Monday, 21 January 2019

Egypt...16 आमून रा.

चौदा जानेवारीला सुर्यास्ताला इजिप्तहून निघाले ती पंधरा जानेवारीच्या सुर्योदयाला भारतात घरी पोहोचले. १४-१५ जानेवारी म्हणजे भारतीय उपखंडातील मकरसंक्रांत. प्रांतवार नावं भलेही वेगवेगळी असोत. सुर्याचा मकर राशीतला प्रवेश करण्याचा हा दिवस आणि घसघशीत हिवाळी पीक हाती येण्याचा हा हंगाम. भलताच धुमधडाक्यात साजरा होतो हा सण सर्वत्र. भारतातले बहुतेक सण चंद्रकलांवरुन साजरे केले जातात. फक्त मकरसंक्रांत मात्र सुर्याच्या संक्रमणानुसार साजरी केली जाते.
याच दिवसापासून सुर्याचं उत्तरायण सुरु होतं. पृथ्वीच्या उत्तरगोलार्धातील काही भागातील गोठवणारा हिवाळा संपून ऊन्हाळ्याकडे मार्गक्रमण सुरु होतं. रात्र लहान होत जाते, दिवस मोठा होतो. वसंताच आगमन होतं. हिवाळ्यात जीव मुठीत घेऊन कशाबशा तरलेल्या वृक्षवल्ली जगण्याचा एक नवा डाव टाकतात. एकुणात सर्वत्र उत्साह असतो.

अस्मादिकांना आल्यापासून जेटलॅगचा भलताच त्रास होत आहे. म्हणजे हे माझं मत आहे. घरातल्यांची वेगळी मतं आहेत. असो. घर म्हटलं की मतांतरे असणारच.😉
सकाळचे आठ, साडे आठ झाले तरी डोळे उघडत नाहीयेत. सध्या फिरणं-योगा सुध्दा बंदच आहे. म्हणजे संक्रांतीला आठवडा झाला तरी हिवाळ्याचा अंमल अजून रेंगाळतोच आहे. सध्या कामाचाही धबडगा नाहीये.
So just chilling and enjoying life. 😁
लेकी बरोबरच्या अतिसहवासाचा परिणाम. 😌

पण तुम्ही झोपलात म्हणून का उजाडायचं रहाणार आहे का ऋतू थांबणार आहेत ?
जगरहाटी लागतेच कामाला. त्या सुर्यानी मकर राशीत केलेला प्रवेश भले कुणाला कळो ना कळो पण उत्तरायणाची, व उन्हाळ्याची पहिली चाहूल कुणाला लागत असेल तर त्या लाल-काळ्या मुंग्यांना.
बापरे, एवढूसा जीव पण भलताच चाणाक्ष. सुर्याचं संक्रमण काय झालं आणि लागल्या की त्या लाल मुंग्या कामाला. बघावं तिथे यांच्याच लांबलचक लाईनी. अक्षरशः मागोवा घेत गेलं तर मानमोडीच व्हायची. 🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜
तर थोडक्यात ऑफिशियली उन्हाळा दाखल झाला आहे. त्याचा पायरव जाणवत आहे.

आता म्हणाल तुमच्या प्रोफाईलचा आणि मुंग्यांचा काय संबंध ? तर हा फोटो अस्मादिकांनीच काढलाय. आणि अस्मादिकांना भलताच आवडलाय. पोष्टायला निमित्त नको का ? मुंग्या, उन्हाळा आणि 'आमून रा' ची सुर्याधिष्टीत
संस्कृतीच्या समिकरणानी निमित्त दिलं हो लिखाणाला.

प्राचीन इजिप्तच्या मिस्र, कॉप्टिक व इस्लामिक सांस्कृतिक ठेव्यामधून काळजात घर कोणी केलं असेल तर मिस्र संस्कृतीनेच.
सुर्याला(आमून रा) परमस्थानी ठेवून त्याच्यासाठी भली थोरली मंदिरं उभारणारी, सुर्याची पुजापाठासह आराधना करणारी, सुर्यदेवासाठी तन, मन, धन वेचणारी ही संस्कृती आणि तिची प्राचीन भग्नावषेशं जीवाला अक्षरशः वेड लावतात.
मकरसंक्रंमणाच्या काळात सुर्यास्ताला इजिप्त सोडताना तो सगळा झगझगीत इतिहास अवाढव्य, बारीकसारीक भग्नावषेशांसह डोळ्यासमोरुन सरकला.
या मिस्र संस्कृतीने आता अभ्यासाला, चिंतनाला एक घसघशीत विषय दिला आहे. इथल्या या संस्कृतीचे कितीतरी धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोंचलेले आहेत. एक ह्रद्य शिदोरी पदरी बांधून परतले आहे.❤️

Egypt, eternally I will be grateful for that.
🙏

No comments:

Post a Comment