Monday, 21 January 2019

धर्म...कलेचा उद्गाता. (सामना)

आपल्या रोजच्या आयुष्यातली, जगण्यातली कला शोधायची म्हटली, जाणून घ्यायची म्हटली तर एक क्षणभर आपल्याला समजणारच नाही की खरंच किती अनेकानेक वैविध्यपूर्ण कला आपल्या आयुष्यात किती आणि कशा झिरपल्या आहेत म्हणून.

कलेचेही अनेक प्रकार आहेत. पर्फॉर्मिंग आर्ट, व्हिज्व्युल आर्ट, भाषिक कला, श्रवणानंद देणारी, वाचनानंतर देणारी कला..एक ना अनेक कलेचे प्रकार आपण सततच अनुभवत असतो. मग लहानपणापासून ऐकलेली भजनं-भक्तीगीतं असोत वा तारुण्यातील सिनेगितं वा गझ़ला असो. आईच्या कुशीत बसून तिची ती सरसर रांगोळी काढणं बघणं असो वा बहिणीची कापडावरची कलाकुसर असो वा भाचीचं गणपतीचं ग्रिटिंग कार्ड असो. येनकेन प्रकरणे विविध कला आणि त्या कलांचे आविष्कार आपल्या अवतीभवतीच असतात. पण एखादा ठाशीव विचार करुन त्याविषयी बोला-सांगा असं म्हटलं की आपल्याला दडपण येतं. वाटतं बाबारे माझा काय संबंध कलांशी ? मला काही त्यातलं कळत नाही असंच सर्वसामान्यपणे सगळ्यांना वाटतं. एका अर्थाने ते बरोबरही आहे. म्हणजे गाण्यातलं, नृत्यातलं, चित्रातलं वा इतर कलांमधलं अभिजात तंत्र, शास्त्र वा प्राविण्य आपल्याला कळणार नाही, सांगता येणार नाही. पण त्यातलं चांगलं वाईट आपल्याला ढोबळपणे नक्कीच कळतं.  कळत-नकळतपणे त्या कलेचा एक प्राथमिक संस्कार आपल्यावर लहानपणापासूनच झालेला असतो. फक्त त्या दिशेने आपण तसा विचार करत नाही. किंवा दुर्दैवाने कधी तशी गरजही पडत नाही.

