Tuesday, 22 January 2019

Egypt...17 Unique Happy birthday.

Happy birthday !
🙏

या वर्षीचा वर्षा अखेर आणि नववर्षाचं स्वागत आणि माझा वाढदिवस देखील इजिप्तमध्ये झाला. तसंही अस्मादिकांना अनोख्या पध्दतीने, अनोख्या ठिकाणी वाढदिवस साजरा करायला आवडतंच. नेमका योगही जमून आला. मुलीबरोबर इजिप्त मध्ये आहे.
तर वर्षाचा निरोप घेताना एकतीस डिसेंबरला कैरोतल्या प्राचीन बाजार खान अल् खलिलीमधे फेरफटका मारला आणि ऐकिवात असलेल्या सुप्रसिद्ध नगिब महफूज या रसिल्या कॅफेमधे रम्य संध्याकाळ घालवली. शिशा, जेवण, कॉफी आणि संगीतमय सेलेब्रेशन नंतर मध्यरात्री रेस्टॉरंट मधल्या सगळ्या अपरिचीतांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आणि नगिब महफूजच्या धुंदमधूर आठवणींसह बाहेर पडलो.

एक जानेवारी हा अस्मादिकांचा जन्मदिवस. सुरवातच इतकी छान झाली आता उद्याचा कैरोतला दिवस तर अजूनच बहारीचा असेल या समजूतीने खुषीत होते. संध्याकाळी आस्वानची फ्लाईट होती. लेकीने ऑनलाईन आस्वानच्या नाईल काठचं हॉस्टेल बुककरुन ठेवलंच होतं. त्यामुळे निश्चिंत होते.
कैरोत चारेक तास हातात होते. इथलं एक फार वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण 'सिटी ऑफ डेड' बघायला निघालो. सिटी ऑफ डेड म्हणजे पुरातन कब्रस्तान. वेगवेगळ्या इस्लामिक राजवटीत प्रत्येकाने आपल्या राजवटीतल्यांसाठी जागा राखून ठेवलेल्या आणि गरजेप्रमाणे कबरी बांधलेल्या. सरदार-उमरावांच्या कबरी. या कबरी म्हणजे कमी उंचीच्या खोल्याच आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चार-सहा किलोमीटर पसरलेलं हे भयाण पण ऐतिहासिक कब्रस्तान पर्यटकांना फार भावतं. काही पसरट खोल्या, काही घुमटी टुंब्स, काही साध्या तर काही सुरेख कलाकृती केलेल्या. सिटी ऑफ डेड हे गुगलवरचं नाव आहे. प्रत्यक्षात कैरोवासी इस्लामिक लोकं त्याला वेगळ्या नावानेच ओळखतात. आणि पर्यटकांनी तिथे जाण्यासारखं फारसं काही नाही हे वारंवार सांगतात. पण हातातला आजचा वेळ बघता आम्हाला ही अनोखी जागा बघायचीच होती. निघालोच आम्ही.
But somehow, काहीतरी ऐकण्यात-सांगण्यात चूक झाली आणि आम्ही इस्लामिक पुरातन कब्रस्तानात पोहंचायच्या ऐवजी पुरातन क्रिश्चन दफनभुमीत पोहोंचलो. आता तिही फार काही बघण्यासारखी नव्हती. पण तिला खेटूनच क्रिश्चनांची जूनी भव्य चर्चेस, ज्युंची शांत-निवांत प्रार्थनाघरं, अंडरग्राऊंड असलेलं एका राजवटीचं निवासस्थान, विहीर, जुन्या गल्लीबोळा, पुस्तकांची दुकानं, एक देखणं-जूनं सोविनियर शॉप अशा क्रिश्चन राजवटीतल्या ऐतिहासिक वास्तू होत्या. घड्याळ बघत या गोष्टी बघणं आनंदाने संपवलं आणि हॉस्टेलवरनं सामान उचलून एयरपोर्टवर गेलो. डोमेस्टिक एयरपोर्टवर पोहोंचलो तर तिथला रागरंग बघूनच लक्षात आलं काही तरी गोंधळ झालाय म्हणून. लेकीने म्हणजे निर्मिकाने फटाफट चौकशा केल्या तर कळलं चूक आमचीच होती. विमान सकाळचं होतं आम्ही संध्याकाळचं समजून होतो. आता आली का पंचाईत. शहरापासून १२-१५ किलोमीटर दूरवरचा एयरपोर्ट, वेळ संध्याकाळची आणि मुख्य म्हणजे आस्वानसाठी इतकी सततची एयर कनेक्टिव्हिटी असायची शक्यता कमीच होती. म्हणजे वेळेचा, पैशाचा अपव्यय आणि परत वर जीवखाऊ मनस्ताप, धावपळ. मी सामान सांभाळत बसले तोपर्यंत लेकीने धडपड करुन, पळापळ करुन तासादिडतासाच्या दूस-या फ्लाईटची तिकिटं मिळवली पण आता टर्मिनल बदलेलं. धडाधडा पळत टैक्सी केली. उतरेपर्यंत घासाघीशीची विजयी खिंड लढवली आणि तरातरा चेक इन करुन गेट कडे पळालो. ही असली धावाधाव करावी लागली की लक्षात येतं मोठाल्या एयरपोर्टसवर किती चालावं लागतं ते. त्यात परत सगळंच सामान बरोबर होतं. आणि मुख्य म्हणजे केवढा तो कैरोचा अवाढव्य गजबजलेला एयरपोर्ट पण आमच्या वाटेवर एक माणूस दिसेना. सगळीकडे सन्नाटा.
मग लक्षात आलं या गडबडीत सामान चेक इन करायचच राहून गेलं म्हणून. परत लेक नेटकं सामान घेऊन चेक इन करायला गेली. सुनसान गेट लाऊंजमधे मी एकटीचं. तरी कामं तत्परतेने झाली आणि लगेच बोर्डींगची वेळ झाली. विमानात बसलो आणि गेल्या तासाभराच्या धावपळीनंतर एकदाचा निश्वास टाकला. वेळेतल्या एम आणि पीएमचा गोंधळ होऊन विमान हुकलं होतं. अक्कलखाती काही पैसे गेले तरी नशीब दूसरं विमान लगेच मिळालं. नसता ट्रिपचं वेळापत्रकच बिघडलं असतं.

