Monday, 11 February 2019

Angat Pangat मेतकूट मुरमुरे

जाते..जाते म्हणत परत परत येत निरोप घेणा-या एखाद्या प्रियतमेसारखी थंडी परत, परत परतून येत आहे. थंडी असली तरी दिवस मोठा होत चालला आहे. दिवसाचं तापमान वाढतंच आहे. आपसूकच  उन्हाळी खाण्यांचा आठव रसनेला सरसरुन येतच आहे. 😋
तर आज चहा बरोबर काहीतरी झटपट खमंग पाहिजे म्हणून मेतकूट मुरमुरे कालवले. या उन्हाळ्यातले पहिले 'लावलेले मुरमुरे'. हो आम्ही मराठवाड्यातील मंडळी या मुरमु-यांना लावलेले मुरमुरेचं म्हणतो.🤗

तर कुठलेही चविष्ट मुरमुरे चाळून स्वच्छ करुन घ्यावे. अजून पुरेसं कडकडीत ऊन नसल्यामुळे आज मी हे मुरमुरे गरम कढईत जरा कुरकुरीत करुन घेतले.
नंतर त्यात बारीक चिरलेला पांढरा कांदा, चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर आणि अंदाजे चमचा दोनचमचे कच्चं तेल टाकावं, वरुन दोन-चार चमचे मेतकूट भुरभुरावे आणि सगळं मिक्श्चर व्यवस्थित कालवावे. आणि चहाबरोबर झक्कास पैकी खात बसावे. अख्ख्या ऊन्हाळ्यात मी निदान आठ दहा वेळा तरी हे लावलेले मुरमुरे मी स्वाहा करत असते.
झटपट होतात, खमंग लागतात आणि उन्हाळ्यासाठी तर अगदी परफेक्ट.
कच्च्या पांढ-या कांद्याने आणि मेतकुटाने हे मुरमुरे लयीच झणकी लागतात.
आणि हां..बशीत वगैरे हे मुरमुरे नसतात बरं घ्यायचे. परातीत, टोपल्यातच लावायचे आणि गप्पा टप्पा मारत एकत्र गोल बसून हातानेच खायचे. No चमचे.😁

थोडक्यात आजोळी-माहेरी गेल्यानंतर दोन-चार बहीण भावांच्या साताठ पोरांच्या दुपारच्या खाण्यासाठीच हा पदार्थ आहे. माहेरी आलेल्या आया-मावशांना खाय, खाय करुन भंडावून सोडणा-या लेकरांच्या टोळीला जेव्हा "आता मला-आम्हाला खा" सारखी विदीर्ण आणि हताश उत्तरं देणा-या माताभगिनींसाठी तर ही खास रेसिपी आहे.😉
आमच्या नांदेडला फार चांगले मुरमुरे मिळतात. विशेषकरून देगलूर का कळमनुरीत भागात. माझ्या आजोळी (कंधारला) आमची टोळी येणार म्हटलं की पोत्यांनी मुरमुरे आणून ठेवत आणि अक्षरशः एका भल्या थोरल्या लोखंडी टोपल्यात मुरमुरे लावत. आठ-दहाजणं गोल करुन बसू शकत इतकं मोठं टोपलं असे. हे मुरमुरे खाताना मामा लोकं भुतांच्या, भानामतीच्या अतिरंजित गोष्टी सांगत मुरमु-यांचा खंमगपणा अजूनच वाढवत असत. दुपारचे चार वाजले की तुम्ही कंधारकर कडबा खायला बसता असं म्हणत माझे वडील आई-मावशांना फार चिडवत असतं. 😜
तर ते काहीही असो या लावलेल्या मुरमु-यांना तोड नाही. 😊

No comments:

Post a Comment