आता कुणाला सांगितलं तर खरं नाही वाटणार, पण मी माझ्या आईला सोबत म्हणून फार दिर्घकाळ पर्यंत संक्रांतीच्या हळदीकुंकाला हजेरी लावली आहे.
आमच्या अवाढव्य कोटला कॉलनीत तर रेलचेल असायची या संक्रांतीच्या हळदीकुंकाची. जवळ जवळची घरं. साधारण एकाच स्तरातली, विचार सरणीची कुटुंब शेजार पाजारी असायची. त्यामुळे खरेच सारखे शेजारी असतील तर दोघी-तिघी गृहिणी मिळून हळदीकुंकू करायचा घाट असायचा. जागा, श्रम आणि खर्च शेयर केला जायचा. त्यातही मुलं आणि मुख्यत्वे एकमेकांच्या मुली समवयीन असल्या तर भलताच बहार यायचा या हळदीकुंकवाला. सामंजस्याने एकमेकांकडच्या चांगल्या, भारी वस्तू वापरात यायच्या. एकीचा गालिचा, टिपॉय, अत्तरदाणी तर दुसरीचे सर्विंग ट्रेज्, टेबल क्लॉथ आणि काचेचे ग्लासेस वा इतर लेटेस्ट वस्तू. साहजिकच एकमेका सहाय्य करु हा मंत्र असल्यामुळे हळदीकुंकू दणक्यात व्हायचं.
आमच्या शेजारी देशपांडे मावशी रहायच्या. काका पोलिस डिपार्टमेंटमधे इन्स्पेक्टर. मावशी शाळेत शिक्षिका. मोठी कॉलेजकन्या तर धाकटी माझ्या बहिणी बरोबरीची. आपण बरं आपलं काम बरं असं त्यांचं घर तर आमचं सहाजणांच राबत्याच घर.
त्यात आईचं शिवण, उत्साही गणपती, शारदोत्सवाचे कार्यक्रम. पण आमच्या दोन्ही कुटुंबांची घट्ट मैत्री होती, आजही आहे.
तर आई आणि मावशी मिळून दणक्यात हळदीकुंकू करायच्या. दोन घरांमधल्या चौकात रंगबिरंगी चादर कम् गालिचा टाकायचा. मग एक ऐटबाज टिपॉय ठेवायचा.(त्याकाळी सनमायकाच्या टॉपवर चहाचे ट्रे ठेवायला व खालच्या फळ्या कम् पट्ट्यांवर वर्तमानपत्र व ललना, माहेर, गृहलक्ष्मी असली मासिकं ठेवायला जागा असणारे लाकडी टीपॉय असणं हे भलतंच मॉडर्नपणाचं आणि आर्थिक सुबत्तेचं लक्षण होतं.)
मग असेल तर सोफासेटही ठेवला जायचा.
टीपॉयवर स्टीलच्या थाळीत चांदीचे करंडे, अत्तरदाणी, गुलाबदाणी आणि असलाच तर एखादा देखणा चांदीचा बाऊल, तिळगुळ ठेवायला. सुपारीचं भांडही असायचं. घरातलं जे काही उत्तम आहे ते सगळं यावेळी वापरण्यात येई.
मग त्या महिलांच्या साड्या, नव्या फॅशनचे ब्लाऊजेस, वेण्या, गजरे..मुलींचे छानसे फ्रॉक्स, परकर ब्लाऊज, आईचे मोत्याचे दागिने, स्टायलिश क्लिपा, हेयर बॅन्डस्, शोची फुलं, फ्लॉवर पॉटस... अक्षरशः न संपणारी यादी.
आपल्याकडे खरंतर सततच सणवार होत असतात. सत्यनारायण, महालक्ष्म्या आणि चैत्रगौरीचं हळदीकुंकू असे बरेच लहान-मोठे सार्वजनिक कार्यक्रम पण होत असतात. पण बाजी मारुन जातं संक्रांतीच हळदीकुंकू. एकतर मकर संक्रमण ते रथसप्तमी असा भरपूर दोन-तीन आठवड्यांचा अवधी मिळतो हे हळदीकुंकू करायला. सिझनही मस्त असतो. आणि धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक उत्साह जास्त असतो या हळदीकुंकवात. आणि राज्य म्हणाल तर फक्त महिला आणि महिलांचच. आलं आमंत्रण की निघालीच बाई.
हल्लीची मोबाईलवरची डिपेंडन्सी बघून तेव्हा घरोघर आमंत्रणं कशी होत असतील याचं फार आश्चर्यच वाटतंय. बरं घरोघर जाणं म्हणजे पायपीटही भरपूरच व्हायची. तेव्हा काही हल्लीसारखी वाहनांची रेलचेल नसायची. शुक्रवार-शनिवार-रविवार तर बघायलाच नको. नातलगात, घनिष्ठ मित्र परिवार सामंजस्याने दिवस ठरवले जात. आमचं शुक्रवारी तर तुमचं रविवारी. एकुणच फारच उत्साहाचं वातावरण असायचं या हळदीकुंकवात.
