Monday, 18 February 2019

रविवार पेठ आणि इतरत्र. पुणे

सध्या सोशल मिडिया वर येऊ घातलेले इलेक्शन्स आणि पुलोवामा कांड यांच्या इतक्या उलट-सुलट चर्चा आहेत ना की अक्षरशः विषयाचं गांभीर्य पार करुन जरासं हसंच केल्यासारखं वाटतंय. त्या विषयी काही ऐकू नये, वाचू नये वा बोलूही नये इतकी तटस्थता या भडिमारामुळे आली आहे.
बरं हे कमी की काय म्हणून त्या अल्गोरिदममुळे एखाद्या विषयी काही न्युज चाळली की त्याचं टाईपच्या न्युज परत परत डोळ्यासमोर येत रहातात.

एवढ्यात एक पोस्ट स्वैपाकघरात सहसा वापरल्या जाणा-या धातूच्या, काचेच्या, मातीच्या वस्तूंविषयी वाचली. त्या वस्तू वापरातले उपयोग, धोके, अडचणी आणि बरंच काही. तर अशातच बीडाच्या वस्तुंविषयी वाचनात आलं. सहसा बीड म्हटलं की आप्पे पात्र आणि दोसा तवाच आठवतो. पण त्या धातूचं क्युअरिंग, लिमिटेशन्स फारसे माहित नव्हते. मग आमच्या औरंगाबादच्या बाजारात फेरफटका मारला तर फक्त आप्पेपात्रच उपलब्ध होतं. इतर भांडी पुणे-मुंबईत मिळतील म्हणे.
तर परवाच पुण्याला गेले होते. एक छानशी सकाळ हातात होती. लगेच रविवार पेठेत डोकावायचा बेत आखला. एकटीच निघाले कारण त्या भागात फिरण्याचा माझा स्वत:चाच एजंडा खूप होता.
जुनी भांडी-नवी भांडी, तांबट आळी, बाहेरुन का होईना पण थोडाफार रेड लाईट एरिया असा प्रोग्राम तोही दोन तीन तासात पार पाडायचा होता.

अकरा नाही वाजत की मंडईत पोहोंचले. सरती हिवाळी सकाळ. बाजारही नुकताच उघडलेला. काही दुकानदारांची झाडलोट चालू होती. काहींची दुकानं लावणं सुरु होतं. काही जण पुजेत गर्क होते, तर काहींचा पहिला चहा घेणं चालू होतं. अशा वेळी फार मजेशीर अनुभव येतात.
त्यात पुणं म्हणजे विचारायलाच नको.
काही जणं झाडलोट थांबवून झटकून-फटकून बसायला स्टुल देतात तर काहीजणं तुमच्याच अंगावर धुरळा उडवायलाही मागेपुढे पहात नाहीत. काही जणं दुकानातल्या अंतर्गत भागात जाऊन गुपचूप चहा पिऊन येतात तर काही जणं ताई..चहा घेणार का असंही अगत्याने विचारतात.
आणि रोजचा धंदा सुरु करण्या आधीच्या पुजेचं तर प्रत्येकाचं तंत्र वेगळंच असतं. एक तर कुठलंही दुकान घ्या माल खच्चूनच भरलेला असतो. देव, देव्हारा दिशा बघून कुठेतरी उंचावरच असतो. मग खुर्ची वा स्टुलावर उभं राहून अराध्य दैवतांची पूजा करणं, हळद-कुंकू वहाणं, फुलं-हार चढवणं, देवाला उदबत्ती फिरवणं, नंतर ती उदबत्ती रोजच्या गल्ला- ड्रॉवरवरनं ओवाळणं, वजन काट्यावर ओवाळणं, सामुहिकरित्या दुकानातल्या अख्ख्या मालावरनं फिरवणं अशा ढोबळ पध्दतीची ही पूजा असते.

आता जाती-पंथानुसार, वैयक्तिक विश्वासानुसार थोडाफार फरक या पूजेत असतो तरीपण स्वरुप हेच असतं. पण यातही एक मेख आहे. काही जणांना पुजेच्या वेळेस गि-हाईक आलं तर शुभशकून वाटतो. ते मंत्र म्हणता म्हणताच तुम्हाला नजरेनी बसायला सांगतात. पूजा पुर्ण झाल्यानंतरच तुम्हाला काय हवंय ते विचारतात. तर काही जणांना साग्रसंगीत पूजा करायची असते. त्यात शनिवार असेल तर विचारायलाच नको. मनलावून करत असलेल्या पूजेत त्यांना कुणी ति-हाईत बघा नको असतो. मग ते गि-हाईक का असेना. एका तल्लीनतेने त्यांना पूजा करायची असते. मग ते पूजा थांबवून जरा दहा -पंधरा मिनिटांनी आपल्याला यायला सांगतात. अशावेळी गि-हाईक हातचं निसटलं तरी चालतं पण पूजेत असा प्रेक्षक नको असतो.
असते एकेकाची श्रध्दा आणि समजूत.

परक्या गावात आपल्याच जातभाईकडून, भाषिकभाई वस्तू,जिनसा खरेदी कराव्याशा वाटतात हल्ली. हा पुण्यात झालेला साक्षात्कार.
बहुदा मराठी भाषिकांविषयीचं प्रेम सरस ठरतंय. आपणही आपल्याला कसे उलगडत जातो नाही.

केवढाल्या त्या पेठा, ते रस्ते, त्या आळ्या, ती खेटून असलेली एकाच प्रकारच्या मालाची दुकानं. कसा काय सगळ्यांचा माल खपत असेल देव जाणे. पण खपतच असावा. नसता इतका खच्चून माल कोणी भरलाच नसता, नाही का ?

असो, शांतपणे दुकानदारीच्या झुंजूमुंजू वेळेला फिरले. हव्या त्या चौकशा केल्या, काही खरेदी केली, ब-यापैकी अंतर्गत भागातून फिरले. निघेस्तवर दोन वाजत आलेले. सुस्तावलेला रेड लाइट एरियाही जागा होत होता. भर दूपारी रंगरंगोटी केलेल्या महिला जिने उतरत होत्या. पानटपरीवर गप्पा मारत उभ्या होत्या. यातली एकही महिला मला प्रथमदर्शनी दु:खी, कष्टी, पिचलेली वा त्रासलेली वाटली नाही.
तमाम जणी मुरलेल्या दिसत होत्या. सत्यपरिस्थिती नक्कीच तशी नसेल. पण मग गि-हाईकांसाठी हे छटेलपणाचं सोंग आणणही किती अवघड आहे नाही ?

बाजाराच्या एकाबाजूला धंद्याच्या बरकतीसाठी देवाची पूजा, मंत्रोच्चारासह देवाला फुलं-सुगंधाची ओवाळणी,
तर दुस-या बाजूला गि-हाईकं पटकवायला स्त्री देहाची बटबटीत रंगरंगोटी, भपकारी अत्तरांची फवारणी आणि इरसाल बोलावणी.
वा रे माणसा अजब तुझे जगणे.

No comments:

Post a Comment