणारी मोहरी बघणं फारच छान प्रकार आहे.
करुन बघा. आवडेल.

No comments:

Post a Comment