पुन्हा एकदा तेच.
ऑस्ट्रेलियात जायच्या आधी केस पर्म करायचे होते. पण तोकडे असल्यामुळे जमलं नाही. मग इजिप्तवारी ठरली. तिकडे अफ्रिकन ब्रेडिंग करु म्हणून गेले तर तिकडे हिजाबचा दणका. काहीही करायला सहजगत्या जमलं नाही. परतले तर हे उगाचच लांबलेल्या शेपट्या त्रासदायक वाटायला लागल्या. पर्मिंगचा बेत जरा पुढे ढकलत तरा तरा उठले आणि मॉलमधल्या जावेद हबीब पार्लर-सलूनमधे गेले. हल्ली मी लेडीज ब्युटी पार्लर्सच्या नादीच लागत नाही. आलं मनात की याच युनिसेक्स सलून्समधे येते. अपॉइंटमेंटची भानगड नाही का अवास्तव खर्च नाही. झटपट हेयरकट. त्यात आता अर्ध डोकं रुपेरी झालंय आणि स्वमर्जीने अस्मादिकांनी एकदा वपनही करुन घेतलंय. त्यामुळे मेलं कोंबडं जसं आगीला भीत नाही तशी मी आता केसांच्या कुठल्याही बिघडलेल्या त-हांना घाबरत नाही. झाला हेयरकट खराब तर काय बिघडलं ? चार महिन्यांत परत लायनीवर आणू हा खाक्या.
तर काल रविवारची संध्याकाळी या सलूनमधे गेले तर ही गर्दी त्या सलूनमधे. शेजारीच दूसरही सलून तसंच आहे. तिथेही वेटिंग. केसकर्तनाला पुरुष मंडळी तर कर्तन करुन घ्यायला तमाम मुली आणि महिलाच. दोन-चार पुरुष, बाकी सगळा महिलांचाही कारभार. तरुण मुलींचं एकवेळ समजू शकतं पण नाव्ह्याला इंग्रजीत काय म्हणतात हेही फटदिशी न सांगू शकणा-या अगदी घरगुती महिला देखील तिथल्या तरुणांकडनं सहजपणे केस कापून घेत होत्या, स्ट्रेटनिंग-स्टायलिंग करुन घेत होत्या.
गेल्या वर्षभरातला हा बदल बघून आश्चर्यमिश्रीत कौतुकच वाटलं.
काही गोष्टी किती झपाट्याने बदलताहेत आपल्याकडे. हेयरकटसारख्या पर्सनल गोष्टींच्या सेवाही आता पुरुषांकडून सहजगत्या करुन घेतल्या जात आहेत. यात समाजाचं एक निखळ रुप एका स्तरावर तरी जाणवतंय ही जमेचीच बाजू आहे.
टकाटक जिन्स-टॉपमधल्या शहरी तरुणी. हसतखेळत हेयरकट करुन घेताहेत. सळसळणा-या केसांना वळण लावून घेताहेत. आयर्निंग करुन घेताहेत. खुलेपणाने हेयरकट करणा-या तरुणाशी चर्चा करताहेत. मनाजोगता हेयरकट-स्टाईल झाली की प्रसन्न वदनाने थॅंक्यू म्हणत, जुल्फ उडवत निरोप घेत आहेत.
डोक्यावरच्या सळसळत्या, रेशमी महिरिपींनी चांगलं, आकर्षक दिसण्याची एक आदीम इर्षा मानवाची, स्त्रीजातीची.
पण भुतलावरच्या काही देशात ही जगन्मान्य उर्मिही डांबून ठेवली जात आहे, दडपशाहीने बंदिस्त ठेवली जात आहे. उगाचच या आपल्या सुकेशिनी मुली बघून तिथल्या, इजिप्तच्या हिजाबधारी मुली आठवल्या. नाईलाजाने हिजाबने डोकं झाकून ठेवणा-या, मोकळ्या केसातले आपले खाजगी फोटो पुनः पुन्हा बघत बसणा-या, हिजाबखाली धुसफूस करणा-या आणि लग्नानंतर तरी मुक्त विचारांच्या देशात रहायची स्वप्न बघणा-या या तरुण मुली राज्यकर्त्यांच्या खिजगणतीतही नसाव्यात याचं आश्चर्य वाटतयं.
हिजाब केस बंधनात ठेवू शकतो स्वप्न नाही !
No comments:
Post a Comment