Sunday, 10 March 2019

रंगीत तालीम.

ऑस्ट्रेलियातून आल्यापासून एॅबओरिजीनल आर्ट स्टाईलमधे काम करुन बघायचं होतं. कुठलंही ज्ञान पाहून जेवढं कळतं त्यापेक्षा कितीतरी पट ज्ञान प्रॅक्टिकल करुन मिळतं. अनायसे मालती आर्ट गॅलरीच्या निमित्ताने महिला दिनाच्या दिवशी तो योग आला. परफेक्शनच्या नादापायी बरेचदा कलात्मक अविष्काराची गाडी अडून जाते, विशेषकरून कलावंतांची, त्यातही माझी जास्तच.
डोक्यात काहीतरी वेगळंच असतं, डोक्यातलं हातात उतरत नाही, चित्र काही मनासारखं होत नाही मग उगाचच चीड चीड होत मन उद्विग्न होतं. त्यामुळे यावेळी हट्टाने अॅबओरिजीनल आर्टच करायची हे ठरवलं. झटपट नेटवरनं थोड्याफार आयडियाज घेतलेल्या आणि सराव करायचाच या नेटाने मानपाठ एक करत एक छोटा बोर्ड कॅनव्हास केलाच हाता वेगळा.
अत्यंत साधं पेंटिंग आहे. तरीपण अगदीच बेसिक गोष्टींची, पण हल्लीच नजरेआड झालेली उजळणी झाली. फटाफट रेखाटन करणे, अंदाजानेच रंगसंगती डेव्हलप करणे, रेखाटनातल्या चुका रंगातनं पुसून टाकणे, रंग कालवणे, ब्रशेशना टोक काढत त्यातल्या त्यात बारीक रेषा काढायचा प्रयत्न करणे, एकसारखे रंगलेपन करणे... खरंतर या आणि अशा अनेक गोष्टी कलेच्या प्राथमिक वर्गातच शिकवल्या जातात, पण नंतर स्वतःच्या मनाप्रमाणे चित्र काढण्याच्या नादात, स्वतःच्या शैलीतच काम करण्याच्या फंदात या अशा बेसिक गोष्टींकडे नाही म्हटलं तरी काणाडोळा होतो. त्यामुळे आज हे साधारण पेंटिंग करताना काही जुन्या गोष्टी परत सरावात आल्या. अजूनही बारीक रेषांसाठी हात चालतोय यांचंही कवतिक वाटण्याबरोबरच अजून अशी दहा-बारा पेंटिंग्ज करुन पाहिल्या शिवाय काही खरं नाही हेही प्रकर्षाने जाणवलयं.
म्हणजे कॉपी तर कॉपी पण आपला हात रुळायला, आणि काही गोष्टींची समज चांगलीच पक्की व्हायला या सरावाला पर्याय नाही.

मनमर्जीकी दौड के लिये ये कदमताल जरुरी है.

No comments:

Post a Comment