आम्हा दोघी बहिणीत आणि देशपांड्यांच्या मोहिनीत कुणी अत्तर लावायचं, कुणी गुलाबपाणी शिंपडायचं तर कुणी सुपारी द्यायची यावर बराच उहापोह कम् हट्टी काटाकाटी व्हायची. अत्तर लावणं जास्त उच्च आणि ग्लोरिफाईड काम होतं, मग गुलाबजल शिंपडणं. सगळ्यात हलकं काम म्हणजे सुपारी देणं अथवा रिकामे चहा-कॉफीचे ग्लास उचलणं. बरीच धुसफूस झाल्यानंतर मग आम्ही सामंजस्याने ही कामं आलटून पालटून करत असू. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हळदकुंक लावणं, तिळगुळ देणं आणि संक्रांतीचा आवा लुटणं. ही कामं आई आणि मावशी हसत खेळत करत. एकतर दोघींच्या मैत्रिणीही ब-याच कॉमन होत्या. दोघीत मिळून हळदीकुंकू असायचं त्यामुळे इतर थाटा बरोबर आव्याच्या वस्तू पण झकासच असायच्या. मैत्रिणींमधे त्याचीही आम्हाला मिजास असायची.
त्याकाळी एक नवीनच पध्दत आली होती. पाच प्रकारच्या शंभर वस्तू आणायच्या. आणि मग विस-विसच्या चिठ्ठ्या करायच्या. प्रत्येक महिलेला चिठ्ठी उचलायला सांगायची. जी वस्तू निघेल ती द्यायची. हे चिठ्ठी प्रकरण एग्झिक्युट करण्यातही आमची अहमिका असायची. जे काही उत्तम आणि स्टाईलिश ते आपल्या राशीला आलं पाहिजे हा खाक्या. त्याकाळी आवा म्हणून ब-यापैकी बिनकामाच्या पण रंगबिरंगी प्लास्टिकच्याच वस्तू दिल्या जायच्या. हळूहळू त्यात बदल होत उपयोगी वस्तू देण्याकडे लोकांचा कल वाढला.
पण मग इतर बदलही फार होतं गेले. तिळगुळाबरोबर फार तर फार चहा-कॉफी-मसाला दूध द्यायची पध्दत मोडीत निघून काहीतरी स्नॅक्स द्यायची पध्दत रुळली. एकत्रीत हळदीकुंकू करणं मोडीत निघालं. जो तो स्वतंत्रपणे बडेजावाला शोभेसं हळदीकुंकू करु लागला. अत्तर लावायला, गुलाबपाण्याला घरातल्या कामवाल्या ठेवायची पध्दत आली. सजलेल्या, धजलेल्या यजमानीणीला फक्त हळदकुंक द्यायचं आणि गप्पा ठोकायचच प्राईम काम राहिलं.
हल्ली तर अक्षरशः सात नाही वाजत की हळदीकुंकाच्या निमित्ताने केटररच्या जेवणावळी उठतात. एक-दोन किलो चांदीच्या झगझगीत वस्तू प्रदर्शित होतात.
यजमानीणीचा मेकअप, कुरळ्याचे सरळ, तर सरळचे कुरळे केलेले केस, रेशमी साड्यांची सळसळ, सोन्याच्या लेटेस्ट दागिन्यांची झळाळी, नेत्रदीपक तेजस्वी हिरे...घराची उत्तम सजावट, पडदे, गालिचे, फुलं...जे बघाल ते उत्तमच असतं. भरपूर परिश्रम करुन, तयारी करुन ४०-५० हजारांच चंदन करुन ही हाय प्रोफाईल हळदीकुंकू साजरी केली जातात. आव्याच्या वस्तू देखील अशाच किमती असतात. कोण कोण आलं आणि नाही आलं याचाही व्यवहारी हिशोब मांडला जातो. असल्या प्रस्थी हळदीकुंकाची बोलावणी पदरात पाडून घ्यायचीही मग अहमिका लागते महिलांमध्ये.
Inshort It has become an annual event of display and show of.
माझ्या लग्नानंतरही मी काही गॅस डिलर्सकडे जात असे हळदीकुंकवाला. तेवढीच भेट आणि हाय-हैलो होतं. पण कुठून तरी दमून आहे त्या कपड्यात जाऊन यजमानिणीचा विरस करायचा, किंवा स्वत:ला मुरड घालत उगाचच नटूनथटून बेगडी हजेरी लावायची. दोन्हीही कंटाळवाणेच एक्सरसाईजेस आहेत, होते.
आता अगदीच शेजारी कुणी बोलावलं तरच जाते मी.
पण आता संक्रांत म्हणजे या कालावधीत भांडी बाजारात चक्कर मारायची. भरपूर माल असतो. चमचे-झाकण्या-वाट्या असल्या वस्तू ढिगांनी व स्वस्त मिळतात. महिलावर्गांनी बाजार तुडूंब भरलेला असतो.
माझ्या प्रिय एॅपकोच्या(Andhra Pradesh co, पण आता Tisco.) दुकानात सणानिमित्त भरपूर स्टॉक आलेला असतो. फेस्टिवल डिस्काउंटही तब्येतीत असतो.
त्यामुळे या निमित्ताने थोडीफार ही खरेदी करायची आणि तिळगुळ वाटतं गोड बोलायचे वायदे घ्यायचे आणि आपणही गोड बोलायचा प्रयत्न करायला लागत संक्रांत साजरी करायची.
काल भांडी बाजारातनं चमचे आणले.
चमचोंकी तो हरदम कमीही रहती है !
तिथेच ही उदबत्तीची घरं दिसली. किती उपयोगाची आहेत, होतील माहित नाही. पण पाहता क्षणीच भाळावं असं डिझाईन नक्कीच आहे.
No comments:
Post a Comment