महिला दिनाच्या निमित्ताने...
बहुतेक पुरुषांनी महिलांविषयी फेसबुकवर संवेदनशिलतेने लिहिलेलं असतं,
अजून काही पुरुषांनी व्हॉट्सॲपवर स्त्रियांच्या अंगभूत पण झाकोळलेल्या गुणांच मनापासून कौतुक केलेलं असतं,
दोनचार पुरुषांनी तर मेसेंजरमधून वैयक्तिकरित्या तुमच्या व्यक्तिमत्वाने भारावून जात निर्मळपणे मनोज्ञ शुभेच्छा दिल्या असतात.
महिला दिनाच्या धामधुमीनंतर या सगळ्यांना उशीरा का होईना पण सरसकटपणे फटाफट रिप्लाय देताना हातातलं गोंडस ह्रदय, आनंदाने धगधगणारं ह्रदय, हातातला उंचावलेला बदामी गुलाबी/लाल फुगा, गुलाबांसहीतचा फुलांचा गुच्छ वा एखादी झकास, गोडुली स्माईली उस्फुर्तपणे, सहजपणे देताना हात अष्टावधानाने थबकतोच.
का होतं हे असं ?
एक निखळ प्रतिसाद देतानाही आपला सिक्स्थ सेंस का बरं आपल्याला सावध करतो ?
मनात विचार येतो, उगाचच काहीबाही अर्थ तर काढणार नाही ना समोरचा ? आपण आपलं निर्हेतूकपणे सोपा पण झटपट असा चित्रमय-स्टिकरी रिप्लाय द्यावा आणि तिकडून मात्र शिमगा झाला, आता कवित्व पत्करासारखा प्रतिसाद मिळाला, मिळत राहिला तर काय ? उगाच आपलं आ बैल मुझे मार सारखं होणार. नकोच ते.
ठोका नुसते थंब्स अप्.
जिथे बहुतांश सुशिक्षित, सुसंस्कृत महिलांना असे चित्त हरण करणारे प्रश्न अजूनही पडतात,
पडावेत अशी परिस्थिती आहे, तिथे काय बोडख्याचा महिला दिन साजरा केला-करणार आपण ?
No comments:
Post a Comment