Wednesday, 23 January 2019

कथा हस्ताक्षरांच्या.

आज आंतरराष्ट्रीय हस्ताक्षर दिन आहे. खरंतर फार काही लिहावं असं हाती नव्हतं. पण एवढ्यातल्या काही चर्चा आणि गोष्टी आठवल्या आणि या निमित्ताने लिहावंच म्हटलं.

मला फेसबुक अकाऊंट उघडून दहा वर्ष तरी झाली असावीत. सुरवातीला वाचलेल्या पुस्तकातलं चांगलं काही टाईप करुन पोस्टायला सुरवात केली. मग जरा फोटोंची कॅप्शन म्हणून, प्रासंगिक गोष्टींवर मनच्या चार ओळी टाकायला सुरुवात केली.
मग झाली आमच्याकडे झाली चोरी. मग त्या निमित्ताने जे लिहायला लागले ते लिहितच गेले, पोस्टतंच गेले.
एक व्यक्ती आणि गृहिणी म्हणून नववर्षाची पहिली कुठली आत्मिय कामं असतील तर नववर्षाची कॅलेंडर्स विकत आणणे आणि चोखंदळपणे डाय-या विकत घेणे नसता नव-याच्या ऑफिसमधल्या डाय-या हपापून ढापणे. तर सांगायचा मुद्दा असा की लिखाणाला सुरुवात झाली-केली आणि डाय-यांच महत्त्व अजूनच वाढलं. ऐसपैस मोठ्या डाय-या, पिवळट नरम कागद लिखाणासाठी भलताच आवडू लागला. लिखाणालाही जोर चढला. डाय-या सरसर संपू लागल्या. व्याकरणाच्या सुधारणेस वाव ठेवत अक्षरही चक्क सुधारलं. माझा मलाच फरक लक्षात येऊ लागला. म्हणजे रोजच्या सरावाने खरंच अक्षर सुधारतं बरंका. सुचलं काही की ठेव लिहून हा छंदच लागला मला. लिहिलेलं सगळं काही फेसबुकवर आलेलं नाही अजून. स्वहस्ताक्षराने पानंच्या पानं भरलेल्या या डाय-या आता माझ्या काळजाच्या ठेवा आहेत. पण मग नवीनच तंत्र आत्मसात झालं. मनात आलेलं फटाफट मी डायरेक्ट मोबाईलवर लिहून ठेवू लागले. वेळ मिळेल तसं करेक्शन्स करु लागले, पोस्ट करु लागले. यातही मी बरीच तरबेज झाले. पण त्यामुळे झालं काय की माझा आणि डाय-यांचं मेतकूट संपुष्टात आलं आणि ओघानेच पानं च्या पानं लिहिण्याचा सराव खुंटला. साहजिकच हस्ताक्षर थोडंसं ट्रॅकवरनं घसरलंच. अर्थात हल्ली अजिबात लिहित नाही असं नाही, पण डाय-यांच्या प्रेमाला ओहोटी लागली ती लागलीच.
तर काय सांगत होते ? हस्ताक्षराबद्दल ना ?
हं, तर खरंच प्रत्येकाचच हस्ताक्षर चांगलंच पाहिजे.
जशी आपण शरिराची स्वच्छता व्रतस्थपणे सांभाळतो तसेच प्रयत्न हस्ताक्षर सुधारायला झालेच पाहिजेत. वाईट हस्ताक्षर असलेली सुशिक्षित व्यक्ती म्हणजे शिक्षणालाच काळीमा आहे. सगळेच काही मोत्यासारखे लिहू शकणार नाहीत. पण वाईट हस्ताक्षराची बोच वाटून सुधारणा केलीच पाहिजे. सुंदर हस्ताक्षर म्हणजे सुशिक्षित व्यक्तीमत्वाला जाणून घेण्याआधीचा सुंदर नेटका बागिचाच हो !

एखाद्या न पाहिलेल्या-भेटलेल्या व्यक्तीचा नुस्ता आवाज ऐकून आपलं जसं त्या व्यक्तीविषयी काहीतरी एक मत-इमेज तयार होते, तसंच हस्ताक्षराचही असतं बरंका. या विषयी शालेय शिक्षक फार अधिकाराने सांगू शकतील.

हं, तर नुकतीच इजिप्तला जाऊन आले आहे. आपल्यापेक्षा इंग्लिशचा बराच कमी वापर तिथे होतो  भल्या भल्यांची इंग्रजी हस्ताक्षरं बघून हसावं की रडावं कळू नये अशी परिस्थिती होती. इंग्रजी अल्फाबेटसची वळणं, हिशोबाच्या गणिती मांडणी वगैरे गोष्टी ब-याच सुमार दर्जाच्या आहेत तिकडे. पण हां अरेबिक लिखाण वा हस्ताक्षर म्हणाल तर आपला जीव कासावीस करणारी. एकतर ते उजवीकडून डावीकडे असं लिहिणं. काय ते लयदार वळणं, फराटे, शेपट्या...एखाद्याला लिहिताना बघीतलं तर अरेबिक लिपी फार प्रवाही वाटते आणि बघतंच राहावंसं वाटतं.

तशीच ती आमच्याकडे येणारी एक्चेंजमधली तरुण परदेशी मुलं. त्यांचं ते कसंही पेन पकडणं आणि हस्ताक्षराची सैराट गिचमीड पाहिली की आपलाच आपल्याला अभिमान वाटतो बुवा.

तर इंग्रजांच राज्य आणि आपल्या पुर्वजांची शिकवण यामुळेच मला वाटतं आपण जागतिक स्तरावर हस्ताक्षरात आणि गणिती मांडणीत बाजी मारुन जात असू. किंवा जिथे जिथे प्राचीन संस्कृती आहे तिथले अजूनही उत्तम हस्ताक्षराचं अनन्यसाधारण महत्त्व अबाधीत असावं असं मला वाटतं.

तर उत्तम हस्ताक्षर ही भारतीय माणसाची ओळख आपण टिकवलीच पाहिजे.
काय म्हणता ?

No comments:

Post a Comment