मी नुकतच फेसबुक अकाऊंट उघडलं होतं. मराठी टायपिंग शिकत होते. रोज काही तरी वाचलेलं, भावलेलं टाईप करुन पोस्ट करत असे. तर एकदा एका दैनिकात विस्मरणाच्या रोगाने पछाडलेल्या तीन भारतीय दिग्गजांच्या सद्यस्थिती बद्दल लिहून आलं होतं. अटल बिहारी बाजपाई, जॉर्ज फर्नांडिस आणि दिलीपकुमार हे ते तीन दिग्गज. तरुणपणाच्या धडाडीने, पोक्तपणातल्या समंजसपणाने आपल्या कर्तृत्वाचा अमीट छाप भारतीय इतिहासात उमटवणारे हे महारथी विस्मरणाच्या रोगाने अगतिक झालेले होते. ही बातमी वाचून मनात फार कालवाकालव झाली होती.
यातले अटलजी एवढ्यातच गेले, आज जॉर्ज फर्नांडिस पण गेले. दिलीपकुमार दवाखान्याच्या वा-या सातत्याने करताहेत.
खरंतर या तिघांचाही तारुण्यातला जोश, हिंमत वा कर्तृत्व मी दुरुनच ऐकून होते. आई-बाबा नेहमी गंगा-जमना, मुगलेआझमची भरभरून तारीफ करायचे. त्यांच्या या दिलीपकुमार प्रेमापोटी मी खूप पूर्वी लिडर हा सिनेमा देखील अप्सरा या थियेटरमधे पाहिल्याचं आठवतंय. तसंच रोजच्या दैनिकातील बातम्यावाचून बाबा, शेजारी आणि नातलग पुरुष मंडळींच्या तोंडी कायम जॉर्ज फर्नांडिस आणि दत्ता सावंत, मृणाल गोरे यांच नाव असायचं. सातत्याने मुंबई कामगारांच्या लढ्याच्या बैठकीतल्या चर्चा कानावर पडायच्या. त्यामुळे ही नावं तेव्हापासूनच मनावर कोरली गेली होती.
आमच्या एक अत्यंत जवळच्या ऋणानुबंधी आर एस एसच्या विचारधारेच्या होत्या. आणि नागपूर स्थितच होत्या. आम्ही म्हणजे पाध्ये, कोळनूरकर गणगोत तसे कॉंग्रेसवादी. पण काठावरचे. शंकरराव चव्हाणांच्या बंगल्याशेजारीच माझ्या आजोबांचा बंगला होता. तर कायमच हे आर एस एस-जनतापार्टीवालं दांपत्य आमच्याकडे मुक्कामी आलं की चहाबरोबर चर्चा वा मतभेद भलतेच रंगायचे. दोन्ही पार्ट्या आपली बाजू लावून धरायच्या पण अटलजींच नाव आलं की बाबा जरा नरमाईने बोलत. अटलजींच्या व्यक्तीमत्वाची तीच जादू होती. एक निर्मळ राजकारणी, समाजवादी व्यक्ती.
पण जॉर्ज फर्नांडिस म्हणजे ढाण्या वाघ. कायम आवेषात आणि कामगारांच्या जोडीने रस्त्यावरच. साहजिकच आक्रमकता हा स्थाईभाव. पण ही आक्रमकता अनाढाई नसायचीच कधी. अक्षरशः पोटतिडकीने भांडायचे जॉर्ज फर्नांडिस.
मग जेव्हा अटलजींच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं राज्य आलं त्या काळात मी इंडिया टुडे फार चोखंदळपणे वाचत असे. तिथे मग जॉर्ज फर्नांडिस यांच्या मंत्रीपदामधल्या सरळ साध्या कथा वाचनात यायच्या. म्हणजे राज्यकर्त्यांच्या भुमिकेत सुध्दा जॉर्ज फर्नांडिस यांचा तोच बाज राहिला.
पण नंतर मग राजकारणानेही बरीच अगम्य वळणं घेतली. समिकरणं बदलली. जॉर्ज फर्नांडिस काय अटलजी पण भांबावले. हळूहळू वयाच्या तगाद्याने यांना पछाडलं. विस्मरणाचा म्हटलं तर विदारक, मानलं तर सुखकारकं असा विळखा पडला.
आज जॉर्ज फर्नांडिस गेल्याची बातमी आली.
Entire nation mourns for such people by forgetting their political differences.
खरंतर आपल्या तेव्हाच्याही आणि आत्ताच्याही रामरगाड्यात या लोकांचं तसं किती महत्त्व असतं ?
तरीही फार चुटपुट लागते अशा एकेकाळच्या धुरंधरांच्या जाण्याने. जन पळभर म्हणतील हाय, हाय हे खरं करत जगरहाटी चालूच रहाते. तरीही एक कोपरा रिकामाच रहातो, कायमचा.
Because no more our nation is going to such people.
🙏
No comments:
Post a Comment