दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
मी आमच्या मराठवाडा युनिव्हर्सिटीत एक वर्षाचा ब्रीज कोर्स केला आणि नंतर एम एफ एला तिथेच ऍडमिशन घेतली.
कलेतलं शिक्षण सोडून जवळपास पंचवीस वर्षं होऊन गेलेली. तरी एक डिग्री असावी आणि कलेच्या प्रवाहात कार्यानुभव घेत परत सामिल होता यावं हा या मागचा मानस होता.
या नादापायी ब्रीज कोर्स करुन मास्टर्सला एॅडमिशन घेतलेली. तेही रेग्युलर करण्यासाठी म्हणूनच. आणि केलंही रेग्युलर म्हणजे रोज उपस्थित राहूनच. त्यामुळे ऐन भरातल्या आणि सुस्तावलेल्या दैनंदिन संसारिक गोष्टी मार्गी लावून धावत पळत सकाळच्या अकरापर्यंत रोज युनिव्हर्सिटी गाठत असे.
रोज अकरा ते पाच. भलतीच धावपळ व्हायची. इझलसमोर उभं रहायची सवय नसायची. इझलसमोर हात खांद्याच्या रेषेत धरुन दंडात गोळे यायचे. परत तरुण मुलांच्या बरोबर वागणं, चित्रांचा दर्जा राखणं भलतचं परिक्षा पाहणारं होतं.
त्यात परत घरातल्या अडचणींच्या, आमच्या हुरडा फेस्टिवलच्या रामरगाड्यात असाईन्मेट्स पुर्ण करणं..खरं सांगु आ बैल मुझे मार अशी माझी अवस्था झाली होती.
बरोबरीची सगळी मुलं पंचवीशीतली. त्यात परत त्यांचे त्यांचे ग्रुप्स जमलेले. आमचे प्राध्यापकही एकजण सोडता सगळे माझ्यापेक्षा लहान. पण तरीही मॅडम म्हणून, या वयात जिद्दीने शिकतात म्हणून कौतुकच व्हायचं. हळूहळू मी सगळ्यांमधे रुळले. कंफर्ट झोनमध्ये आले.
माझा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा झालेला होता. एक वर्षाचा ब्रीज कोर्सकरुन मी बी एफ ए ही डीग्री घेतली आणि नंतर मास्टर्सला मात्र फाईन आर्टला एॅडमिशन घेतली वा मिळवली म्हणा.
त्यामुळे ऑईल कलर्स, एॅक्रेलीक कलर्स, लिनसिड ऑईल, ब्रशेस, कॅनव्हास, स्ट्रेचर, कॅनव्हास स्ट्रेच करणं या सर्व ऐकिवात असलेल्या, पाहिलेल्या गोष्टी हाताळायची, कामं करायची वेळ आली.
त्याचही दडपण होतंच.
मला वाटतं एका ठराविक वयात सांसारिक स्थैर्यानंतर बहुतांश गोष्टीच्या परफेक्शनचा इतका पगडा बसतो ना मनावर की कशातही थोडंफार चुकायची देखील भिती वाटायला लागते. विशेषकरून महिलांना.
You always want to be perfect.
आणि आपलीही स्वत:बद्दल एक परफेक्शनिस्ट म्हणून प्रतीमा आपणच करुन घेतलेली असते. त्यामुळे या स्वनिर्मित गोष्टींचच दडपण फार असतं. त्यात पुन्हा स्किल नसणं, कसं-काय विचारु, करुचे अडथळे.
नाही म्हटलं तरी संसारात श्रमांची काम करुन द्यायला आसपास मदतनीस असतात. त्यामुळे अवजड, अवघड कामं परस्पर होतं जातात. पण इथे मात्र डिपार्टमेंटमध्ये स्ट्रेचर्स-पेंटिंग्ज घरी नेणं, घरुन डिपार्टमेंटमध्ये आणणं अशी सगळी कामं स्वत:लाच करावी लागायची. दिवसभर मॅडम म्हणून कौतुक करणारे अशावेळी ढुंकूनही पहात नसत माझ्याकडे.
मी पहिला कॅनव्हास जेव्हा स्ट्रेचरवर चढवायला घेतला तेव्हा मला हाच अनुभव आला. बरोबरीच्या मुला-मुलींचे पाच-सहा वर्षांपासून ग्रुप्स होते. त्यामुळे ते एकमेकांना या कामात मदत करत. पण मी एकटीच होते. सगळ्यांमधे मिळून मिसळून असले तरी ही कामं फक्त या मुलांनीच का करावीत ? बरं मुली तरी मदत करतील तर त्याही हमखास मित्रांच्या मदतीनेच कॅनव्हास स्ट्रेच करायच्या.
एक दिवस अशीच अकरा-साडेअकराला पोहोंचले. आज कॅनव्हास स्ट्रेच करायचाच या बेताने चंगच बांधला. दुपार पर्यंत याचा कॅनव्हास स्ट्रेच करणं बघ, त्याची हातोटी बघ असं केलं. दोघां तिघांना विचारलंही. पण असं करा तसं करा असे सल्ले देत बहुतेक मुलं-मुली चहाला निघून गेली. एकजणही म्हणेना की थांबा मॅडम मी तुम्हाला स्ट्रेच करुन देतो कॅनव्हास म्हणून. हॉलमधे एकटीच होते. म्हटलं जे होईल ते होऊ दे. आता कॅनव्हास आपणच स्ट्रेच करायचा.
(म्हणजे होऊन होऊन काय होणार होतं ? फारच चूक झाली असती तर कॅनव्हास वाया गेला असता. पण त्यावेळी तेवढीही चूक नकोशी वाटत कुणीतरी मदत करावी अशीच माझी अपेक्षा होती)
जे जे टिपलं होतं तसं करत पण बिनचूक कॅनव्हास स्ट्रेच केला. मग पुढचेही सगळे माझे कॅनव्हास मीच स्ट्रेच केले.
आत्तापर्यंत मित्रांच्या मदतीने कॅनव्हास स्ट्रेच करुन घेणा-या इतर तरुणीही मग माझं कौतुक करुन लागल्या. नंतर एकदोघी मिळूनच आम्ही आपापसातले कॅनव्हास स्ट्रेच करु लागलो.
कॅनव्हास स्ट्रेच करणं काही फार मोठी गोष्ट नाहीये. पण त्यावेळी मी त्या गोष्टीचा बाऊ करुन घेत स्वावलंबी बनण्यात अडथळा करुन घेतला होता.
Today I am happy that no-one helped me that time for this. Otherwise I would have not have had this skill and independence.
म्हणजे वरवर सुभग दिसणाऱ्या आत्मविश्वासाला अशाही शंका-कुशंकांच अस्तर असतं म्हणायचं तर.
उद्या आमच्या मालती आर्ट गॅलरीतर्फे एक कार्यशाळा आयोजित केली आहे. आयोजकांतर्फे स्ट्रेचरसह स्ट्रेच केलेले कॅनव्हास देण्यात येणार आहे. आता मीही ब-यापैकी आयोजकांमधलीच असल्यामुळे काल दोन-तीन तास बसून सात-आठ कॅनव्हास दणादण स्ट्रेच केले. डिपार्टमेंटमधले सुरवातीचे दिवस आठवत स्ट्रेचर्स हातावेगळे केले. आता सहजगत्या सफाईने कॅनव्हास स्ट्रेच करणं जमतयं, तरी एका बैठकीत एवढे कॅनव्हास स्ट्रेच केल्यामुळे दंड भरुन आले हे सांगणं नकोच.
No comments:
Post a Comment