Monday, 28 January 2019

Egypt...19 पक्षां'तर

इजिप्त ट्रिपमधे आम्ही उत्तरेतल्या कैरोहून दक्षिणेतल्या आस्वानला विमानाने गेलो आणि परतताना मात्र लुक्सारपर्यंत रेल्वे मग बसनेच हरघडा, कैरो असा प्रवास केला. त्यामुळे इजिप्तचं वैविध्यपूर्ण अंतर्गत ग्राम्यजीवन, वाळवंट दुरुन का होत नाही पण पहायला मिळालं. तर याच प्रवासात काही काही घरांजवळ पांढ-या रंगाची भोकं असलेलं सिलेंड्रिकल, उंच पण निमुळतं बांधकाम दिसायचं. अर्थातच दूरुनच. बरोबर जाणकार कुणीच नसायच विचारायला. नेटवर शोधायलाही थोडीतरी माहिती पाहिजे ना ?
पण मग गिझाच्या पिरॅमिडस वरुन सकारा या प्राचीन भग्नावषेशं असलेल्या ठिकाणी जाताना अशी बांधकामं बरीच दिसली. एकदोनदा टैक्सी ड्रायव्हरला विचारलं पण त्यालाही काही कळेना. शेवटी हातावर चित्र काढून दाखवलं तेव्हा त्याला कळलं. तर ही युनिक रचना असलेली बांधकामं म्हणजे इजिप्तचे सुप्रसिद्ध कबुतर खाने-घरं.
ही आकर्षक कबुतरघरं बहुदा वेत, भुसा माती आणि विटांनी बांधलेली असतात. पाळलेली कबुतरं आत जा ये करु शकतील अशी मधे मधे पोकळ नळकांडी ठेवलेली असतात. अधेमधे काठ्यापण खोचलेल्या असतात. कबुतरांना बसायला. एकुणातच हे बांधकाम दिसतंच फार आकर्षक. कोनाडेयुक्त ऊंचेला, निमुळता, शुभ्र आणि पोकळ पिलर. भाषेचा प्रश्न गहन असल्यामुळे फार चौकशा करता आल्या नाहीत. पण गुगलकाकांनी रितसर यथायोग्य माहिती दिलीच.

तर हे कबुतरखाने दक्षिण इजिप्तची खासियत आहे. नाईलकाठच्या शेतीच्या वावरातल्या घरांजवळ ही कबुतरघरं हमखास दिसतात. ही घरं असणं हे थोडंसं वैभवाचं पण लक्षण मानलं जातं. तर ही कबुतरं पाळीव पक्षी म्हणूनही पाळतात आणि खाण्यासाठीही सांभाळली, पोसली जातात.
स्टफ्ड पिजन ही इथली स्पेशल डिश समजली जाते. अर्थात ही पिजन्स वावरातल्या धान्यावर पोसलेली आहेत का रेडी फूडवर पोसलेली आहेत यावरही या डिशची डेलिकसी ठरते.

मिस्र संस्कृतीच्या भग्नावषेशांमधे काही ठरावीकच पक्षी दिसतात. तेही देवाला अर्पण करण्याच्या थाळीतच त्यांच्या कलेवराचं स्थान प्रामुख्याने आढळतं. आणि सद्य परिस्थितीत तर फार कमी पक्षी इजिप्तमध्ये सरसकट दिसतात. आम्हाला तर फार मोजक्याच प्रकारचे आणि कमीच पक्षी दिसले. म्हणजे हे मला विषेशत्वाने कधी जाणवलं असेल तर जेव्हा मी पहाटेसच औरंगाबादला पोहोचले तेव्हा माझं स्वागत कोकीळेच्या कुजनानेच झालं. मग शिरस्त्याप्रमाणे सकाळीसच मांजरींचं-बोक्यांच आगमन झालं. त्यामुळे मग अंगणातल्या गचपणात ज्यांची घरटी आहे त्या इतर पक्ष्यांचा संभाव्य मार्जार धोका ओळखून चिर्र कलकलाट सुरु झाला.
And then I realised what I was missing in Egypt.

इजिप्तमध्ये इतक्या सहजपणे विविध रंगी, ढंगी पक्षी दिसत नाहीत. आणि आवाज तर आम्ही फक्त कावळ्याचाच ऐकला. कदाचित वाळंवटाचाही हा परिणाम असावा. पण इकडे तिकडे आनंदानी बागडणारे, विहरणारे, कुजन करणारे पक्षी इथे आम्हाला बहुसंख्येने दिसलेच नाहीत.
कबुतरं थोडीफार दिसली. पण तीही त्यांच्यासाठी उभारलेल्या घरांच्या प्रमाणात नाही.
या कबुतरघरांविषयी फार उशीरा कळलं. नसता एखादं घर जवळ जाऊन, आतून पहायला आवडलंच असतं.

आता हे लिहायला बसायच्या आधी विकिपीडियावर या घरांचा जरा धांडोळा घेतला तर बरंच घबाड हाती लागलं. Pigeons, pigeon houses and pigeon meat is the integral part of Egypt and near by countries.
या कबुतरघरांमधली अंडी आणि कबुतरं मुख्यतः खाण्यासाठी वापरतात तर जमलेली विष्ठा शेतात खत म्हणून वापरतात. तसेच गेलाबाजार कबुतरांच्या झुंजी, कवायतींच्या स्पर्धा पण होतात.
कबुतरांची पोस्टमनगिरी तर प्रसिद्धच आहे.
कबुतरांना दाणे टाकणं हा बुरखाधारी, हिजाबधारी जनानखान्यातला महत्त्वाचा विरंगुळा होता, कदाचित अजूनही असावा.
अर्थात हल्ली जरा बर्ड फ्ल्युमुळे कबुतरांना दूरच ठेवलं जातं.

तरीपण विस्तिर्ण कहरी वाळवंटातल्या कोंदणासारख्या ह्या नाईलकाठच्या हिरव्या वावरातल्या ग्रामीण वस्तीतली ही पांढ-या मिनारासारखी कबुतरघरं फार चित्तार्षक दिसतात.
अशी एखादी टोलेजंग इमारत आमच्या हिरण्यवरच्या कबुतरांसाठी बांधावी म्हणते.

No comments:

Post a Comment