Wednesday, 6 February 2019

स्थळ आणि लग्न.

अहो आज स्थळ घेऊन आले आहे बरंका तुमच्याकडे.
बरंका विमलताई..तुमच्या बबडीसाठी एक मुलगा सुचवतेहो. माझ्या चुलत नंणंदेच्या पुतणीचा भाच्चा. फारच चांगलं स्थळ आहे हो. एकतर पुण्यातलं स्थळ आहे. तिथ्थेच अर्धी बाजी आहे हो.
उंद्रीला दोन बेडरुमचा ब्लॉक आहे. ढोरकिनला शेती आहे, वाडा आहे. आणि मुलगा डब्बल ग्रॅज्युयेट आहे. फुरसुंगीच्या पतपेढीत कॅशियर आहे. मोठी बहिण आहे लग्न झालेली. ती बिववेवाडीत दिलीये. तीचाही नवरा टोयोटा का फोटोयाकंपनीमधे सेल्समन आहे. तिचही घरचं सगळं चांगलय. मुलांचे वडील पाणी पुरवठा केंद्रात हेड पोस्टवर होते. आई पण शिकलेली आहे. हौशी आहे. घरबसल्या शिवणाचे, भरतकामाचे क्लासेस घेते. पाळणा घरही चालवत होती इतके दिवस. परवाच नणंद सगुण-निर्गुण भजनी मंडळात भेटली होती. बोलता बोलता विषय निघाला. आत्ता थेट तिच्याकडूनच डिटेल माहिती घेऊन येत आहे हो. खास तुमच्यासाठी.