आपल्या भारतात काय किंवा प्राचीन जगतात काय बहुतांश कलांचा जन्म, विकास हा धर्माचं बोट धरुन झाला आहे. अगदी मानव रानटी अवस्थेत होता तेव्हाही गुहांमध्ये भयानक प्राणीमात्रांची, शिकारीची चित्र काढून मानवाने वेळोवेळी आपली भिती वा श्रेष्ठत्व सिध्द करायचा प्रयत्न केला आहे. जिवघेण्या शिकारीतला जय सुध्दा लयदार आवाज काढत, पदन्यास करत साजरा करत असे हा मानव. तसेच भयकारी प्राण्यांना घाबरवायला देखील हाच मानव तरत-हेचे शिंग लावून, कातडी पांघरुन, चेह-यावर रंगरंगोटी करत असे. कालांतराने शेतीचा शोध लागला, मानव स्थिरावला, कुटुंब व्यवस्था गरजेची वाटत स्थिरावली. भाषा आली, भावना आली. भितीची कारणं जरा वेगळी झाली आणि मग स्थैर्यासाठी, शांततेसाठी माणूस स्थलांतर करु लागला.
गटा गटाने सर्वदूर पांगल्यामुळे परत वेगळ्याच चालीरीतीचा अंगिकार झाला. स्थानिक अशी वेगळीच संकटं उभी राहिली. आभाळातून येणा-या उन-पाऊस-वा-याची, नैसर्गिक कोपाची दहशत निर्माण झाली. म्हणजे म्हटलं तर निसर्ग कृपाळू आहे पण कधीकधी विध्वंसकपणही आहे याची जाणीव मानवाला झाली. त्यातूनच मग निसर्ग देव-देवता ही कल्पना उदयाला आली. मग स्वरक्षणासाठी, स्वजातीच्या भल्यासाठी या देवाला खुश करणे, देव कोपू नये म्हणून या निसर्ग देवतांची पूजा करणं, त्यांच्या मूर्त्या करणं, त्यांना पुजणं अशा चालीरीती सुरु झाल्या. कुटुंब व्यवस्था असली तरी त्यातल्या हेवेदाव्यांनी, असुरक्षिततेतून, एकीचं महत्त्व पटल्यामुळे हळूहळू धर्माची रुजवण व्हायला सुरुवात झाली.
लोकसंख्या वाढली. स्थिरता आली तशी सुबत्ताही आली. मग वाढलेल्या लोकसंख्येला एका परम पण एकछत्री वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी म्हणून धर्म, धर्माचा नियंता, देव-परमेश्वर, त्याच्या कृपा-कोप या भावना प्रबळपणे तत्कालीक समाजात रुजल्या. विविधांगी कारणांमुळे पांगलेली प्रजा एकत्रित आणण्यासाठी, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंदिरं, प्रार्थनास्थळे निर्माण झाली. याही गोष्टी स्थिरावून कमी, लहान पडू लागल्या, नगण्य वाटू लागल्या त्यामुळे मग एकाच धाटणीची भव्य मंदिरं, प्रार्थना स्थळं निर्माण झाली. त्यांची प्रांतवार, समजुतीनुसार ठरावीक रचनाच सर्वमान्य झाली. अशा समजुतीतूनच मग शिखर असलेली मंदिरं, चर्चेस वा घुमटाकार मस्जिती निर्माण झालेल्या, अजूनही होताहेत. मग जसा जसा धर्माचा प्रसार होऊ लागला, धर्माचे फायदे लक्षात येऊ लागले तशा तशा या इमारती अनन्यसाधारण महत्त्वाच्या, सत्ताकेंद्र ठरु लागल्या. समाजाचं, अर्थकारणाचं एकत्रीकरण या वास्तूत होऊ लागलं. त्यामुळे या इमारतींच बांधकाम, सुशोभीकरण वा इथल्या ईश्वराप्रतीच्या कथा-काव्य यांना बहर येऊ लागला. मग ईश्वराप्रती प्रेम-आदर व्यक्त करणारी गितं-काव्य रचली गेली, जोडीला वाद्यांचाही मेळ जमला. प्रार्थनास्थळी परमेश्वराचं अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारी चित्र काढली गेली. नृत्य-नाट्य रचली गेली. पृथ्वीवर जिथे जिथे प्राचीन वसाहती स्थिरावल्या तिथे तिथे आपल्याला तत्कालीन धर्माच्या, देवाच्या प्रभावानेच अनेक कला वृध्दिंगत झालेल्या दिसून येतील.

