Wednesday, 30 January 2019

Egypt...20 हरघडा, पोलिस.

प्रवासातल्या ब-याच चिठ्ठ्या चपाट्यांनी भरलेली पर्स साफ करायला घेतली तर इजिप्तमधल्या 'गो बस'ची तिकिटं सापडली आणि तिथला बसप्रवास आठवला.

नाईलकाठचं लुक्सार ते रेड सी लगतचा हरघडा असा तो प्रवास होता. अडीच तीन तासांचा नाईल, वाळवंट, समुद्रकिनारा असा तो प्रवास होता. सकाळची बस. पंधरा मिनिटांत प्रवासी जमले. बहुतांश पर्यटकच. एक बोलका सावळा माणूस आणि त्या बरोबर गोरीपान परदेशी बाई. दोघंही तसे पोक्तच. तर तो सावळा माणूस इजिप्तशीयनच होता. पण त्याची 'my woman' जर्मन होती. तोही आता अनेक वर्ष झाली जर्मनीतच रहातो. वर्षातनं काही दिवस सुट्ट्यांचे इजिप्तमध्ये असतात दोघंही जणं.

गडी भलताच गप्पीष्ट. ऐकणारे मिळाले की सुरु. थोडक्यात बसमधे बसे पर्यंत भरपूर गप्पा झाल्या.
रिझर्व्हेशन प्रमाणे जो तो बसला. हां..इथेही टीप पध्दत आहेच बरं. एसीबसच्या डीक्कीत सामान ठेवणा-यालाही टीप म्हणे. तो बॅग्जना स्टिकर लावून सामान आत ठेवणार की त्याला टीप. शेवटी शेवटी तर आम्ही अंजान मारायलाच शिकलो होतो.
प्रसन्न प्रवास. हवेत छान गारठा. बाहेर उबदार ऊन आणि त्या उन्हात झळाळून निघणारं वाळवंट, देखण्या खडकाळ टेकड्या. एका ठिकाणी चहासाठी थांबून बस निघाली. पण लगेचच एका पोलिस चेकपोस्टला गाडी थांबवण्यात आली. हे आम्हाला तिथले बंदुकधारी जेम्स बॉन्डीश् पोलिस बघून कळलं.
भाषेचा प्रश्न होताचं. पण एकाचं बघून सगळेच उतरले. का, कशासाठी काही पत्ता नाही. प्रवाशांना सांगायचीही कुणाला गरज वाटत नव्हती. काळ्याभोर सुट-बुटातले, काळेच ग्लासेस घातलेले, रिव्हॉल्व्हर बाळगून असलेले तरणेबांड चारेक पोलिस, त्यांचे साहेब, गाडी भोवती फिरुन डीकीतलं सामान काढायला सांगताहेत. एकानी बॅगा काढल्या की मग बाकीचेही तेच करायला लागले. सगळे प्रवासी चुपचाप. अगदी गन पॉईंवर वेठीला धरल्यासारखे. कोणी काही बोलेना की विचारेना. We were just randomly stranded by police, (I mean killer police😊)

भररस्त्यात आम्ही खोळंबलेलो. सगळ्यांचं सामान निघालं. फक्त त्या जर्मन-इजिप्तशीयन दांपत्याचं आणि आमचंच राहिलं. सम हाऊ तो गप्पीष्ट पोलिसांशी काहीतरी बोलला. आणि मग आम्हाला खूण करुन म्हणाला की राहुद्या तसंच सामान तिथे म्हणून. मग सगळ्या पोलिस फौजेने गाडी तपासली. डिकीतले खोके उघडून बघीतले. ड्रायव्हरची जागा कसून तपासली. दोघातिघा प्रवाशांना बॅगा उघडायला लावल्या. उगाचच काहीतरी उचकपाचक केली. अतिरेकी कारवाया करणा-यांच्या काय कपाळावर लिहिलेलं असतं की काय ? उगा आपल्या त्या चारचौघांच्या इज्जतीचा पंचनामा झाला सगळ्यांदेखत. काहीही हाती लागलं नाही.
दरारी निशब्दपणे सगळ्यांनी बॅग परत आत ढकलल्या. तोपर्यंत बसभोवती तपासणी करत फिरणा-या त्या पोलिस साहेबाची नजर आमच्यावर पडली.
आयला, आता आपण मायलेकी संशयास्पद दिसायला लागलो का काय ?
पण नाही.
उन्हात तळपणा-या त्या देखण्या पण बेडर चेह-यावर ओळखीचं हसू उमटलं आणि लगेच उस्फुर्तपणे इंदिया..वेरी गुड आणि अमिताभ अशा तिन हुकमी फैरी त्याने अत्यानंदाने झाडल्या आणि आमच्या जीवात जीव आला.
अक्षरशः आमच्या परीने वातावरण हलकं झालं आणि काही वेळातच काहीच झालं नाही अशा निर्विकारपणे बस आणि प्रवासी निघाले.

खरंतर प्रसंग खुपचं छोटा आणि तसा सामान्यचं. आपल्याहीकडे अशा झडत्या घेतातच की. पण परक्या देशात, तेही भाषेची अडचण असताना, त्यातही जरा हुकूमशाही वातावरणात वावरताना नाही म्हटलं तरी एक दबाव असतोच. अशावेळी प्रकर्षाने आपला देश, तिथलं मोकळं वातावरण आठवतंच आठवतं. तरी इजिप्तमध्ये इंदिया आणि बॉलीवूड प्रेमाचं हुकमी कार्ड आपल्या हातात असतं.

रेड सीच्या काठावरची हरघडा, सुकैना ही आता फार अप् कमिंग ठिकाणं झाली आहेत. बहुतांश
युरोपियन्सनी इथे हॉलिडे रिसॉर्टस् बांधले आहेत. स्वच्छ समुद्रकिनारा, सुरेख हवामान आणि पारंपरिक इजिप्तशी फटकून असलेली संस्कृती. इजिप्तचा एक वेगळाच चेहरा इथे पहायला मिळतो.
बहुदा समुद्रकिना-याच्या इझी एॅक्सेसमुळे पोलिस जास्त जागरुक असावेत.

No comments:

Post a Comment