Friday, 1 March 2019

अंगतपंगत. ढकल लिंबू.

इथलीच ढकल लिंबाची पोस्ट बघून-वाचून मी पण तसचं लिंबाचं लोणचं करुन पाहिलं. छानच झालंय. तरीपण लिंब, मीठ आणि ओवा यांचा अंदाज जरा चुकलाय असं मला वाटतंय. मीठ आणि ओवा जरा जास्त झालयं, त्यामुळे जास्त चटपटीत लागतंय हे ढकल लिंबू. लोणचं म्हणण्यापेक्षा याला काहीतरी वेगळं नाव हवंय. तोंडाला रुची आणण्याचं काम हे ढकल लिंबू इमानेइतबारे करतंय हे निश्चित. त्यामुळे याला ढकल लिंबाचं औषधी व रुचकर चाटवण म्हणायला हरकत नाही.

ढकल लिंबू करायची पध्दत.
पावकिलो लिंब धुवून-स्वच्छ करुन एका काचेच्या कोरड्या बरणीत भरावीत. दर दोनेक लिंबानंतर अंदाजाने मीठ आणि ओवा वरुन भुरभुरावा. लिंब जरा ठासूनच भरता येतील अशाच साईजची बरणी घ्यावी. बरणीच्या तळाशी आणि मुखाशी मीठ - ओवा राहिलं असं बघावं. बरणीचं झाकणं गच्च लावून दिवसभरातलं जास्तीतजास्त ऊन जिथे येईल तिथे ही बरणी ठेवावी. साधारण चार महिने. (मलाही आता दोन का चार महिने आठवत नाहीये) ऊन्हाच्या उष्णतेनी मीठ विरघळतं, लिंब मऊ पडतात आणि त्या मीठ ओव्याच्या पाण्यात झक्क पैकी मुरतात. अर्थात या प्रोसेसमधे लिंबाचा रंग जातो पण चव मात्र लयीच भारी होते. करुन बघा. आपल्याकडे माठात अशा पध्दतीने लिंब मुरवायची पध्दत आहे म्हणे. मी हा प्रकार पहिल्यांदाच केला आणि चाखला पण.
सुरेखच जमलाय.
आपल्या भारतासारख्या उष्ण हवामान असणा-या देशाची खास खासियती रेसिपी आहे ही.

No comments:

Post a Comment