उन्हाळा म्हटलं की मेतकूट आठवतंच.
नुसताच ऊन्हाळा का ? हिवाळा म्हटलं तरी मेतकूट आठवतंच आठवतं आणि पावसाळ्यात तर मेतकूटाशिवाय पानही हलत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतकं गुणी असतंय हे मेतकुट.
तळाशी जाणारी मेतकूटाची बरणी दिसलीकीच अस्मादिक मेतकूट बनवायचा घाट घालतात. बाकी स्वैपाकाचा, मसाले बनवायचा उरक नसला तरी मला मेतकूट घरीच बनवायचा भारी सोस आहे. आता करुन करुन कीती ते मेतकूट करणार तर पावशेराचं पण अस्मादिक भलत्याच निगुतीने मेतकूट करायचा (आणि हल्ली पोस्टायचा देखील😜) घाट घालतात हे बरीक खरं आहे.
दरवर्षी 'अन्नपुर्णा' या मंगला बर्वेंच्या पुस्तकाप्रमाणे मेतकूट करते, पण आज जयश्री देशपांडेंच्या 'पाकसिध्दी' या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मेतकूट करत आहे. मेतकुटाची रेसिपी शेयर तर करतेच पण मेतकुटाचे उन्हाळी वापरही सांगते.
उरलेला भात, कुस्करलेली पोळी-भाकरी, मुरमुरे-लाह्या, कोरडे परतलेले पातळ पोहे या गोष्टींवर मेतकूट भुरभुरवून, बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर टाकून, पळीभर तेलाची कढीपत्ता, मिरची, मोहरी, हिंग-हळदीची झकास फोडणी देवून, काला करुन नाश्त्याच्या, मधल्या खाण्याच्या भन्नाट डिशेस तयार होतात. तसंच दह्यात मेतकूट कालवून वरुन पळीभर तेलातली चिरलेला कांदा, कढीपत्ता, मिरची,मोहरी, हिंग, तीळ-हळदीची फोडणी दिली की झकास तोंडी लावणं होतं. जेवणाच्या ताटातच नुसत्या चमचाभर तेलात देखील झटपट मेतकूट, मीठ, तिखट कालवून पोळी-भाकरी बरोबर खाता येतं.
गरमागरम पोळी-ज्वारीच्या भाकरीवर देखील तुप, मेतकूट, मीठ पसरवून झटपट स्वादीष्ट रोल बनवता येतो.
आणि गुरगुट्या भाताबरोबर सढळहस्ते कालवलेलं मेतकूट-तूप म्हणजे तर अहाहा..स्वर्गिय सुखचं.
विशीच्या पुढची माझी मुलगी अजूनही मी कालवून दिलेल्या गुरगुट्या मेतकूट भातावर टपून बसलेली असते. पण यासाठी पावसाळी-थंड मौसम साथीला हवा. अर्थात हे सगळं कवतिक मेतकूटाची चव आवडत असेल तरंच.😋
मेतकूट म्हणजे काही ठराविक डाळी व मसाले हलकेच भाजून एकत्र वाटणे. या वर्षी पाकसिध्दीत सांगितल्याप्रमाणे दालचिनी, लवंग, जायफळ व अख्ख्या सुक्या व लाल मिरच्यांची अॅडिशन इतर जिनसांशिवाय अधीकची आहे.
अगदीे एकजीव वाटलं गेलं पाहिजे मेतकूट. सगळ्या चवी बेमालूमपणे एकत्र झाल्या पाहिजेत. एकजीव होणं महत्त्वाचं. उगाच नाही अमक्याचं तमकीशी कींवा तमक्याशी 'भारीच मेतकूट जमलयं हो' असं म्हणायची प्रथा आहे.😉
तर रेसिपीत दिलेल्या डाळी, धान्य व मसाले हलकेच भाजून घ्या. गार झाले की मिक्सर वर कोरडेच पण चांगलेच बारीक करुन चर्या. बारीक चाळणीने हे मेतकूट चाळून घ्यावं. वरच्या अदरबदर कण्या परत वाटाव्यात, परत चाळाव्यात. चाळून खाली पडलेली पावडर म्हणजे मेतकूट. शेवटची वरची कणी पोहे-मुरमु-यात, वरणात वापरुन टाकावी.
