कुठल्याही गृहिणीच्या कार्यकालात दूध ओतून जायच्या असंख्य घटना असतात. जसं ते सासा-सूनांचं एक तणावग्रस्त नातं असतं तसचं ते दूधाचं आणि गृहिणीचं एक अटीतटीचं नातं असतं. एकीला खमकी खात्री की दूध ओतू जाणारच नाही तर दूस-याला ओतू जात कधी डाव साधायचा हे बरोबर समजतं. थोडक्यात काय तर गृहिणीपदाच्या प्रगती पुस्तकावर दूध ओतू जाण्यामुळे भरपूरच लाल रेघा उमटतात हो.
पुर्वीच्या काळी तर सुनांच अष्टावधान जोखायला सासवांच्या मदतीला हे तापवायला ठेवलेलं दूधच सटीकपणे कामी यायचं. दूध ओतू गेलं रे गेलं की मग सासवांची टोमण्यांची आतिषबाजी ठरलेलीच.
बरं ज्या घरात सासू नसेल तिथे आईची कमतरता भरुन काढायला सासूचे सुपुत्र म्हणजे आपले 'अहो' असतातच जातीने हजर. एरवी घरात बसून तमाम घराकडे दुर्लक्ष करत वर्तमानपत्राचा फडशा पाडणारे व हल्लीच्या काळात मोबाईग्रस्त असणारे पतिराज नेमकं हे दूध ओतू जाताना कसे काय जागरुक असतात कळत नाही. या नवरे लोकांनाही ओतू जाऊन शेगडीवर जळलेलं दूध, जास्त कढवलेलं तूप, बुडाला लागलेला भात असले नामी वास बरोबर येतात. या आई कम् सासवा सुध्दा असले खतरा संस्कार करतातनं मुलांवर. नको ते बरोबर कळतं.
बरं आपणही मारे न्हाऊ-माखू घालून घडवलेले आपलेच चिरंजीव देखील या बाबतीत बापाचाच कित्ता गिरवतात. मला वाटतं it simply runs in the khaandan.
तर ते असो.
आपल्या समाजात अशा पुष्कळच बिनसलेल्या, हुकमाबर हुकूम न झालेल्या गोष्टींसाठी छान समज पसरवलेले आहेत. जसे की मुलगी रुपानी वडीलांसारखी (डावी म्हणजे काळी, फताड्या नाकाची, बटबटीत डोळ्यांची..वगैरे) झाली की तिला भाग्यवान म्हणायचं. मुलींचं कपाळ पुरुषांसारखं रुंद-भव्य झालं की म्हणायचं मोठ्या कपाळीचे नशीबवान असतात म्हणून. वर संशोधनात टकल्यामुलाचं स्थळ आलं तर म्हणतात टकले लोकं फार श्रीमंत असतात, होतात म्हणून. थोडक्यात काय तर समाजमान्य चौकटी बाहेर काही निपजलं की त्याला या समजुतीची साखर चिकटवायची. तेही फक्त महिलांसाठीच प्रामुख्याने. अजस्त्र बायको, बडबडी साथीदारीण असलेले नवरे भाग्यवान असतात, श्रीमंत होतात, ठेंगणी सून सासूचा भाग्योदय करते असं आजपर्यंत कुणी म्हटलय का सांगा मला ?
तर मी काय म्हणते आता या दूध ओतू जायच्या निरंतर संकटामुळे महिलांनीच आता पुढाकार घेत एक छानसा समज समाजात, कुटुंबात पसरावा.
जसं की दूध ओतू गेलं की सासूबाईंना दिर्घायुष्य लाभतं, दूध ओतू गेलं की नव-याला भरपूर पैसा मिळतो वा मुलाचं भाग्य उघडतं...वगैरे..वगैरे.
म्हणजे काट्यानेच काटा काढल्यासारखं होईल की नाही. कींवा सांप भी ना मरे और लाठी भी ना टुटे असं कायसं होईल बुवा.
अरे हो, आज 'किस डे' आहे म्हणे.
म्हणजे हे आता मोबाईल वरनंच कळलं आम्हाला.
त्याच तंद्रीत असताना तर इकडे दूध ओतू गेलंना.
असेना का किस डे का मिस डे, आपल्याला काय करायचंय. आपल्या राशीला आज ही दूधाची भानगड आलीयेना.
बघा अस्सा रोमान्स लुप्त पावतो बरं एकदा का लग्न लागून संसाराचं शुक्लकाष्ट मागे लागलं की.
तर पोरांनो आणि पोरींनो वेळीच सावध व्हा बरं.
म्हणजे करा तुम्ही साजरे रोज डे, हग डे, किस डे, व्हॅलेंटाईन डे...हा प्रवास गोडच असतो हो.
पण या प्रवासाचं डेस्टिनेशन मात्र लयीच नक्षा उतरवतं राव.
No comments:
Post a Comment