Sunday, 27 January 2019

नाच गं घुमा...

नाच गं घुमा.

गेल्या काही वर्षांपासून शहरातल्याच एका शाळेला आर्थिक वा इतर तत्सम गरजा पूर्ण करणारी थोडीफार मदत आम्ही करत आहोत. गेल्या चार वर्षांपासून शाळा गावापासून फार दूर गेली आहे त्यामुळे माझं-आमचं नियमित जाणं होतं नाही तिथे. पुर्वी शाळा अगदी गावात होती तेंव्हा तर मी फारच रेग्युलरली जात होते शाळेत. तर हल्ली व्यक्तीश: सातत्याने जाणं कमी होतं पण या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मात्र आवर्जून जातो.

अगदी हातावर पोट असलेल्या पालकांच्या मुलामुलींची शाळा. त्यातही ब-याच जणांची कुटुंब मोडतोड झालेली. त्यामुळे अशा व्यवस्थेतून येणारी मुलं अंशतः गरीबच आहेत. साहजिकच सांस्कृतिक कार्यक्रम करायचा म्हटलं की ना ही पालकांकडे आर्थिक बळ ना ही शाळेकडे काही तजवीज. पैशाच्या अभावी तर एक-दोन वर्ष तर हे सांस्कृतिक कार्यक्रमच करता आले नाहीत. शेवटी आम्ही म्हटलं तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च आम्ही करतो, पण तुम्ही कार्यक्रम करा. हे असे सांस्कृतिक कार्यक्रम नकळतपणे पण फार मोठी शिदोरी आपल्या आयुष्यासाठी बांधून देतात. आणि तेवढंच शाळेची गोडी निर्माण व्हायला एक कारण. शाळकरी मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमांची फार ओढ असते.

तर यावर्षीच्या कार्यक्रमाला आम्ही दोघंही गेलो. प्रमुख पाहुणे, अध्यक्षांशिवाय अजून काही परदेशी पाहुणे पण आले होते. कार्यक्रमाची वेळ पाचची. मुलं तयार होऊन बसलेली साडे तीनची.
पाहुणे राऊळ्यांचे, कमिटी मेंबर्सचे, धडपड्या शिक्षकांचे सत्कार करण्यात, गौरवोद्गार काढण्यात-ऐकण्यात दोन तास गेले. कधीची तयार होऊन बसलेली, नाचायला, गायला उत्सुक असणारी मुलं बिचारी फार कंटाळली. भुकेजली पण असतील. खरंतर येणारे पाहुणे, कार्यक्रम करणारे सगळे बुजुर्ग आणि अनुभवी मंडळी असतात. तरी पण मुलांच्या कार्यक्रमात घड्याळाकडे दुर्लक्ष करत असले साचेबंद स्वागत-सत्कार सोहळे करण्यात, भाषणं ठोकत बसण्यात कुणालाच काही गैर वाटत नाही.
समोर नटूनथटून बसलेली कच्चीबच्ची आणि आपल्या लेकरांचं कवतिक पहायला आलेले हातावर पोट असलेले पालकं सगळेच वेठीला धरल्यासारखे या स्वागतिय सोहळ्यामुळे. अतिशयच चीड आली. समोरची बालकं कंटाळली आहेत, भाषणबाजी ऐकून पेंगुळली आहेत एवढंही भान एकाला देखील नसावं ? कमाल वाटली हा कार्यक्रम बघून.
बरं शिक्षिकांच ठीक आहे, मदत करणा-यांच स्वागत करावसं वाटतं त्यांना.
पण पाहुण्यांनी तरी ठाम रहावं ना !
अहो कसला परिचय आणि कसला तो सत्कार.
चार शब्दात शुभेच्छा द्याव्यात आणि मुलांसाठी स्टेज मोकळं करावं. खरोखर आपल्या संस्कृतीचं पण जरा जास्तच स्तोम वाढवून ठेवलंय सगळ्यांनी.

हल्ली सव्वीस जानेवारीच्या आसपासच बहुतांश निम्न मध्यमवर्गीय शाळांची गॅदरिंग्ज असतात. त्यामुळे गेले चारेक दिवस झालेत शाळकरी मुलांच्या आया असलेल्या माझ्या कामवाल्या कामावरती अनियमित येत आहेत, येत नाहीयेत. आज काय शाळेत बोलावलंय, आज काय कार्यक्रम आहे. कधी मीच जागेवर नाही. शेवटी आज जरा सगळ्या शिस्तीत आल्या. माझंही काम जरा जास्तच निघालेलं.

झाला का नाच मुलीचा ?
फरशी पुसता, पुसता...नाही वो ताई. आजून तं कारिक्रम व्हायचाय. काल लगी शाळत बोलिवलं व्हतं. म्हंजी बोलावून सांगितल्य की असा असा फ्राक हवाय नाचासाटी. तुमी तरी आना न्हायतर आमाला पैशे द्येवा. आता पाचसातशे रुपे कशे द्यायचे वो ताई. कुटलां तरी फुग्ग्या फुग्ग्यांचा लाल रंगाचा फराक असतो म्हनी. आता कुटं जावं, कुटं शोधावं ?
ती पोरगी बी नाचू नाचू बेज्जार झालीया. नाच म्हनलं की तिला काय सुदरतंच नाय बगा.
मला न सांगता-सवरता नाचात भाग घेतलाय तिनं, आता मला निभावनं भाग्चै. शाळा बी असले नाचं बसवत्येत ना की मायबापाचं तं कंबरडंच मोडत्ये. त्यात माजा नवरा ह्यो असला. कश्शाची काय फिकीर न्हाई. न बायकोची न लेकरांची. प्वोरानी पन नाचात भाग घेतल्येला. पन त्याचा काय कुटाणा न्हाई. जीनची प्यांट आन पिवळा शर्ट. शर्ट तर शेजारनीनंच द्येला. आन जीन प्यांट तर घरचीच हाय. दिवाळीत तं घ्येतली व्हती. हिच्या लाल फराकाचंच मला लई संकट पडलया...
फरशी संपली तशी संकटं नाही पण संकटांचा पाढा वाचणं थांबलं.

मग दुसरी आली.
झालं का नाच मुलीचा ?
नाही वो ताई. नाच न्हाई. ते सिरियल, सिनेमासारखं अस्त्ये बगा. काय बरं म्हन्त्येत त्याला ? टीव्हीवर बगतोय तसं वाटते बगा..नाटक का काय म्हनत्येत त्याला. लईच ब्येष्ट झाला बगा कारिक्रम. लगी सात्शेचं बक्शिस भेटले सर्व्यांना मिळून.
गेले चार दिसं जाले कामाला बी येईना पोरगी. मला बरं न्हाई, दवापानी सुरु हाय. पन हिला आपलं त्ये नाटकापूढं सुदरचना. उठली की पळत व्हती शाळतं. प्राक्टिस का काय करतेतना कारिक्रमा आदी.
भाग घ्येतला आन गेलं न्हाई की मास्तर बी आरडतो. कर बाई तुला आवडत्ये ते. माज्या नशिबाला तं कामं हैतंच.
ताई...वड्या संपल्यात, घासनी बी आना आता नवी.

No comments:

Post a Comment