Thursday, 31 January 2019

थंडी आणि दही, ताक, लोणी.

हिवाळ्यात पहिली संक्रांत म्हणजे संकट कुणावर असेल तर ते दही लागण्यावर आणि साईच्या दह्यातून लोणी निघण्यावर.
थंडी म्हटलं की दही आंबट होतं नाही, साहजिकच विरजणात दम नसतो मग आपसूकच साईचं दहीही जेमतेमचं विरजतं. त्यात थंडी, भांडी थंड पडतात. अगदी चोवीस तास जरी विरजणाचं भांड बाहेर ठेवलं तरी लोणी सुटतंच नाही. त्या रविने दही घुसळून अगदी दंडात गोळे येतात, कपडे-भिंती-ओटे शिंतोड्यांनी भरतात तरी लोण्याचा हट्टीपणा संपतच नाही. नेमकं याच वेळी घरातल्यांना अनाहुत सल्ले द्यायचं स्फुरण चढते. अगं भांड मोठं घेत जा, रवि गरम पाण्यात बुडवं, चांगलं गरम पाणी टाकं त्या साय-ताकात, अगं मिक्सर वापर..झट्टकिनी लोणी निघेल बघ. एक ना दोन फुकटचे तेही दुरुन सल्ले.

खरंतर गेली पंचवीस वर्षं सगळ्या सिझनमधे आपण गोळा-गोळा लोणी काढलेलं असतं, झक्कास तुप कढवलेलं असतं. पण या गोष्टीकडे काणाडोळा करुन ही सल्ल्यांची विमानं भर थंडीत अंगावर थडकत असतात.
आधीच आपण या लोणी प्रकरणाने वैतागलेलो असतो, त्यात हे घरचे आहेर.
रागारागाने रवि अजूनच तडाखेबंद चालते, मग अजून शिंतोडे, अजून खळबळ...पण काही म्हणा या झटापटीत लोणी जरासं का होत नाही पण ताकापासून वेगळं होतंच.

माझी स्वैपाकीण म्हणते, ताई...कुठे ते चुंबाळत बसता, रविने फिरवत बसता ? झर्रकीनी मिक्सर फिरवायचा. दोन मिनिटात लोणी. दहा मिनिटात तूप. कुणी सांगितली आहेत ही बाळांतपणं करत बसायला आणि हातं दुखवून घ्यायला.
नाही गं बाई. लोण्यासाठी आणि मिक्सर ? मुळीच नाही. रविने लोणी काढण्याची, लोणी वर येताना बघण्याची मजाच काही और आहे. हळूहळू ताकापासून वेगळं होणारं, छोट्या पासून मोठा गोळा होतं वरवर सरकणारं लोणी पहाणं, घुसळणीच्या आवाजावरुनच लोणी सुटायला अजून किती वेळ लागेल याचा अंदाज येऊ शकणारं ज्ञान याचा आनंद काही अफलातूनच आहे.
परत घरामधे कुठल्या न कुठल्या जत्रेतून, गावातून जमवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रव्या असतातच. त्या कधी वापरायच्या ? मला तर जत्रेत भटकून लाकडी वस्तू जमवायचा भलताच सोस आहे. अगदी नाहीच काही जत्रेत आवडलं तरी पोळपाटं, लाटणी, सांडश्या, तवे, रव्या आणि गेलाबाजार छोट्या कढया-खलबत्ते तरी घेतलेच जातात.
ही पारंपरिक आयुधं रोजच्या जगण्यात वापरताना भलतचं कृतकृत्य वाटतं बुवा आपल्याला.
ही वस्तू कुठे, कधी विकत घेतली, तिचं ऐतिहासिक महत्त्व रुंजी घालत रहातं मनात-डोक्यात अशा वस्तू वापरताना. त्यात ती वस्तू जूनी-पुराणी, आई-आजीच्या वापरातली असेल तर अजूनच एक भावनिक संवाद साधल्या जातो आपलाच आपल्याशी.
मग आता एवढी ह्रद्य गंगाजळी पदरी पडत असताना कोण वापरेल हो ते मिक्सर-फिक्सर. मला आपलं रविनेच घुसळायला आवडतं ताक-दही. आता होतो हिवाळ्यात थोडा त्रास, पण बाकीचे दहा महिने तर बिनबोभाट काम होतं ना !

माझ्या वडिलांचं फार आवडीचं काम होतं साय दही घुसळायचं. थंडीत तर हमखास गरम पाणी टाक टाकून ताक पांचट करुन ठेवायचे बाबा.
तशीच ती एक्स्चेंजमधे आलेली परदेशी मुलं. उत्साहाने ताक करणार, लोणी काढणारं.
त्यांना तर हे गवळ्याचं रतीबी दुध घेणं, साय जमवणं, विरजण लावणं, सायदही घुसळून लोणी काढणं, लोणी अडवून तूप करणं ही प्रोसेसच भलती अप्रुपाची वाटते.
नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि प्राचीन इजिप्त देश फिरुन आली आहे. कुठेही घरपोच दुधाचा रतीब टाकणारा गवळी दिसला नाही. सगळीकडे पॅक्ड दूध-दही-लोणी-तुप.
अशा घरगुती पद्धतीने, पारंपरिक रितीने दुध-तुपाची सायकल पुर्ण करणारा भारत एकमेव देश असेल.
आता इतकी अनन्यसाधारण, टाईम टेस्टेड आणि अभिमानास्पद भारतीय परंपरा आपण नाही चालवायची तर कुणी चालवायची ?

No comments:

Post a Comment