अहो कसले पोहे करता ? आज माझ्या मेलीचा सोमवार नाही का ? लिंबाचं सरबत करा फक्त. आणि साखरही जरा सढळच टाका बरं. अहो ह्यांची ती शुगर नाही का. ह्यांच्या धाकाने मलाही मेलीला कमीच साखर खावी लागते नेहमी. तुम्हाला माहितीये ना पुर्षांच कसं असतं ते. शुगर ह्यांना पण मलाच धाक त्या साखर खाण्याचा. अहो मी बाहेर पडले की साखरेचा चहा पितात, गुळ-शेंगदाणे खातात. काय सांगू तुम्हाला यांच्या कथा ? स्वत:च्या तब्येतीचं काही नसतं या पुर्षांना. सगळी मेली काळजी आपल्यालाचं. अहो यांच्यासाठीच ते कडकडीत सोमवार करते हो. बाईंचं काळीज बाईलाच माहीत.
छान झालंय हो सरबत. साखर आणि वेलदोडा झक्क लागतयं. घरचीच लिंब ना ?
हं..तर काय सांगत होते मी ? सिंधूताईंच्या वसंताचं नं ?
मुलगा चांगला आहे. व्याप नाही मागे. हौशी धडपडे लोकं. पुण्यात घरं. अजून काय पाहिजे हो. जरा आपलंही पांघरुण बघून हातपाय पसरावेत म्हटलं.
आपण असे ग्रामीण भागातले. आता आपल्या पोरांच्या शिक्षणाचं काय सांगू मी ? बघा तुम्ही. पटलं तर पुढे जाऊ. पण मला बरं वाटलं होतं बबडीसाठी. बी ए करुन शिवणाचा क्लास करते ना सध्या बब्बड ? मग काय पुण्यात गेली की करेल फ्याशन डिजाईनिंगचा कोर्स आणि करेल घरबसल्या झक्कास बिझिनेस हो.
अहो घरातल्या सगळ्यांनीच घर सोडलं तर त्या घराचे तिनतेरा वाजायला वेळ नाही लागत. बायकांनी घरातनंच हातपाय हलवावेत. अहो केवढं वाढतंय ते पुणं. एखाद्या अजगरासारखं.
चांगला चालेल हो तिचा बिझनेस.
धडपडी आणि चंट आहे तशी तुमची बब्बड. शहरात जाऊन चिज होईल तिचं.
विमलताई..तुम्हाला म्हणून सांगते या शिकून सवरुन घरात बसलेल्या पोरी म्हणजे पदरातले निखारे हो. अहो भजनी मंडळात गेलं की काय ते एकेक नवल कळतं. पोरीच अफाट झाल्याहेत हो हल्लीच्या. अगदी पोरांपेक्षा वरचढ.
काय म्हणता मुलाचा फोटो ? अहो फोटो नाहिये तिच्याकडे. पहिलं बाकीचं बघा, पटलं तर मग फोटो मागवू. मुलगा उंचापुरा आहे म्हणे. आणि आपल्या मराठवाडी रंगापुढे उजळ म्हणावा असाच आहे हो.
जरा डोळ्यात छोटासा प्रॉब्लेम आहे म्हणे. पण तरी कॅशियर आहे म्हणजे दिसण्यात अडचण नाही. आणि मी म्हणते विमलताई..पुर्षांच रुप कधी बघतात का ? आपल्यावेळेस काय होतं ? घरदार, नौकरी बघून आई-बाप दोनाचे चार हात करुन द्यायचे.
झाले ना आपलेही संसार ? पोरंबाळं पण झालीच ना ?आणि मी म्हणते चकणा मुलगा असला तर काय फरक पडतो ? बाकीचं तर आपल्याला पाहिजे तस्सच आहे ना ? नाका पेक्षा मोती जड काय कामाचा ? मला तरी पटलं बाई हे स्थळ. आता बब्बडला तुम्ही समजवा.
अहो...कशाला कापलीत पपई ? तुमच्याच अंगणातली ना ? तुम्हाला बाई भारी हौस त्या बागकामाची. फळं-फुलं रेलचेल असते तुमच्याकडे नुसती. भजनी मंडळाचा शारदोत्सव मात्र तुमच्याकडच्या फुलांनीच भारी सजतो हं. जो तो कौतुक करतो तुमचं. अधनंमधनं येत जा की जरा मंडळात. दर मंगळवारी, शुक्रवारी भजनं असतात. मी शुक्रवारी नेमाने जाते. या दिवशी बायकाही खूप येतात. गप्पा टप्पा होतात. हे आजचं स्थळ मला तिथेच कळलं. गावात काय बरंवाईट चाललंय तेही कळतं. अहो परवा त्या बीकेसी शाळेतल्या मास्तरला मारलं म्हणे लोकांनी. वर्गातल्या मुलींशी गैरवर्तन करत होता. काय बाई ऐकावं ते कहरच आहे. कुठं विश्वास ठेवावा कळेनासं होतं हो एकेकदा.
चला..निघते बाई.
बापरे ! साडेबारा झाले. मला आणि पांडेबाईंना मिळून मिनल गोरेला भेटायला जायचयं. अहो तिचे सासरे गेले ना मागच्या आठवड्यात. आजारीच होते म्हणा दिड वर्षांपासून.
मिनलही गुणाचीहो. आणि सासरा तो कसला ? बायको गेल्यावर एकट्यानीच संसार, दोन पोरं सांभाळली हो पण दोन्ही पोरांची लग्न करुन दिली की लगेच वेगळा झाला सासरा, लग्नही केलं म्हणे दुसरं. म्हणजे पोरांचे हात हळदीचे केले की बापही बोहल्यावर उभा राहिला. ही छी..थू..झाली होती या पोरांची समाजात. नंतर तीही बया गेली म्हणे. पण शेवटी मिनलनंच सूनपण निभावलं बरं. सगळं केलं सास-याच आजारपणात. काही म्हणा आपल्या मराठवाड्यातल्या पोरी सोशिकच हो. जातील तिथे नाव काढतील.
बघा तुम्ही त्या स्थळाचं. अहो रुपात काय ठेवलयं ? माणूस गुणात चांगला असला पाहिजे. असे ना का डोळा तिरळा. दिसतंय ना डोळ्यांनी मग बास की. आणि खरं सांगू विमलताई, बायकोपेक्षा नवरा रुपानी डावाच हवा. चुपचाप रहातो कह्यात. नाहीतर या पुर्षांच काय खरं नाही. कुणाला कधी डोळे करतील याचा भरवसाच नाही. म्हटलंना कुठे भरोसा ठेवावा हेच हल्ली कळत नाही.
चला चलते. उभ्या, उभ्या बोलायला म्हणून आले आणि भलतीच रेंगाळले. पांडेबाई खोळंबली असेल दारात. तिचा एक वेगळाच तोरा. तुम्ही काहीही म्हणा नवरा प्राध्यापक, क्लास वन असला की बायकांचे हात आभाळालाच टेकतात हो. तुम्ही मंडळात यायला लागलाय की कळतील सगळ्या गमती जमती. बरयं, कळवा मग स्थळाचं. माझ्या मनात फार आहे. आता बाकीचं तुम्ही बघा.
नसता बब्बडला एकदा घरी पाठवा माझ्या. मी समजावते तिला. माझे योगच चांगलेत. आत्तापर्यंत बारा लग्न जमवलीयेत म्हटलं मी. हे तुमचं जमलं तं तेरा.
माझी मुलं मला चिडवतात, आई..तू लोकांचीच जमवं लग्न, आम्ही आमचं बघतो.
हे तर कायम म्हणतात तू ही अशी लग्न जमवत गावभर फिरतेस ना म्हणूनच आपलं लग्न टिकलय.
अहो हसतात काय विमलताई ?
खरं सांगते नवरे काय, पोरं काय, सासरे काय.....
पुरुषांची जात म्हणजेच जीवाला घोर हो.
.

No comments:

Post a Comment