यंदा मुंबईत गेल्यावर फक्त कालाघोडा फेस्टिवल बघायचं ठरवलं होतं. जरा कौटुंबिक कार्यक्रम पण होते. त्यामुळे वेळ कमी होता. तरी पोहंचल्याच्या दिवशीच कालाघोडा फेस्टिवल पाहून घेतला. प्रचंड गर्दी. हौशे, नवशे, गवश्यांची. त्याच दिवशी एनजीएमए (NGMA) मधे सुप्रसिद्ध चित्रकार श्री प्रभाकर बर्वेंच्या रेट्रोस्पेकटिव्ह चित्र प्रदर्शनाचं उदघाटन होतं. प्रदर्शन बघायचं तर होतं पण वेळच नव्हता. पण समहाऊ रविवारी परत हे प्रदर्शन आणि कालाघोडा असा बेत ठरला.
मी आणि माझी औरंगाबादची मैत्रीण अशा दोघी लवकरच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या वास्तूत पोहोंचलो. तोपर्यंत मला उद्घाटनप्रसंगी झालेला गदारोळ माहितच नव्हता. प्रभाकर बर्व्यांविषयी देखील चित्रकलेच्या दृष्टीने फार सखोल माहीत होतं असंही नाही. पण त्यांचं सुलभ भाषेतलं आणि समजेल अशा रितीने चित्रकलेवरती लिहिलेलं पुस्तक 'कोरा कॅनव्हास' हे माझं आवडीचं पुस्तक आहे. आता आवडीचं आहे म्हणून संपूर्ण वाचलंय का ?
तर नाही.
या पुस्तकात आकार, अवकाश, पॉझिटिव्ह-निगेटिव्ह स्पेसेस, रंग, डेप्थ, लय अशा चित्रकलेतल्या अनेक अंगांविषयी इतकं सुरेखपणे लिहिलंय वा मांडलय ना की अनेकदा काही पानं वाचल्यावर परत-परत मी तिथेच घुटमळत रहाते. आणि कोरा कॅनव्हास हे पुस्तक वाचणं अपुर्णच रहातं. साहजिकच इतकं सुलभतेने चित्रांविषयी लिहू शकणा-या कलावंताच चित्र प्रदर्शन पहायची नक्कीच उत्सुकता होती.
गेलो तर एग्झिबिशन क्युरेट केलेल्या जेसल ठक्कर यांची आई भेटली. औरंगाबादहून खास दोघीजणी हे प्रदर्शन बघायला आल्या आहेत हे बघून त्यांना कोण कौतुक वाटलं.
मी पहिल्यांदाच या वास्तुत येत होते. तसंही मला नावा व्यतिरिक्त या गॅलरीविषयी फारशी माहिती नव्हती. इमारतीतले पाच मजले गॅलरीसाठी आहेत.
भरपूर मेहनतीने डिस्प्ले केलेला जाणवत होता. बर्व्यांचे विचार, त्या अनुषंगाने केलेली स्केचेस कालमानाप्रमाणे लावली होती. चित्रकाराचे रंगरेषांमधले बदल, आशयघनता, चित्रविषय मजल्या गणिक बदलत होते. एका मजल्यावर चटपटीत रंगातली ठळक चित्र तर वरच्या मजल्यावर हलक्या रंगसंगतीतले, तरल आकार असलेले काव्यमय चित्र...बघत, वाचत, उमजवून घेत दोन तास कुठे गेले कळलेच नाही. एका मजल्यावर प्रभाकर बर्वेंच्या चित्रातील काही ठराविक फॉर्मसचे मॅग्नेटिक कट आऊट ठेवले होते. समोरच्या पांढ-या बोर्डांवर तुम्ही तुम्हाला हवी तशी कंपोझिशन्स या कट आऊटसच्या सहाय्याने करुन बघू शकाल अशी सोय होती.
Very much engaging and innovative activity that was.
सर्वात वरच्या मजल्यावर बर्व्यांच्या नोटबुक्स होत्या. भरपूर स्केचेस आणि नोंदीनी भरलेल्या. माझ्या दृष्टीने या रेट्रोस्पेक्टिव्हचा हा हाय पॉईंट आहे.
दोन चार वेळा यावं, तासन् तास बघावं आणि एक वेगळीच उर्जा घेऊन परतावं असं हे प्रदर्शन खचितच आहे.
चित्रांबरोबरच या स्केचबुक्सनी देखील चित्रकार बर्वे समजून घ्यायला मदत होईल इतक्या महत्त्वाच्या या नोटबुक्स आहेत.
खाली आलो तर बहुतेक गॅलरी कमिटी मेंबर्सच जमले असावेत. जराशा गप्पा मारल्या. क्युरेट केलेल्यांच्या तर्फे प्रदर्शनाबद्दलचे आमचे बाईटस् आवर्जून घेण्यात आले. अजूनही दोन दिवसांपूर्वी होऊन गेलेल्या गदारोळाची ग्रॅव्हिटी आम्हाला कळलीच नव्हती. एक भव्य पण नितांत सुंदर प्रदर्शन पाहिल्याच्या आनंदात आम्ही परतलो.
गावी आलो तर काय निषेध स्वातंत्र्य, कलेतली सेन्सॉरशिप, राजकीय हस्तक्षेप या असल्या गोष्टींनी सोशल मिडिया भडकलेला. जो तो आपलं मत मांडतोय. या निमित्ताने राजकीय गुलालही उधळला जात आहे. पद्मश्री काय, महत्वाच्या जागा पटकावणं काय, दिल्ली विरुध्द मुंबई, गॅलरी का म्युझियम, चार मजले का एक मजला ? भरपूरच गोंधळ चालू आहे. त्यात सोशल मिडियाचं तेल.
माझ्या मते प्रत्येकाचीच बाजू थोडी पटण्यासारखीच आहे. पालेकरांच म्हणणं पण योग्य आहे.
जसं एखाद्या वेळेस अनेक गोष्टींच्या वेळा जमून येतात तसंच या वेळी अनेक गोष्टींच्या वेळा थोड्याफार फरकाने चुकल्या आहेत.
That's it.
I think curetor of the show was-is more worried about the spectacular and elaborate show of artist Prabhakar Barwe. And why she shouldn't ?
Really she has worked a lot for this in depth restropective.
खरोखर प्रदर्शन फार उत्तम आहे.
सगळ्या कलावंतांनी, कलेत रुची असणा-यांनी वा नसणा-यांनी देखील हे प्रदर्शन आवर्जून बघावं असंच आहे. मला वाटतं जितक्या जास्त संख्येने जनता हे प्रदर्शन बघेल तितकं पालेकरांच्या, बहुलकरांच्या मागणीला वजन प्राप्त होईल, जेसल ठक्करांच्या मेहनतीला न्याय मिळेल आणि मुख्य म्हणजे प्रतिभावंत चित्रकार प्रभाकर बर्व्यांच्या चित्र कारकिर्दीला एक यशस्वी परिमाण मिळेल.
इतर गोष्टी आपापल्या पेसनी होतं रहातील. या गदारोळाचा झाकोळ प्रदर्शनावर मुळीच नको.
माझी सर्वांना विनंती आहे की जा आणि प्रदर्शनाचा समजून-उमजून आस्वाद घ्या.
By doing so you will be paying a great respect to Artist Prabhakar Barwe.
No comments:
Post a Comment