"To understand the heart and mind of a person, look not at what he has already achieved, but at what he aspires to do."
सध्या शहरातल्याच एका पेंटिंग वर्कशॉपमधे भाग घेतलाय. परत नेहमीप्रमाणे तीच रड. सराव नाही म्हणून आत्मविश्वास नाही, आत्मविश्वास नाही म्हणून सरावाची हिंमत नाही. ज्या सहजतेने हल्ली मी मनातलं, सुचलेलं खटपट करत लिहू शकते तशी मनात उमटलेली चित्र कॅनव्हासवर नाही उतरवू शकत. चित्ररथ म्हटलं की एक प्रचंड उलथापालथच मनात चालू असतेच. विषेशत: अशा वर्कशॉपच्या वेळी तर भलताच ताण येतो मनावर. पण जेव्हा बरोबरीच्या काही कलावंतांकडे, त्यांच्या कलाकृतींकडे वा आत्मविश्वासाकडे पाहिलं की अचंबितही होते.
No one has a fear of going wrong. बेधडक कॅनव्हासला भिडतात. सरसर कलाकृती आकाराला येते. आता त्याचं मुल्यमापन नाही जरी केलं तरी हे झटपट काम संपवणं, आत्मविश्वासाने रंगलेपन करणं, मुळात आपल्याच चित्राकृतीवर आपणंच खुष असणं मला थक्क करतं.
का नाही आपण असे ? कॅनव्हास समोर कायम आपण अशा दोलायमान अवस्थेत का असतो ?
Do I think I am too great ? And the pressure of living up to that image crushes me like this ?
आपल्या मनासारखं, नजरेसमोर असणा-या चित्रासारखं चित्र न उतरणं, उतरवता येणं यापरत दु:ख नाही.
एका आंतरिक घालमेलीतच असते मी अशा वेळी. मग कुणी काही म्हणू दे.
वा..वा..फारच छान पेंटिंग करता तुम्ही मॅडम,
मस्त कलरस्कीम आहे हो..वगैरेसारखे पाठीमागे उभे राहून काढलेले दुस-यांचे कौतुकोद्गार मनापर्यंत पोहचत देखील नाहीत. हे म्हणजे बुडणा-यानी जीव वाचवायला कसाबसा दुसरा काठ गाठावा आणि बघणा-यांनी म्हणावं,
वा...काय झकास पोहता तुम्ही !
आता या विषयी देखील अशाच आशयाचं वेळोवेळी लिहितच असते. खरंतर पुन्हापुन्हा तेच ते होतयं.
पण काय करु कोरा कॅनव्हास ते रंगववेल्या कॅनव्हास पर्यंत जाताना माझी हिच अवस्था असते.
कोरा कॅनव्हास म्हणजे ऐलतीर तर चित्राकृत झालेला कॅनव्हास म्हणजे पैलतीर. मधल्या मधे माझी धडपड, गटांगळ्या खाणं, जीव घाबरा होणं माझं मलाच माहित असतं हो.
नाही म्हणायला एका गोष्टीचा दिलासा मात्र अवश्य असतो. माझं स्केच मला फार आवडतं. मी माझ्या निवडलेल्या स्केचवर बेहद खुश असल्याशिवाय कामच सुरु करत नाही.
पण स्केच ते कॅनव्हास हा प्रवास मात्र खरोखर मानसिक कस पहाणारा असतो.
वर्कशॉपचा काल दूसरा दिवस होता. माझ्यासाठी याच गंटागळ्या अवस्थेत पार पडला. कालपासून लिहिन म्हणत होते. पण मग म्हटलं नाही आधी आपण कॅनव्हास पुर्ण करु मग लिहू. पण नेमकी आज खलील गिब्रानची ही जूनी पोस्ट वर आली.
त्यांचं हे क्वोट फारच समर्पक वाटलं सद्य स्थितीसाठी. म्हटलं चला निमित्ताने मनातली खळबळ तर लिहून काढत निचरा करु या.
कॅनव्हास काय त्याच्या भागधेयाने होईलच पूर्ण.
No comments:
Post a Comment