Thursday, 24 January 2019

होलसेल किराणा दुकान.

खरंतर एक काऊचिऊच्या संसारवाल्यांनी होलसेल किराणावाल्याकडे जाऊच नये. एकतर गोष्टी लागत असतात आदपाव, छटाक वा पावशेर. आळंबळं दोन किलो म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं.
कशाला पाहिजे तो एक कट्टा, दोन कट्टेवाला होलसेलर ?
पण नाही मुरलेल्या संसारातल्या काटकसरी गृहकृत्यदक्षतेचं परम लक्षण आहेना ते.
गेले अस्मादिक गहू-तांदूळ भरायला आणि पोळीचा गुळ आणायला.

हं..बोला मॅडम काय हवंय ? गहू-तांदूळ ? जुना का नवा ? ए...रामेश्वर दाखव त्यांना तांदूळ आणि गहू. जून्या-नवा दोन्ही दाखव.
बघू बाकीची लिस्ट.
आमची लिस्ट म्हणजे एक चिठोरं.
बस्स, इतकंच सामान ? गुळ किती ? एक भेली देऊ ?
आपण फारच चुकीच्या ठिकाणी आलोत याची मनोमन खात्री पटली.
बसा मॅडम, नसता आत चक्कर मारा.
आत काय आहे ?
अहो जरा फिरुन बघा. एकेक वस्तू बघत जाल तसं काही तरी घ्यायचं आठवेल.
ए..पद्या सरक तिकडे...मॅडमना आत जाऊ दे.

आत गेले तर किराणामालानी आतपर्यंत दुकानं खच्चून भरलेलं. वरही एक मजला आहे वाटतं. वरुन एक बकेटचा पोहरा खाली आलेला. एकावर एक खोके आणि कट्टे रचलेले. डब्बाटाईप शेल्फस् मधे तरत-हेच्या डाळी, कडधान्य भरलेले. सुपा-या, बडीशेपा, गोडंब्या, आमचूर, जवस, कारळ, मेथ्या, धणे, हुलगे... बा..बा...बा.... काय आपली चविष्ट भूक आहे. शेकड्यांनी विविध गोष्टी त्यातही प्रांतीय वैविध्य बाळगून असलेल्या खास जिनसा.
कोल्हापूरी गुळ, बेळगावी धणे, सोलापुरी शेंगदाणे, सांगलीची हळद, राजापुरी खोबरं, सिरोही गहू, किनवटची गोडंबी, नंदूरबारी मिरची, यवतमाळी तुरडाळ, राजस्थानी मटकी...एक ना अनेक प्रकार. कसं काय या दुकानदारांच्या लक्षात रहातं काय जाणे. प्रत्येकाचा भाव वेगळा, परत तोही पावशेर-अर्धा किलो, एक किलो, पाच किलोसाठी वेगवेगळा. परत हे भावही आठवडागणिक कमी जास्त होणारे. शाब्बास आहे त्या दुकानदारांची.

बरं, दुकानदारही एकाच पठडीतले. बहुतांश सारे स्वत:च गल्ल्यावर बसणारे. आता घरचंच दुकानं म्हणजे जे काय उत्तम आणि उच्च प्रतीचं तेच हे खाणार. तरी यांना रया नाहीच.
कायम तेलकटलेले, घामटलेले, चकचकीत शिसवी रंगाचे. तेलबिल येथेच्छ चोपडून एक फुगा काढून बाकीचे चापूनचोपून बसवलेले केस, नाकावरुन सारखा खाली घसरणारा रिडिंग चष्मा, मान सतत वर-खाली, डावीकडे-उजवीकडे आणि वेळ मिळाल्यास सिक्युरिटी कॅमे-यांच्या स्क्रिनकडे नसता गेला बाजार टिव्हीकडे. हातात जुन्या, वापरलेल्या एनव्हलप्सचं काटकसरी स्लिम राईटिंग पॅड आणि कामचलाऊ पेन, बाजूलाच दणकेबाज कॅल्क्युलेटर, हाताच्या बोटात दोन-चार ठोकळा सोन्याच्या अंगठ्या, सोनेरी घड्याळ मनगटावर, करकरीत क्रिस्पी शुभ्र शर्ट, मळकी कॉलर, त्यातून डोकावणारा गळ्यातला सोनेरी साखळदंड, फक्त संडे टू संडेच होणा-या दाढीची खुंट आणि या सगळ्या अवताराला भेदून येणारं हसू आणि घसरलेल्या चष्म्याला पार करुन वर बघणारे विचक्षण डोळे. सतत तेलातुपात आणि गुळात राहून यांचे चष्मेही तसेच तेलकट झालेले असतात आणि बोलणही अतीच गुळचटच झालेलं असतं.
आपण दर महिन्याला एकदाच किराणा भरतो तरी उबगतो.
यांचा जीव कसा रमत असेल बरं या तेलतुप-गहूतांदूळ-चहासाखरेत ?
तेही नाव-गाव-भावासकट येणा-या प्रत्येक गि-हाईकाला तोंड द्यायचं ?
खरोखर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
तशीच ती त्यांच्याकडच्या कामगारांची फौज. अक्षरशः आयुष्यभर एकाच ठिकाणी अंगमोड मेहनत करत रहाणं चेष्टा नाहीये. ही माणसं तर ख-या अर्थाने तेलतूप-साखरगुळातच चबडबत असतात.
जुन्या-नव्या गहू-तांदूळाची पोती वाहता वाहता ही माणसं देखील कधी जूनी होतात हे त्यांचं त्यांनाही कळत नसेल.
त्या दुकानदारांची तर कमाल वाटते. वर्षोन वर्ष एकाच ठिकाणी, एकाच गादीवर बसून तेच ते काम करत, तेच ते बोलत घालवायची. ब-याच जणांचा तर या कामाचा श्रीगणेशा हायस्कूलपासूनच सुरु झालेला असतो.
बापरे ! किती कठीण आहे हे. धन्य आहे यांची. आपल्याला पैसा दिसतो पण कामाची अविश्रांत मोनोटोनी कळत नाही आपल्याला.
येईल त्या गि-हाईकाचं स्वागत करुन विचारेल त्या मालाचा तपशील आणि भाव एखाद्या यंत्राप्रमाणे सांगणं आणि सातत्यपूर्ण अष्टअवधान ठेवणं बघून तिथल्याच एका श्रीफळाने त्यांचा सत्कार करावासा वाटला मला.

No comments:

Post a Comment