Sunday, 27 January 2019

Egypt...18 आस्वान. टांगेवाला महंमद.

आस्वानच्या पहिल्या रात्रीचा धास्तीयुक्त धडा मिळाल्यावर आम्ही ब-याच सावध झालो. कुणाशीही, कुठलीही गोष्ट ठरवताना जास्त काळजीपूर्वक व्यवहार करायला लागलो. तर आमचं हे हॉटेल नाईल किनारीच्या सुप्रसिद्ध वाहत्या रस्त्यामागे होतं. तरीपण हॉटेल खाली वर्दळ असायचीच. हातगाडी वाले, गॅस सिलिंडर विकणारे, कचरा गोळा करणारे, टांगेवाले अशा ब-याच लोकांची तिथे सतत वर्दळ असायची. नाईल अगदी खेटूनच असल्यामुळे या तीराची, त्या तीराला ये-जा करणाऱ्या बोटींचे, नाईल क्रुजचे थांबेही या वाहत्या रस्त्यावरच होते. थोडक्यात रात्री उशीरापर्यंत जरी या भागात पायी भटकलं तरी भीती नव्हती. आस्वानला असेपर्यंत आम्ही भरपूर फिरलो इथे.

नाईलच्या काठाने दूरपर्यंत जाणारा कॉर्निश रोड. आस्वानचं नाईल नदीवरचं जगप्रसिद्ध धरण आणि अबूसिंबेल हे मंदिर फार जगप्रसिद्ध आहे. खरंतर हा भाग इजिप्तच्या दक्षिणेकडचा. सुदानला जवळ असणारा. साहजिकच सगळी प्रजा सुदानी छापाची, बरीचशी शिक्षणात मागे असणारी, कैरोच्या मानानी एकूणच ग्राम्य वाटणारी. बहुतांश पुरुषमंडळी थंडीच्या गरम गलेबियात आणि शालीचं मुंडासं-उपरणं बाळगून असलेले.

अख्ख्या इजिप्तपेक्षा इथे पर्यटनाची एक वाईट बाजू म्हणजे टीप मागणं आणि द्यायला लावणं. म्हणजे आधीच टैक्सीपासून कशाचेही रेटस जास्तच, त्यात परत ती टीपची भानगड, मागणी. जराशी घासाघीस मग कुणा एकाची नाराजी. आपल्याकडे ही टीपची भानगड नाही, नसावी. साहजिकच आम्ही वैतागायचो. बरं टीप काही ठरलेली नसते. सगळा खुषीचा मामला. आता एका ठिकाणाहून दूस-या ठिकाणी जायच भाडं तर आपण देतंच असतो. परत त्यात कसली टीप-बीप. पण आस्वानला तेच वळण आहे.

वर सांगितल्याप्रमाणे गलेबियातले ग्रामीण लोकं इतके फोटोजनिक दिसतात ना की बस. पण काढला फोटो की पैशासाठी मागे लागणारं. शेवटी तर आम्ही आधीचं फोटो ? नो मनी, असं कबूल करुन घ्यायचो मगच फोटो काढायचो.
हं..तर रात्री या नाईललगतच्या कार्निश स्ट्रीटवर फिरायला छान वाटायचं. गारठाही खूपच होता. आठ वाजत नाही की रस्ता तसा ब-यापैकी शांत होऊन जायचा. इथे ऐटबाज टांगे फार धावतात. रस्त्यावरती टैक्सीज आणि टांगे आणि नाईलमधे मोटरबोट आणि फेलूका बोटी हीच इथलं दळणावळणाची साधनं आहेत. तर शांत पहुडलेल्या रस्त्यांवरुन टॅच्..टॅच्...टॅच्....करत दुरपर्यंत धावत जाणारे टांगे बघत बसावे असे दिसतात. त्यात ते तरुण गाडीवान मुद्दामच टांगे टॉक, टॉक करत जोरात फिरवतात. टुरिस्टस्ना हाकारे देतात.
ऐटबाज डौलाने रस्त्यांवरनं दूर जाणारा टांगा आणि आसमंतात घुमत अस्तगत होणारा त्याचा टॅक..टॅक...टॅक....हा आवाज तडक आपल्याला अरेबियन कथांमध्ये आणून सोडतो. निदान मला तरी बालपणीच्या चित्ररुप अरेबियन कथाच आठवल्या. भलताच छान आहे हा आवाज रुपी अनुभव.
एकदा एकाचा व्हिडिओ रस्त्यावरनंच घेत होते तर
नो फोटो..नो फोटो, मनी, मनी म्हणत त्या गाडीवानाने खो दिलेला.

