Saturday, 23 February 2019

मनीप्लांट आणि मधमाश्या.

नाईलाजाने उन्हाळा मनावर घेतलाय.
घरातले जुने माठं-गिठं धुवून भरुन ठेवलेत. फेसबुकला बाजूला सारत एक दिवसा आड तरी झाडांना स्वहस्ते पण काटकसरीने पाणी द्यायचा पण मनोमन केल्या गेलाय. चिंच उन्हाला टाकलीये. घरगुती चिंचेचा सॉस करुन ठेवायला पाहिजे ना. झटपट पाणीपुरी वा भेळ करुन खायला.
हिवाळ्यात घराबाहेर ठेवलेले पाण्यातले मनीप्लांटस उन्हाने करपायच्या आतच घरात घेतलेत.
रोज या बरण्या घरात घेईन म्हणते पण राहुनच जात होतं हे काम. पाणी पिऊन ग्लासातलं उरलेलं पाणी या बरण्यांमधे, पॉटसमधे टाकायला गेलं की भुर्रकीनी साताठ मधमाश्या उडायच्या या बरण्यांमधनं. या काचेच्या, चीनीमातीच्या बरण्या भलेही उन्हात असतील पण मनीप्लांटसच्या घनघोर मुळांजवळचं पाणी भलतचं शितल असतं. आणि तेच गारीगार पाणी प्यायला या मधमाश्या गेले अनेक दिवस झाले नियमितपणे येत आहेत. त्यांचा त्रास काहीच नाहीये पण उन्हामुळे आता झाडं घरात आणलीच पाहिजेत. हिरवेपणाने घरही जरासं टवटवीत दिसेल आणि झाडंही जगतील.

तर आजच्या सकाळच्या कामसू उरकात हेही काम निर्ममपणे उरकून टाकलं. बरण्या स्वच्छ धुतल्या, झाडं धुतली, मुळं स्वच्छ केली, गार स्वच्छ पाणी भरलं आणि घर सुशोभित करणा-या मोक्याच्या ठिकाणी या बरण्या स्थानापन्न करुन दूसरा चहा घेत फेसबुक चाळत बसले तर नेहमीप्रमाणे मधमाश्यांची झुंड पाणी प्यायला हजर. पण आज ती गार पाण्याची जागा अस्मादिकांनी ओकीबोकी करुन ठेवलेली. गुं...गुं...करत ५-७ मिनिटं मधमाश्या पाण्यासाठी तिथल्या तिथेच घोंघावल्या आणि नंतर तहानलेला जीव घेऊन तशाच नाहीशा झाल्या. खरंतर माझ्या वागण्याचं वाईटच वाटलं. पण मलाही नाईलाजाने ठरवावं लागलं. झाडांचा जीव कम् घरातली हिरवाई का मधमाश्यांची तहान. निर्णय तर घेतलेलाच होता तरीपण गार पाण्याच्या आशेने घोंघावणा-या या तहानलेल्या मधमाशांनी जीवाला चुटपुट लावली.

No comments:

Post a Comment