रात्रीच्या शांत काळोखात लखलखून उठणारं खालचं औरसचौरस कैरो तुफान दिसतं. लाईटिंगची दुतर्फा विभागणी करत मधूनच वहाणारी नाईलपण काळ्या गहिरेपणाने उठून दिसते. सारा प्रवास नाईलवरुनंच. आधी अभ्यास केलेला असल्यामुळे एकेक गावं आठवून आठवून ओळखत गेलो. जेमतेम दोन तासांचा प्रवास. पण खालचे लुकलुक दिवे बघण्यात, गावांचे अंदाज बांधण्यात संध्याकाळचा मनस्ताप पार विसरलो.
साडे आठला आस्वानला पोहोंचलो.

आस्वान हे लहानसे गाव नाही पण इजिप्तच्या शेवटाचा, सुदानलगतचा हा प्रदेश आहे. इथेच नाईल नदीवर आस्वानचे भव्य धरण बांधले आहे. इथूनच जवळ अबूसिंबेल हे सुप्रसिद्ध मंदिरही आहे. आम्हाला घ्यायला आलेला टैक्सीवाला गलेबीया घातलेला सुदानी व्यक्ती. इंग्लीशचा इथे तर अजूनच आनंद. हा एयरपोर्ट पण शहरापासून बराच दूर, एकांती. रस्ते सुनसान. जरा दडपणच होतं रस्ताभर. आधीच जीव धसकला होता. तरी वाहत्या रस्त्याजवळच्या नाईलच्या काठावर त्याने आम्हाला सोडलं. इथून आम्ही दूस-या तीरावर आमच्या मुक्कामी जाणार होतो. हवेत बराच गारठा. गाव सुस्तावलेलं. पैलतीर तर अजूनच सुनसान. टैक्सीवाल्याची तिथूनच निघायची घाई. तरी त्या हॉस्टेल ओनरने त्याला आम्हाला एका बोटीत बसवून द्यायला सांगितलं. आढेवेढे घेत त्याने ते काम मात्र केलं. दरम्यान काही युरोपियन पर्यटक मुलं बोटीत आली. लगेच हाय-हैलोचं आदानप्रदान होऊन लेकीची आणि त्यांची फोनची देवाण घेवाण झाली. या परक्या, अंधारी ठिकाणी इंग्रजी जाणणारी आपल्यासारखीच परकी पर्यटक मुलं बघून जरा आश्वस्त झालो. चांगली मुलं होती. काही मदत पाहिजे का हे विचारत ती पैलतीरावरच्या आपापल्या मुक्कामी निघून गेली. आम्ही तीरावर उतरलो तर एक पोरवसदा मुलगा आणि गलेबीया घातलेला सुदानी व्यक्ती सामान उचलायला हजर होती. थोडंफार इंग्रजी त्या सुदानीला समजत होतो. मग काय एका मातेरी, धुळकट पायवाटांनी गल्लीबोळातून आम्ही चालत निघालो. नाईलच्या दुसऱ्या किनाऱ्यावरची एक खेडवळ वस्ती. मातकट वासाची धुळकट घरं, मंद पिवळे लाईट, रात्रीच्या नऊ वाजताच गुडूप्प झालेली वस्ती, कोंबड्यांची खुराडी, गायबैलांचे गोठे, शेणाचा वास, दोनेक नखशिखांत बुरखेवाल्या कुजबुजणा-या गृहिणी. हळूहळू वस्ती विरळ होत चाललेली. रस्ता खडबडीत होत जाणारा..तरी ठिकाण येईना. पंधरा एक मिनिटं चालल्यावर एकदाचे मुक्कामी पोहोंचलो. इथे नाईलला दोन फाटे फुटतात. आम्ही अंतर्गत फाट्याच्या सुनसान काठावर आलेलो. 
