जरा नवीन पद्धतीचं मेतकूट करायला घेतलं तर त्यात अर्ध जायफळ टाकायचं म्हणे. मेतकूटात आणि जायफळ पहिल्यांदाच ऐकलं. चला आता एका पुस्तकाचं बोट धरलय ना तस्सच करुन बघू या.
फ्रिजच्या दारातल्या चिज ब्लॉकच्या प्लॅस्टिक डब्यात चारसहा जायफळं ठेवलेली आठवत होती. अशाच चारदोन डब्यांमधे हळकुंड, आंबेहळद, रक्तचंदनी पिटुकली बाहुली, दोनेक सुपा-या-बिब्बे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. जायफळ शोधताना एकदम खुदकन हसू आलं.
जनरेशन गॅप...पिढीतल्या अंतराचे पोवाडे गात आपण पिढीजात साहित्य कधी जमवायला लागलो आपल्याला कळलंही नाही. खरंतर हे साहित्य फार काही वापरात येत नाही पण आली गृहिणी पदाची खुमखुमी की या वस्तू आणल्या जातात. लागेल कधी म्हणून आपणही फार निगुतीने या वस्तू सांभाळतो. भले त्या वस्तू वर्षोनुवर्षे न लागो पण आपल्याकडे हळकुंड नाही ही कल्पनाच मला तरी पटत नाही. आता संसाराच्या अगदी सुरवातीला या असल्या औषधी गोष्टींचं महत्त्व पटलेलं नव्हतं पण मग मुरगळलेला पाय, काळा-निळा पडलेला हात, दुखावल्यामुळे शरीरावर आलेली सुज यासाठी जेव्हा या गोष्टींनी रामबाणी उपाय केलेले अनुभवले आहेत तेव्हापासूनच या गोष्टी सांभाळायला शिकले आहे. आयुष्यातली पहिली रक्तचंदनी बाहुली पायातनं अपंग झालेल्या माझ्या आजीच्या (आईची आई) लोखंडी संदुकीत पाहिल्याचं आठवतंय.
असं प्रत्येकीचं-प्रत्येकाचं असतं.
काही विशिष्ट गोष्टी, जिनसा, वैयक्तिक वापरातल्या वस्तू घरात, जवळ नसल्या की अगदी बैचेनी येते. या वस्तू हाताशी नसतील तर काहीतरी कमी सतत जाणवत रहाते. जरासा आत्मविश्वास देखील कमी होतो. महिलांना विशेषकरून स्वैपाक घरात तर फार असे अनुभव येत असतील.
आता मला स्वैपाक घरात कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा-लसूण-बटाटे नसले की भलती बैचेनी येते. (म्हणजे तेल तूप, तिखट-हळद, डाळ-तांदूळही हवेतच)
खरंय, वेळ आल्यास एवढ्या सामग्रीत अपरात्रीसुध्दा चांगलच पाककौशल्य दाखवू शकते कोणतीही गृहिणी हे आता अनुभवाने पटलंय.
पण बाकी काही असो वाटतं नसो ताजा-हिरवागार कढीपत्ता हाताशी नसला की फारच अस्वस्थ होते मी.
सतत डोळ्यासमोर कढीपत्ताच येत रहातो. आता स्वत:च स्वत:चं माप काढायचं म्हटलं तर आजपर्यंत पंधरा वेळा सुध्दा कढी केली नसेल पण कढीपत्ता नसला की फार मोठी कमतरता जाणवते मला स्वैपाक घरात.
तसंच ते मेतकूट संपत आलं की होतं. घरात मेतकूट नाही असं गेल्या विस-पंचवीस वर्षांत कधी झालं नसेल.
तसंच त्या व्हिक्सचं देखील.
माझं सायनोसायटिस आणि पित्ताची डोके दुखी मुळे व्हिक्स आणि कॉंबिफ्लाम औषध कायम माझ्यासोबत असतं. व्हिक्स माझ्याजवळ नसेल तर मला रात्रभर झोप लागत नाही.
मला दिवसा-रात्री प्यायला पाणीही खूप लागतं. म्हणजे कुठेही जा एक बाटली स्वतंत्रपणे मी माझ्यासाठी ठेवते. भलेही घोटभर सुध्दा पाणी पिणार नाही पण पाण्याच्या सहज, सुलभ उपलब्धतेशिवाय रात्र काढायची या कल्पनेनेच माझा घसा कोरडा पडतो. विशेषकरून हॉटेल्समधे.
मला आठवतंय माझे वडील-आजोबाही उशाशी तांब्या भांड घेऊन झोपत असत.
तर अशा काही वारश्याने आलेल्या, काही आपण कल्टीव्हेट केलेल्या खोडशाळ गमतीजमती असतात एकेकाच्या. वस्तू-जिनसा पण भारी आणि त्यामागच्या गोष्टी तर अजूनच रंजक.
तर मंडळी सांगा बरं तुमच्या अशा रंजक वस्तू-कथा.
No comments:
Post a Comment