दोन-तीन दिवसासाठी पुण्यात काय गेले आणि इकडे औरंगाबादच्या घरातल्या शेजा-यांच्या बागेतला कुंदाचा वेल-झुडूप तुडूंब बहरलं. अक्षरशः त्या बोगनवेलीसारखी प्रत्येक फर्राटेबाज काडीन काडी शुभ्र, रेखीव फुलांनी लगडलेली. फुलांच्या तु-यांनी कमानदार झालेल्या शेलाट्या फांद्या बघणं देखील नजर निववतय. खाली जमिनीवर, कंपाऊंड वॉलवर देखील शुभ्र अभिषेक झालाय. भर उन्हाळ्यात तेही इतकं पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना देखील हा कुंदा इतका बहरलाय याचंच फार अप्रुप वाटतंय.
खरंतर कुंदा काही फार अप्रुपाचं फुल नाहीये. माणसांची देखील गंमत असते. कुठल्याही गोष्टीचा उपयोग असेल, त्यातून आनंद मिळत असेल, फायदा होत असेल त्या गोष्टी डोक्यावर घ्यायच्या. मग ते प्राणी-पक्ष्यांच असो, भाजी-फळांच असो, वृक्षवल्लींच असो वा पानाफुलांच असो.
आता अवर्षणात देखील हा इतका भरभरुन फुलणारा, नखशिखांत शुभ्र असणारा, ब-यापैकी दिर्घकाळ टवटवीत रहाणारा नजाकती कुंदा फक्त कुठलाच वास-सुवास नाही या एका कारणासाठी दुय्यम ठरवला गेलेला. फुलांचीही एक ललाट रेषा असते बरं. एखाद्याचा उदोउदोच होतो तर एखादा कायमच अडगळीत पडतो.
आमच्या मराठवाड्यात कुंदाला काकड्याचं फुलं म्हणतात. आणि गंमत म्हणजे लग्नसंबधात जर एखादी मुलगी फक्त रुपाने उजवी आणि गुणाने डावी निघाली तर तिची काकड्याचं फुलं म्हणून हेटाळणी केली जाते. म्हणजे एखाद्या नुतन सूनेविषयी कुणी गॉसिप करत असेल तर तिचं काही विचारु नकोस, नुस्तं काकड्याचं फुल आहे झालं अशी सरसकट अवहेलना मुलीबरोबर फुलाची देखील केली जाते.
पण हां, कुंदाच्या कळ्यांच मात्र भलतचं कवतिक असतं हं.
एखादीचे दात जर एकसारखे सुबक आणि शुभ्र असतील तर त्या दातांना कुंदकळ्यांची उपमा दिली जाते.
म्हणजे फक्त सुवासिक नसणं या एका उणीवेमुळे ही फुलं कायम बॅक बेंचवरंच रहातात. खरोखर वाईट वाटतं.
इतकं सर्वगुणसंपन्न व सालस कुंदाचं फुल पण
ये महकती हुवी गज़ल हो मख़दुं पासून कोसों दूर रहातं बिचारं.
No comments:
Post a Comment