बॅक पॅकर्सचं हॉस्टेलच ते. इतकं सुमार की पाहूनच धस्स झालं. त्यात फक्त एकच खोली, टॉयलेट बाहेर. खोलीला दोन दरवाजे. सोबत कुणी नाही. मागे निद्रिस्त खेडवळ वस्ती आणि पुढे वाहती निरव अंधारी नदी. खोलीच्या रंगीत भिंती, चटकदार पडदे, मखमली बटबटीत पांघरुणं आणि कमालीचं एकटं, सुनसान आणि दडपवून टाकणारा आसमंत. दुपारच्या तीन वाजल्यापासून तडतड सुरु होती, भुकही जाम लागली होती. जेवण म्हणजे मागितलं म्हणून बटाटे तळून-उकडून देणार होता तो सुदानी. मुक्कामी आल्यावर आम्हाला कळलं की सामान उचलणारा जो सुदानी होता तोच हॉस्टेलचा ओनर आहे म्हणून. सामान टाकून तो दूसरा तरुण लगेच गेला. ओनरनी पण आधी पैसे जमा करायचा फतवा काढला, तेही कॅशने.
एकावर एक कोसळणाऱ्या प्रसंगांनी अक्षरशः धाब दणाणलं. एक घोट पाणीही पिववेना तिथलं. लेकीला सोडून वॉशरुमलाही जायची माझी हिंमत होईना. इतक्या एकांतात, परक्या ठिकाणी त्या एकट्या सुदानीच्या भरवशावर लेकीसह तिथे रात्र काढणं अशक्य होतं. दोघीही मनातनं हादरलो पण एकमेकींकडे बघून हिंमत धरली. निर्मिकाला म्हटलं आधी त्या मघाशीच्या युरोपियन मुलाला मेसेज टाक की आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे आणि आम्हाला तातडीने दुसरी जागा पाहिजे म्हणून. तिनेही माझं चुपचाप ऐकलं. पण त्याचाही काही रिप्लाय नाही. मग निर्मिकाने नेटवरनंच दूसरी हॉटेल्स शोधली. कुठेही रुम नव्हती. तोपर्यंत हॉस्टेल ओनर हमाद स्वैपाकाला लागला होता. खरंतर परिस्थितीच भान येऊन घसा कोरडा पडला होता पण पाणी पिण्यातला संभाव्य धोकासुध्दा पत्करावासा वाटला नाही. बरं दुसरी सोय होईपर्यंत हे ठिकाणही सोडवेना. बरं सोडलं तरी दूस-या तीरावर जायला बोट तरी हवी ना ?
Basically we were totally stranded with isolation and disconnection.