बघा करुन, चाखून-माखून मेतकूट.
नक्की आवडेल.
झटपट चव आणणारा हा कोरडा, टिकावू व टाईम टेस्टेड प्रकार आहे.
मराठवाड्यात तर मेतकूट नसलेलं घर सापडणार नाही का येसर-मेतकूटाशिवाय निम्न ग्रामीण लग्न लागणार नाही. इतका थोर महिमा आहे या मेतकुटाचा.
पुर्वीच्या काळी लग्न हल्लीसारखी सरसकट उक्त देवून होत नसत. घरातलेच अनुभवी वडिलधारे व धडपडी तरुण मंडळी लग्न सर्वार्थाने उरकत असत. लग्नाआधी दोन आठवडे आणि लग्नानंतर आठवडाभर तरी अनुभवी आणि कामसू काका-काकू, आत्या-मावश्या तळ ठोकून बसत असत. येणारं गणगोत आणि व-हाडी
कुटुंब काबिल्यासह मजल दर मजल करत डेरे दाखल होत असत. पल्लेही त्या काळच्या मानाने दूरचे असत. पायी, बैलगाडी, एस्टी, पॅसेंजर रेल्वेने प्रवास होतं असत. लग्नानंतर घरी पोहोचायला दोन-तीन दिवस लागत. साहजिकच प्रवासात आणि प्रवासातून दमून घरी पोहोचल्यावर झटपट स्वैपाकाची सोय म्हणून लग्नाला आलेल्या प्रत्येक घरपरत येसर-मेतकूट देण्यात येत असे.
भाताबरोबर खायला म्हणून पाण्याला खमंग येसर लावून उकळवलं की भन्नाट असं चविष्ट कालवण तयार होतं. तसंच धपाधपा बदडलेल्या ऐसपैस गरम भाक-यांबरोबर तेल मेतकुट म्हणजे तर पर्वणीच. थोडक्यात आपल्याकडच्या लग्नाला आवर्जून आलेल्या पाहुण्यांच्या भुकेची सोय लावण्याचं काम हे येसर-मेतकूट अजूनही इमानेइतबारे पार पाडत असत, आजही पाडताहेत. अर्थात आता शहरी लग्नांचा बाज अमुलाग्र बदललाय. पाहुण्यांच्या कपड्यांची घडी देखील विस्कटत नाही इतकी आध्धर लग्न होतात हल्ली.
तरीपण ग्रामीण भागात अजूनही जून्याच पध्दतीने लग्न होतात. चिवडा-लाडवांचे तहानलाडू,
तर येसर-मेतकुटाचे भुकलाडू अजूनतरी आवर्जून निरोपाच्या वेळी देण्यात येतात.
काही परंपरा कालगतीने बदलतच असतात. त्यात काही वावगं नाही. पण म्हणून का आपण मेतकूटाला विसरायचं ?😊
पाकसिध्दी रेसिपी.
१ वाटी हरभरा डाळ, .५० तांदूळ, .२५ उडीद डाळ,
१ चमचा गहू-धणे-जिरे, छोटा तुकडा दालचिनी, ४ लवंगा, अर्ध जायफळ, १ चमचा मोहरी-हिंग-हळद, साताठ सुक्या मिरच्या.
हे सर्व जिन्नस मंद आचेवर हलके भाजावे व शक्यतो घरीच पीठ करावे. मिक्सरवर छान पावडर होते.
येसराविषयी मला फारशी माहिती नाहीये. मिळाल्यावर नक्कीच शेयर करीन.
No comments:
Post a Comment