निघायच्या आदल्यादिवशी रेल्वेचं रिझर्व्हेशन करायला म्हणून बाहेर पडलो तर एक टांगेवाला मुलगा बसा, बसा म्हणून मागेच लागला. चला, आल्यासरशी ही पण मजा करु. घासाघीस करुन बसलोचं. स्टेशन तसं जवळच होतं. गाडीवान ही गप्पीष्ट होता. महंमद त्याचं नावं. आपल्याला आस्वानच कसं आवडतं आणि कैरो का आवडत नाही हे भरभरुन निटस इंग्लिशमधे सांगत होता. विशीच्या आतला तरुण होता तो. दिलखुलासपणे गप्पा मारत होता. आम्हीही फोटो काढत प्रश्न विचारत होतो. रॅम्बो हे त्याच्या घोड्याचं नावं होतं.
Some how महंमदचं आमचं टिपण जमलं. स्टेशनवरही उत्साहाने आमच्यासोबत आला. लायनीत उभा राहिला. भाषेच्या अडचणीमुळे आमच्यावतीने काऊंटरला प्रश्न विचारले. इथे रिझर्व्हेशनसाठी लेडिज आणि जेन्ट्स लाईनी होत्या. हा आमच्यावतीने लेडिज  लाईनमधे उभा राहिला. मग त्यावरुन तिथल्याच लोकांची आपापसात बरीच बाचाबाची झाली.
भाषा कळली नाही तरी भांडणातला आवेश एकशे एक टक्का भारतीय होता.
शेवटी गडी लायनीतून सरकला पण आम्हाला रिझर्व्हेशन मिळेपर्यंत तिथेच थांबला. उद्यापण मीच तुम्हाला स्टेशनवर सोडायला येतो म्हणाला. आत्ताही गावातून चक्कर मारुन आणतो म्हणाला. पण आम्हालाच पायी फिरायचं होतं म्हणून उद्यासाठी म्हणून त्याचा फोन नंबर घेतला आणि पहाटे साडे सहापर्यंत यायचा वादा करुन त्याने निरोप घेतला.

उत्साही महंमद टांगेवाला. आमची टांग्यातल्या रपेटीची, फोटोंची हौस फेडत होता.
चला, उद्याच्या वाहनाची चिंता मिटली. हॉटेल रिसेप्शनला सांगितलं तर टांगेवाल्यांच्या भरवशावर राहू नका असा अनुभवी सल्ला त्यांनी दिला. पण टैक्सीही सहज मिळेल असंही खात्रीने सांगितलं. सकाळी निघताना आम्ही महंमदला दोन-तीन फोन लावले.
नो रिप्लाय. पण टैक्सी लगेच मिळाली, ट्रेनही मिळाली.

सकाळच्या पुढच्या प्रसन्न प्रवासात महंमदला आम्ही विसरुनही गेलो. मग लुक्सारला पोहोचून जुने झाल्यावर महंमदचा फोन आला की तुम्ही कुठे आहात ? ट्रेन मिळाली का ? रात्रभर माझं पोट बिघडलं होतं म्हणून मला सकाळी जाग आली नाही वगैरे..वगैरे.
केवढूसं ते पोर, पण कीती जिव्हाळ्याने, जबाबदारीने  चौकशी करत होतं. निरागसपणाही कीती होता. महंमदच्या बोळक्या तोंडातल्या इंग्रजीतल्या गप्पांनी, टांगा सफरीने, रिझर्व्हेशन काऊंटरवरील काळजीयुक्त वर्तनानी तर आम्ही खुष झालोच होतो पण दिलगिरी व्यक्त करणा-या त्याच्या फोनने तर अजूनच बेहद आवडून गेला महंमद.

जुग जुग जियो मेरे बेटे...महंमद.

No comments:

Post a Comment