अगदी मग ती प्राचीनतम इजिप्तची मिस्र संस्कृती असो वा दोन हजार वर्षांपूर्वीची बुध्द धर्मिय संस्कृती असो.
हिंदु, इस्लाम, क्रिश्चन, ज्यु वा बुध्दिस्ट वा इतर धर्म असो, थोड्याफार फरकाने एकाच सुत्राने त्या त्या धर्माच्या अधिपत्याखाली स्थानिक स्तोत्रांनुसारच प्राचीन कलांचा विकास झालेला आपल्याला आढळेल.
हिंदू धर्मात मोठाली, दगडी, रचित मंदिरं उभारण्यात आली. निसर्गातल्या बहुतेक घटकांच्या देव-देवता निर्माण झाले, केले गेले. त्या देवतांच्या वैशिष्ट्यपूर्ण मुर्त्या तयार झाल्या. त्या देवतांची आराधना करणारी कवनं रचण्यात आली. देवतेची महत्ता अधोरेखित करणारी कथनं नाट्य रुपांतरीत करण्यात आली. नृत्यात बसवण्यात आली. मंदिराच्या भिंती देवांची महानता दर्शवणा-या चित्ररुपात रंगवण्यात आल्या. म्हणजे एका मंदिराच्या निमित्ताने ब-याच कलांना ओळख मिळाली, अनेक कला प्रवाहीत झाल्या. अशाच पध्दतीने जगातली एक प्राचीन आणि अद्भुत अशी मिस्र संस्कृती सुध्दा भरभराटीला आली. सुर्याचे उपासक असणा-या या मिस्र संस्कृतीच्या पालकांनी देवदेवतांच्या नावे प्रचंड मोठी दगडी मंदिरं उभारली. देवांच्या नावे समारंभ आयोजित केले. देवाला, सुर्याला परमोच्चस्थानी ठेवून मानवी मृत्यूनंतर देखील देवासारखे अमर होण्याचे मार्ग धुंडाळले गेले. त्यासाठी भव्य-दिव्य पिरॅमिडस् उभारले. आज जगातलं एक आश्चर्य म्हणून व वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून या अफाट  पिरॅमिडसकडे बघीतलं जातं. ममीफिकेशन केलेल्या शरीरांखेरीजही या पिरॅमिडसमधे इतक्या मुल्यवान आणि कलाकुसरीच्या अजोड नमुने वाटाव्यात अशा वस्तू मिळाल्या आहेत. मानवाचं शरीर जतनाचं एक शास्त्र इथे विकसित झालं. त्याच बरोबर आत्म्याच्या मरणानंतरच्या सुखकर प्रवासासाठी म्हणून मोठाले पिरॅमिडस, टुंब्स बांधण्यात आली. वैविध्यपूर्ण कोरीव चित्रांनी या टुंब्सच्या भिंती इतक्या भरगच्चपणे चितारण्यात आल्या व रंगवण्यात आल्या की आज ही ऐतिहासिक स्थळं जगातलं एक आश्चर्य बनली आहेत.

भारतातल्या प्राचीन अशा मोहेंजोदडो संस्कृतीत सुध्दा अशाच अनेक कलांचा उगम सापडतो. मातीची घडवलेली, रंगवलेली भांडी, खेळणी, शिल्प, दाग दागिने, मुर्त्या, शिल्पीत केलेले छापे अशा अनेक वस्तू आपल्याला त्याकाळच्या कलाप्रकारांची साक्ष देतात. इथे सापडलेल्या एका छाप्यावरचा त्रिशूळ धारी मनुष्य आणि आसपासचे प्राणी हे कोरीव शिल्प हिंदू धर्मातील पशुपतीनाथाचं पहिलं शिल्प मानलं जातं. मोहंजोदाडो येथील नगररचना बघून तर आजचे वास्तुविशारद पण थक्क होतात.
साधारण क्रिस्तपुर्व काळात हिंदू धर्माची पिछेहाट होत बुध्द धर्म उदयाला आला. सर्वसामान्यांपासून राजे-उमरावांपर्यंत या बुध्द धर्माची शिकवण रुजली. धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्रिखंडात या धर्माची किर्ती पोहोचावी, टिकावी यासाठी या धर्माचा उद्गाता गौतमबुद्ध आणि त्याची शिकवण चिरकाल टिकावी या उद्देशाने खुप मोठ्या अलंकृत वास्तू भारतात तयार केल्या गेल्या. भारतीय उपखंडात पसरलेले बांधीव, कोरीव, एक दगडी स्तुप याची साक्ष देतात. भारतीय शिल्पकलेला एका अत्युत्तम उंचीवर नेऊन ठेवण्याचं कार्य या धार्मिक वा धर्मासाठी बांधणा-या, कोरणा-या व रंगवणा-या कलाकारांनी केलं. याच धर्माच्या रेट्यात महाराष्ट्रात अनेक दगडी गुहा खोदण्यात आल्या. त्यातल्या औरंगाबाद इथल्या अजिंठ्याच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या डोंगरी खडकात कोरलेल्या व भिंतन भिंत रंगवलेल्या दगडी गुहा जगप्रसिद्ध आहेत. बुध्द धर्माच्या प्राबल्याच्या काळात भारतीय गुहा शिल्पात खूप भरभराट झाली.
तदनंतर पुन्हा उसळी मारत स्थिरावलेल्या हिंदू धर्मात मोठ्या संख्येने भव्य-अतिभव्य अशा बांधीव, रचित मंदिरांची निर्मिती झाली. हिंदू वळणाच्या असंख्य देव-देवतांच्या निमित्ताने शिल्पकला फार झपाट्याने प्रगत झाली. अजिंठ्याच्या गुहा तरबेजतेने रंगवणारे कलावंत हिंदू मंदिरं हिंदू देव-देवतांच्या चित्रांनी रंगवू लागली. पोथी आर्ट निर्माण करण्यात देखील याच परंपरेच्या कलावंतांनी हातभार लावला. यातूनच पुढे मग उत्तर भारतीय प्रांतांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारी मिनियेचर पेंटिंग्ज उदयाला आली.

