आज रोज डे आहे म्हणे.
मधल्या हल्लीची आमची स्थानिक वर्तमानपत्र अक्षरशः हातात धरवत नाहीयेत, वाचवत नाहीये. राजकारणाची रणधुमाळी तर आहेच पण आमच्या इथे स्त्री भृणांच्या अवैध सोनोग्राफी सेंटरचा,
स्त्री भृणहत्येच्या रॅकेटचा शोध लागलाय. एकाला पकडलं आणि दूरवर पसरलेलं जाळंच सापडलं. यातही महिला डॉक्टर अग्रेसर. अगदी किळसवाण्या बातम्या आहेत. वाचवत देखील नाहियेत. म्हणजे आधी चोरीछुपे सोनोग्राफी करण्याची कारस्थानं, ठिकाणं, नंतर अबॉर्शन्सचे पडीक दवाखाने, भृणांची झटपट विल्हेवाट लावायची ड्रेनेजची व्यवस्था, त्यासाठीचं सुनियोजित बांधकाम, त्याचे परवाने.. सगळं बेमालूमपणे चालू होतं. ही असली गैरकृत्य करणा-यांना काही वाटतं होतं ना करवून घेणा-या मायबापांना काही वाटतं होतं. कुणाला दोष द्यावा तेच कळत नाही.
परत उरल्यासुरल्या बातम्यात अपघात, खुन, अनैतिक संबंध, गैरकृत्यवाले संस्था चालक, उखडलेले रस्ते, गटारी, पाणीप्रश्न, कचरा,
चुकीच्या प्रश्न पत्रीका...अरा..रा...रा...नको ते वर्तमानपत्र असं वाटतयं. कुठेही दिलासादायक चित्र नाही, बातमी नाही.
नाही म्हणायला आमच्या कलावंतांच आर्ट वर्कशॉप मात्र उत्साहातच पार पडलं.
तर त्याच दिवसांत सकाळी चहा पित बसलेली. अंगणातल्या अडेनियमच्या टपोरलेल्या शेंगावर लक्ष होतंच कधीचं. तर आज अवचितच फांदीवर सोनेरी लंबुळकी लव डोकावताना दिसली. अरेच्या शेंग फुटली वाटतं. जवळ जाऊन पाहिलं तर दोन जुळ्या शेंगा डाव्या-उजव्या हातासारख्या. चढत्या उन्हात एक बरीच तडकली होती. त्यातून मऊ-मऊ, सोनेरी केसयुक्त बिया डोकावत होत्या. अगदी जि-यासारखी बी, आणि मोठ्या लिंबा एवढी गोलाकार, तंतूमय सोनेरी लव. तडकलेल्या शेंगेतनं अगदी लखलखताहेत या सृजनशील बीया.
जसं उन चढत जाईल तशी तशी शेंग अजून तडकत, फाकत जाणार, आणि मग वा-याच्या झुळकेने या सुवर्णकांती म्हाता-या आपल्या हातावर तुरी देत भुरु भुरु उडून जाणार. कुठे जातील माहित नाही. ज्यांचा सारथीच वारा आहे त्यांचा ठावठिकाणा आपल्याला कसा लागणार ? त्यापेक्षा आत्ताच हाताने शेंग फोडून बीया जमा केल्या तर ?
मुंबईत म्हणे अडेनियमचं एक बी तीन रुपयाला विकलं जातं म्हणे. खरंतर हे डेझर्ट प्लांट आहे पण एवढ्यात आपल्याकडे डेकोरेटिव्ह मिडियम साईज प्लांट म्हणून याचा खूप वापर होतो. इनडोअर, आऊटडोअर कसंही टिकतं हे झाडं. थोडक्यात अस्मादिकांना हिरण्यला भरपूर प्रमाणात ही झाडं/झुडपं लावायची आहेत.
अरेच्या, पण आपलं तर वर्कशॉप चालू आहे ना ? आपण दिवसभर बाहेर. मग दिवसाच्या उन्हात दुसरी पण शेंग तडकली तर ? जातील की बी रुपी म्हाता-या भुरु भुरु उडून. ऊनही तापायला लागलं आहे आता.
गर्भार शेंग तडकायचा काय भरवसा हो!
आलंच आहे नजरेत तर ही अगदी काकणभरंच तडकलेली शेंगही तडकवू आणि दोन्ही शेंगांच्या बीया आत्ताच हातासरशी जमा करुन टाकू की.
झालं, आलं मनात आणि उतरलं कृतीत.
एकाही बीला उडू दिलं नाही. चहाच्या पारदर्शक कपात दामटून ठेवल्याहेत सध्या. वेळ मिळाला की नेइन हिरण्यला आणि रुजवेन तिथल्या नर्सरीत.
तरीपण आपल्या सोयीने बळजबरीने शेंग तडकवणं आणि सृजनशील, फायदेमंद बीया पदरात पाडून घेणं जीवाला फार खात राहिलं हो...दिर्घकाळ पर्यंत.
काल एका ठिकाणी गेले होते. संध्याकाळच्या उतरत्या उन्हातली त्यांच्याकडची गुलाब फुलं आणि कंपाऊंड वॅलवरची सावली भलतीच आवडून गेली. काढला फोटो.
आणि आज कळलं की रोज डे आहे म्हणून.
नैसर्गिकपणे उमलणं, मनाबरहुकुम उमलवणं वा उमलूच न देणं...किती सुक्ष्म पदर आहेत यात. विचारमग्न झाले आणि लिहून मोकळी झाले.
No comments:
Post a Comment