इजिप्तवरुन घरी पोहोचले तर कामवाल्या बायकांची दांडी. का तर संक्रांत म्हणे.
च्यामारी ! आपणही काय दिवस निवडलाय घरी पोहोंचायला.
तरी उशीराने का होत नाही एकजण आली. बरोबर आठ वर्षांची मुलगी. ताई..कामं नका जास्तीची काढू आज. सन हाय. मला आन् पोरीला बांगड्या भरायच्या हायिता. पटापटा कामं करुन सन करायचा हाय घरी जावून.
भारतात खरं तर सततच ढीगभर सणवार होतंच असतात. तरी या संक्रांतीचं, आणि त्या हळदीकुंकवाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे महिलावर्गात. लहानपणापासूनच मी ही संक्रांत आणि हळदीकुंकू अनुभवत आले आहे. पण या सणाचा, समारंभाचा दिखावूपणा एवढ्या दहा-बारा वर्षांत जास्तच जाणवू लागलाय. लोटपोट काळ्या साड्यांनी बाजार ओसंडून वाहतो, चांदीचे करंडे, अत्तर-गुलाबदाण्यांनी सोन्या-चांदीच्या पेठा झगमगून उठतात. तमाम महिलावर्ग देखणेपणाच्या, साजशृंगाराच्या, घर सजावटीच्या चढाओढीत भाग घेतल्या सारखा थाट करुन असतो.
आपल्यासाठी किती सहज आहे हे सगळं.
महिलांना शृंगार करायला आवडणं, त्यासाठीची कारणं असणं, पोषक सामाजिक वातावरण असणं, तोडीसतोड व्यापारपेठ सज्ज असणं.
It's a complete circle by itself.
नुकतीच इस्लामचा पगडा असलेल्या इजिप्त या देशात फिरुन आली आहे. सध्या तिथे थंडीचा कडाका आहे. जो तो दोन-तिन लेयर्ड कपड्यांमधे. नखशिखांत बुरखाधारी महिलांचा तर प्रश्नच नाही. काळ्या, घोळदार कपड्यात उबदार वाटतंच असणार. पण कैरोमधल्या बहुतांश मॉडर्न महिला पण हिजाबशिवाय नसतातच. टाईट जिन्स घालतील, टी शर्टस् घालतील, ट्रेंडी पुलोव्हर्स-ओव्हरकोटस घालतील, नी लेंग्थचे टकाटक शूज घालतील पण तो डोक्याचा स्कार्फ हिजाबसारखा फक्त चेहराच दिसेल असाच गुंडाळतील. त्यातही अजूनही फार वैविध्य आलेलं नाहीये. एक तर काळा रंग नसता एखादी पेस्टल शेड. उगाचच ठिपके, चेक्स, लहरी, लेपर्डप्रिंट असली डिझाईन्स आणि नवरंगांची आतिषबाजी नाहीच.
ना ही एखादी वुलन कॅप चालते ना ही एखादा वुलनचा स्टोल. हिजाब म्हणजे हिजाब. डोक्याभोवती घट्टमुट्ट गुंडाळलेला, पिन अप केलेला, केसांची बटही दिसू न देणारा हिजाबच.
आणि हिजाब मधला चेहरा ?
एकदम लाजवाब. घट्टमुट्ट हिजाब मधून झळकणारा बदामी गोरापान चेहरा, नाकी डोळी तर सुरेखंच.
फट्ट गो-या रंगावर त्या कमानदार भिवया काळ्या पेन्सिलीने खचाखच कोरलेल्या, चमकदार डोळ्यांना गर्द आयलायनर, पापण्या वळवून लांबसडक आणि काळ्याभोर केलेल्या, निळी-हिरवी आय शॅडो, आणि ओठांना लेटेस्ट ट्रेंडी शेड. लालचुटुक नेलपेंट. आधुनिकपणात कुठे म्हणून कसर नाही. कुटुंबीयांसोबत असतील तर सिगरेटस् ओढतील, मैत्रिणींबरोबर वा एकेकट्याही रस्त्यालगत बसून शिशा एंजॉय करतील. पण हिजाबला चॅलेंज नाही. अगदीच काही नाहीतर आपण केसांना मेंदी लावल्यानंतर जसं फडकं गुंडाळतील तसं तरी कापड गुंडाळतीलच. पण हिजाबशिवाय बाहेर पडणं केवळ अशक्य आहे.
अर्थात काही पुरोगामी महिलाही आहेत. पण फारच नगण्य.
पण हिजाब खाली धुमसणा-यांची संख्या मात्र भरपूर आहे. थोडी जवळीक साधली की असंतोष जाणवतोच. तिथल्याच माझ्या ओळखीच्या दोन हिजाबधारी तरुणींनी अत्यंत विश्वासाने मला त्यांचे लांब आणि रेशमी केस दिसवणारे वैयक्तिक फोटो फार कौतुकाने दाखवले होते आणि त्या बद्दलच्या कॉंप्लिमेंटस पदरात पाडून घेताना त्या मनोमन सुखावल्या होत्या. एक दोघींचे तर व्हॉट्स ॲप प्रोफाईल देखण्या पण मुक्त हेयरस्टाईल केलेल्या अनोळखी पोस्टर गर्लीश मुलींचे आहेत.
इतकी खोल ठुसठुस या हिजाबची आहे.
जाऊ तिथे आमच्याही भुंड्र्या पण मोकळ्या केसांच अपार कौतुक केलं जायचं. परत आपल्या झिप-या बॉलीवूड हिरॉईन्सची जादूही आहेच सर्वांवर.
काळे, सिल्की आणि स्ट्रेट हेयर असणं आणि दिमाखाने दाखवता येणं हे एक रम्य स्वप्न आहे इथल्या मुलींचं.
उगाच नाही डाबर आंवला केश तेलाने इथलं मार्केट काबीज केलंय. हिजाबखाली हेच तेल राज्य करतंय.
कैरोच्या आकाशात दर दहा मिनिटाला एकतरी विमान दिसतं. Means it's so well connected with the world.
इथले जागोजागीचे उंचच उंच मिनार आणि अष्टदिशांनी घुमणा-या अज़ानी.....
तरी पण 'आहे रें'च्या नजरेतून एक अस्वस्थता सुटतीये, राज्यकर्त्यांच्या काळजापर्यंत एक हाक पोहोंचत नाहीये.
राजा वेळीच जागा हो, काळाची पावलं ओळख, नसता...
No comments:
Post a Comment