याच दरम्यान साधारण दोन हजार वर्षांपूर्वी इस्लाम धर्माचा उदय आणि प्रसार झाला. या धर्माच्या कडव्या नियमांमुळे या धर्माच्या अधिपत्याखाली एकाहून एक सुरेख मस्जिती तयार झाल्या. व्यक्ती रेखाटनाला इस्लाममधे वाव नसल्यामुळे कॅलिग्राफिकली कलाकुसरीची नक्षीदार रचना करण्यात इथले कलावंत माहिर ठरले. एकेका धर्माखाली एकेका कलेला इतकं झपाट्याने विकसित होता आलं की आजही या कलांचे आधूनिक आविष्कार पाहिले की ते धर्मच आठवावेत इतक्या त्या कला त्या धर्माशी निगडीत झालेल्या आहेत.

क्रिश्चन धर्मात देखणी धर्मस्थळं म्हणजे चर्चेस बांधण्यात आली. चर्चेसच्या भिंती येशु जीवन चरित्रातल्या प्रसंगांनी रेखाटण्यात आल्या. स्टेन्ड ग्लास ही अनोखी कला इथेच उदय पावली.

पण हळूहळू एकूणच धर्माचा सरसकट पगडा कमी होऊ लागला. यांत्रिकीकरण झाले. दळणवळणाची साधनं वाढली. मानव जास्त प्रगल्भ झाला. समाजात खुलेपणा आला. माणूस जास्त स्वकेंद्रीत झाला . साहजिकच कलेनेही वेगळंच वळण घेतलं. स्वत:ला भावणारी, विचारांचं स्वातंत्र्य देणारी कलाकृती करण्याकडे कलावंतांचा कल राहिला. मग धर्म, राजवट यालाही न जुमानता कलाकार आपले विचार समर्थपणे मांडू लागले. आणि त्यातूनच मग हल्लीचे आधुनिक कलाविष्कार विकसित झाले. परमस्थानी पोहोचले. पण अजूनही काही धर्मांमधे हा खुलेपणा नाहीये. त्यामुळे कलाविष्कारातही दडपशाही दिसून येते. तरीपण जागतिक स्तरावर नव्या तंत्रज्ञान शोधामुळे खूपच एकरुपता आली आहे. मानवाच्या विचारात खोली आली आहे, समजेत गांभिर्य स्वमर्जीने आले आहे त्यामुळे एकूणच कलेमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग होताहेत. म्हणजे चित्रकला, शिल्पकला, गायनकला, नृत्यकला, नाट्यकला, वादनकला... अशा अनेकानेक ठळक आणि सुक्ष्म कलांचा उगम जरी धर्माशी निगडीत राहून झाला असला तरी आता हे सर्वच कलाप्रकार आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कारणांनी जगतात गाजताहेत. वृध्दिंगत होत आहेत. आपापल्या शाखेत परमस्थानी पोहोंचायचा प्रयत्न करताहेत ही फार आश्वासक गोष्ट आहे.
विशेषकरून एकूणच जगतात धर्म या कल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना हे सर्वच कलाप्रकार  समाजात यशस्वीपणे स्वतंत्र बाजासह प्रवाहीत होत आहे, नावारुपाला येत आहेत हे फार कौतुकास्पद आहे.
हल्ली हे सगळेच कलाप्रकार अगदी मुलभूत वैशिष्ट्यानीशी, ठाशीव वेगळेपणानी इतके समृध्द होऊन सामोरे येताहेत की या कलांचा उगम कधीकाळी धर्माच्या छत्रछायेखाली झाला हे सांगूनही पटणार नाही.

No comments:

Post a Comment