त्या निरव शांततेतल्या एकांती वास्तुत फक्त आम्ही तिघं. आम्ही दोघी आणि सुदानी हमाद. त्याचाही काय भरवसा ?
खरंतर बुकिंग करताना निर्मिकाने रिव्ह्युज वाचूनच बुकिंग केलं होतं. फक्त एक रिव्ह्यु ओनरच्या सेक्शुअल असॉल्टविषयी होता हेही तिने मला सांगितलं होतं. पण बरेचदा दूस-या पार्टीतही काहीतरी खोटं असते असं म्हणत, चांगल्या रिव्ह्युच्या अनुषंगाने आम्ही नदीकाठचं हे हॉस्टेल निवडलं होतं. पण इथे आल्यावर आम्हाला कळलं की इथे एकच रुम आहे, सोबतीला फक्त हमाद आणि रिव्ह्युत रोमांटिक वाटणारा नदीकाठ इथे खाऊ का गिळू करत होता. त्यामुळे मनातून आम्ही भलतेच हादरलो होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे रहाणं आणि झोपणं केवळ अशक्य होतं. वेळ आली असती तर मी बसून रात्र काढली असती.
But the overall blow was enough to scare, shake and alert us.
कुठेतरी दोघींच्याही सिक्स्थ सेंसनी कौल दिला आणि आम्ही हे ठिकाण तातडीने सोडायचं ठरवलं. किना-याच्या एका हॉटेलमधे जागा होती. तिथला रिसेप्शनिस्टही या म्हणाला. पण परत नाईल पार करायचं संकट होतंच. टैक्सीचं कळवतो म्हणाला, फोन नंबर टिपून घेतला. बस, परत त्याचा फोनच नाही. रात्र चढत होती, हमादही ओट्यापाशी खुडबुड करत होता. काय करावं कळेना. म्हणजे हॉस्टेल सोडतो जरी म्हटलं असतं आणि वाईट बुध्दीचा सुदानी असता तरी सामानासह नदीकाठ गाठणं कठीण होतं. एकेक क्षण ओझं वाटायला लागला. शेवटी काय वाट्टेल ते होऊ दे पण या वास्तूतून लगेच बाहेर पडायचा आम्ही निर्णय घेतला. निघायचं ठरवल्यावर देखील मनामधे उगाचच वेडेवाकडे विचार थैमान घालू लागले.
शेवटी सामानातला चाकू माझ्या हातात घेतला, लेकीला नेलकटर दिला, सामान उचललं आणि आम्हाला इथे रहायचं नाही हे झपाझप चालायला लागतंच हमादला सांगितलं.
But, why..why... करत थांबवायचा निष्फळ प्रयत्न त्याने केला मग मीच no, I don't feel comfortable here असं म्हणत लगेच काढता पाय घेतला. येतानाचे गल्लीबोळातले लॅंडमार्कस आठवत न चुकता तीरावर झपाझप आलो तर मघाशीचीच मुलं एका दुमजली घरगुती रेस्टॉरंटमधे जेवण करत होती. त्यांच्याकडेही जागा नव्हती. परत पंचाईत. तेवढ्यात एक बोट आली. आमच्यासह चारचौघांना घेऊन गजबजलेल्या दूस-या तीरावर घेऊन गेली. परत सामानासह पाच पंचवीस पाय-या चढत सुनसान, गारठलेला रस्ता गाठला. रामभरोसे एका स्वत:हून थांबलेल्या खटारा टैक्सीत बसलो. मघाशी फोनवरनं कॉन्टॅक्ट केलेल्या हॉटेलमधे धडकलो. रिसेप्शनवरच्या अहमदने प्रसन्न वदनाने स्वागत करत अक्षरशः निर्धास्त केलं. तरी पण बुकिंग डॉट कॉम, मेक माय ट्रिपचे घोळ संपवण्यात तास गेला. बुकिंगचे, रजिस्ट्रेशनचे सगळे सोपस्कार पार पाडून उबदार खोलीतल्या शुभ्रपलंगपोसावर अंग झोकून देईस्तवर रात्रीचे साडेबारा वाजून दोन जानेवारी सुरु झाला होता.

खरंच काय चुकलं आमचं ? सकाळपासून सगळं थोडं थोडं चुकतंच गेले. हमादच्या हॉस्टेलमधली ती वीस पंचवीस मिनिटं सगळ्यात कठीण काळ होता. अशा प्रसंगी म्हटलं तर डोकं चालतही आणि म्हटलं तर चालतही नाही. नंतर चारेक दिवसांनी निर्मिका मला हसून मला विचारत होती आई तू नेलकटर कशाला दिलास ? मी काय करु शकले असते त्यानी ? बाई, खरंय तुझं म्हणणं. पण माझ्याकडे तेवढी दोनच हत्यारं होती. आणि मन जे चिंती ते वैरीही न चिंतीत हे खरं आहे.
आता वाटतं आपण उगाचच फार घाबरलो. म्हणजे जागा सोडली ते बरंच केलं पण इतकं तणावाखाली येण्याचं कारण नव्हतं. पण त्या दिवशी एका मागे एक घडलेल्या उलटसुलट गोष्टींनी आम्हीही फार कावून गेलो होतो.
तरीपण जरासे हटके हॉटेल, हॉस्टेल बूक करणा-यांनी नेहमी सावधच रहावं असा सल्ला मी नक्कीच देईन.

No comments:

Post a Comment