जानेवारीच्या मध्यावर एक फोन आला. मॅडम मी अमूक एका वर्तमान पत्रातून असा असा बोलतोय. आम्ही एक रंग आणि रेषा अशी पुरवणी काढणार आहोत. तुम्ही जर एखादा लेख या पुरवणी साठी देऊ शकलात तर आनंदच होईल. माझा प्रथमदर्शनीचा तात्काळ होकार गेल्यानंतर लेख किती मोठा आणि कधीपर्यंत हवा आहे हे सांगीतल्यावर मी परत एकदा वर्तमानपत्राचं नावं विचारुन संभाषण संपवलं.
दैनिक सामनामधून फोन होता. असेल बुवा.
हल्लीच जरा कलेविषयकच्या दोन-चार चळवळी शहरात सुरू झालेल्या आहेत. सामनावाल्यांनाही वाटलं असेल आपणही एखादी पुरवणी चित्रकलेवर काढावी म्हणून.
नुकतीच इजिप्तवरुन आले होते. त्याचही लिखाण मनात होतंच. नोव्हेंबर मधल्या ऑस्ट्रेलीयाचही लिखाण अर्धवटंच राहिलं होतं अजून. परत तोंडी लावण्यासारख्या अनेक प्रासंगिक गोष्टीं असतातच लिखाणाला स्फुर्ती द्यायला. त्यामुळे ठरलेल्या विषयावर अधीकाराने लिहून द्यायचं म्हटलं की जरा बिचकलेच. त्यात दिर्घ लेख, तोही कलेवरती.
जरा धास्तीच होती. तरी पण एक वैयक्तिक एक्सरसाईज कम् चॅलेंज म्हणून मनावर घेतलंच. उस्फुर्तपणे लिहिणं आणि हुकमाने लिहिणं यात बराच फरक पडतो. विषयाची निवड आणि त्याची सुसंगत मांडणी जोपर्यंत डोक्यात निटसर रचली जात नाही तोपर्यंत बरीच अस्वस्थता मनात घुमत रहाते आणि राहिली पण. तरी एखाद दोन दिवस वाढवून घ्यायला फोन केला तर पुरवणीचं काम जवळपास संपत आलेलं होतं आणि अगदी परवासाठीच लेख हवा होता. म्हणजे कंटाळा कम् धास्तीला हलायला का डुलायला जागा नव्हती. आता वेळ हातात कमी होता आणि लेखाची तर जबाबदारी घेतली होती. शेवटी मानेवर खडा ठेवल्यासारखी बसलेच नेटाने लिहायला.
विषय ठरला, विस्तारीतही करता येत होता. एकहाती झपाट्याने लिहून काढला लेख. सकाळी परत जरा फेरफार करत माझ्या दृष्टीने पुर्णत्वाला नेला आणि दिला पाठवून आणि लागले दुस-या कामाला.
दुस-या दिवशी पहिल्या चहाबरोबर फेसबुक उघडलं आणि कळलं आज अग्रणी शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरेंची जयंती म्हणून.
अरेच्या ! म्हणूनच बरं हे सामनावाले रंगरेषांची कलापूर्ण पुरवणी काढताहेत बरंका.
बाळासाहेबांसारखा विचक्षण नजर आणि बुध्दी असलेला कलाकार. काही फटका-यांनीशी आपलं मत लिलया मार्मिकपणे व्यक्त करु शकणारा कलावंत, राजकारणी आणि मराठी माणूस. हिंदूंची जाहीरपणे कडवी बाजू घेणारा हरहुन्नरी कलावंत.
बापरे !
आपण तर नेमकं धर्म आणि कला यावरच लिहिलंय.
तेही जगातल्या प्रबळ आणि प्राचीन धर्मांवरच प्रामुख्याने लिहिलंय.
बाळासाहेबांची जुनी परखड मतं, भाषणं आठवली. आपल्यांच प्रेम, दूस-यांचा दुस्वास आठवला. च्यामारी, या सामनावाल्यांनीही काय आपल्यासारखा फितूर कलावंत पकडलाय लेख लिहून द्यायला. परत एकदा बारकाईने वाचून बघावा का लेख आपला ?
जाऊदे, मरुदे. काहीही लिहिलेलं असू देत आता. पटलं तर छापतील नसता सोईने एडिट करुन छापतील नसता छापणारही नाहीत. तसाही उशीरच झाला होता म्हणा.
आपल्याकडून लेख गेला. आपला एक एक्सरसाईज हातावेगळा झाला.
That's it and all !
थोड्याच वेळात त्या पत्रकाराचा मेसेज आला, लेख छापून आल्याबद्दलचा. लेखाचा फोटोही त्यांनी कौतुकाने पाठवला.
आयला ! खरंच आपला लेख छापून आला की.
तोही आजच्या औचित्यपूर्ण दिवशी.
आणि चक्क संपादकीयच्या शेजारी.
त्यांच्याकडूनच मग लिंक मागवली. ऑफिसमधल्यांना सामना पेपर आणून ठेवायला सांगितलं. तोपर्यंत अजून एका सामनावीराचा कौतुकाने मेसेज आला.
बघू बरं काय काय एडिट करुन छापलाय लेख म्हणून लेख वाचला तर लेख जशाच तसा छापलेला. फक्त एका ठिकाणी 'औरंगाबाद' असा उल्लेख होता तिथे 'संभाजीनगर' असा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला होता.
म्हणजे लिखाणाला कुठलाही छेद देणारा फेरफार न करता लेख छापला याचही कौतुक वाटलं, तर औरंगाबादचा उल्लेख हट्टाने संभाजीनगर केला याचाही मनोमन विषाद वाटला.
उद्या जर एखाद्या राजकीय परिवर्तनानंतर आमच्या औरंगाबादचं नाव बदलायचा घाट जर कुणी घातलाच तर पहिला कडाडून, चवताळून विरोध माझाच असणार आहे हेही खरं.
असो, वेळ येईल तेव्हा लढू.
देव करो अन् अशी वेळ न येवो.
तर जामच छान वाटलं. आपण एकटाकी लिहिलेला लेख काहीच फेरफार न करता अग्रणी स्थानावर छापून आल्याबद्दल मनोमन सुखावले.
एका ख्यातनाम, जाणकार आणि प्रथितयश कलावंताच्या जयंतीनिमित्त निघणा-या पुरवणीच्या निमित्ताने आपण मोकळेपणाने कलेवरच लिहू शकलो याचाही आनंद वाटला.
पण जर का हेच मला कुणी आधी सांगितलं असतं की अशी अशी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त पुरवणी निघणार आहे आणि त्यामधे तू धर्म आणि कला यांच्या संबंधीत काही लिहून दे असं म्हटलं असतं तर मी खचीतच इतक्या मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने लिहू शकले नसते. कुठेतरी नकळतपणे एक दडपण माझ्यावर राहिलंच असतं. आणि एखादा साधा पण वेगळा विचार मांडताना देखील माझी मनस्थिती डळमळीत झाली असती.
कारणांची कुठलीही पुर्वकल्पना नसल्यामुळे एका मोकळेपणाने मी हा साधासाच पण दिर्घ लेख लिहू शकले.
लेख फार थोर बीर मुळीच नाहिये. पण माझ्यासाठी तो एक खरोखरंच एक अज्ञानातला आनंद आणि धडा ठरला.
No comments:
Post a Comment