अंदाज अपना..अपना.
शहरी किंवा निमशहरी भागातली एकही गृहिणी अशी नसेल की जिने संसारात कधी मेजरींग कपस् किंवा मेजरिंग स्पुन्स वापरले नाहीत. आयुष्यातली, संसारातली तरत-हेचे खाद्यपदार्थ करुन बघायची, खाऊ घालायची पण एक सुरसुरीच असते. काय परफेक्ट शब्द आहे बघा. सुरसुरी. पेटली की स्वत:ही तेजाळते, आसमंतही झगमगून टाकते, आणि दूरपर्यंत दरवळतेही. पण पटकन अस्तगतही होते. असो.
तर एकेकाळी घाबरत व तोलून-मापून-मोजून स्वैपाक करणारे आपण या स्वैपाकात कधी तरबेज होतो तेही आपल्याला कळतं नाही. मग आपली मुलगी वा भाच्ची जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ कसा करायचा हे विचारते तेव्हा आपण रोजच्या गोष्टीतली एखादी गोष्ट इतकी पटकन सांगतो की घे..अंदाजाने. अगं पण अंदाज म्हणजे काय आई-आत्या ? पाव चमचा, अर्धा चमचा, एक चमचा ? चमच्याचा साईझ काय ? वाटी कोणत्या आकाराची ? या मुलींना बेसिक प्रश्न देखील फार पडतात बुवा. बरं आपल्याही हातात या गोष्टी आता इतक्या सहज बसलेल्या असतात ना, की आपल्यालाही उत्तर पटकीनी देता येत नाही. पण खरंच Practice makes सहीमें you perfect.
😊
आता रोजचं आपलं तिखटाळं घ्या. किती वैविध्यपूर्ण आणि त-हेवाईक मसाले असतात यात. साधारणपणे यातले चमचेही एकाच साईजचे असतात. पण आपला मोहरी-जि-यांचा, हळद-तिखटाचा, मेथीदाणे-उडीदडाळीचा अंदाज झोपेत सुध्दा चुकणार नाही. आणि सगळ्या मसाल्यांचा बादशहा हिंग ? चमचा असो वा नसो. पावडर असो वा खडा असो, सहसा अंदाज चुकणारंच नाही.
तसचं ते आवडतीची साखर आणि नावडतीचं मीठ. तेही बरे हुकमाचे ताबेदार असल्यासारखे चवीबरहुकूमच पडतात जसा जसा संसार मुरत जातो तसा.😌
अर्थात आपली हुकूमत आपल्या सरावापुरतीच असते. करा बरं शंभर जणांचा चहा वा भात. अंदाज जरा चुकणारंच. गावोगावी भंडारे करणारे महाराज किलोंच्या मापानेच डाळ-तांदूळ शिजवू शकतात. वाटीचं माप म्हणजे पोरखेळ वाटतो त्यांना.
तर असा आहे सरावाचा, अंदाजाचा महिमा.
मग तो मैदानावरचा खेळ असो वा नाटकाचा प्रयोग असो वा स्वैपाकघरातली कर्तबगारी असो. Perfect practice makes you perfect.
उरलेल्या दुधाची झटपट खीर बनवताना, बेधडकपणे त्यात मुठीने साखर टाकताना सुचलेली ही पोस्ट आहे.
😁
No comments:
Post a Comment