Wednesday, 16 January 2019

Egypt...14

खरंतर इजिप्त ट्रिपसाठी कुठल्याही शॉपिंगचा एजंडा नव्हता. नुकतीच ऑस्ट्रेलिया ट्रिप झाली होती. आणि इजिप्त म्हणजे पावलोपावली बघण्यासारखं. त्यामुळे बघणं हे प्रायोरिटी होती. शॉपिंग डोक्यातच नव्हतं. तरी पण फिरत गेलो, बघत गेलो, वस्तू-जिनसा आवडत गेल्या तशा थोड्याफार खरेदी केल्याच गेल्या.😉

इथे करकडी नावाचं पेय मिळतं. गरम-थंड कसंही घेता येतं. जास्वंदीची वाळलेली फुलं अथवा त्याची पावडर पाण्यात उकळायची, गाळायची, साखर घालायची आणि हिवाळ्यात गरमागरम, तर ऊन्हाळ्यात थंडगार प्यायची. छानच आंबटगोड चव लागते. आम्ही मायलेकी(लेक जास्त) तर या गरम करकडीच्या प्रेमातच पडलो. विशेष करुन आस्वानचं हे उत्पादन आहे. आस्वानमधेच बाजारात फिरताना चहा-कॉफी-मसाल्यांचा दुकानात पोहोंचलो. हिशोबात मिळणारी करकडी पावडर भराभर भरपूर पॅकेट्स घेतली. थोडी जास्वंदीची वाळलेली फुलं पण नाईल काठावरच्या सुहेलच्या बाजारात घेतली. असलं काही पाहिलं की डोकं फार चालतं आपलं.😇
नाही जास्वंदीचं पण गुलमोहराचं असंच पेय करुन पहायला काय हरकत आहे आपल्या गावी ? लहानपणी तर सततच आंबट गुलमोहर फुलं खाल्ली आहेत आपण. आणि हिरण्यची वानरसेना तर आजही ऐन बहरातल्या गुलमोहराचा फुलोरा चट्टामट्टा करुन जातातच की.

आस्वान हा प्रांत म्हणजे दक्षिण इजिप्तचा भाग. इजिप्तशियन्सच्या भाषेत अपर इजिप्त. या भागाला लागूनच न्युबिया हा देश होता. म्हणजे मिस्र संस्कृतीचे चालक-पालक-तारक न्युबियन्सच होते. आता तो देश संपुष्टात आला, आणला गेला आहे. त्यामुळे इजिप्तच्या दक्षिणेला आता सुदान देश आहे. इथलं बारीक मण्यांच कामही प्रसिद्ध आहे. रंगबिरंगी मण्यांच्या सुंदर माळा व रुंद नेकलेसेस इथे भरपूर मिळतात. न्युबियन आर्टच वैशिष्ट्य असलेल्या या दोन-चार माळा गेल्यासरशी घेऊन टाकल्या. बार्गेनिंग चांगलंच करावं लागतं. 200 रुपयांची वस्तू 60 रुपयाला मागायची, घासाघीस करुन 100 ला टेकवायची हा थंबरुल.🤗

इथे पण सर्वच पर्यटनस्थळी पपारस कागद, ग्रॅनाईट-एॅस्बेस्टॉसच्या दगडी वस्तूंचे लघू कारखाने कम् विक्रीकेंद्र या ठिकाणी पर्यटकांना सहेतूक फिरवायची क्लुप्ती आहेच. आम्ही फसलो नाहीत. पण प्लेन पपायरसचे कागदं आम्ही कैरोतच वाजवी दरात घेतले. (असा आमचा समज आहे.)
इथल्या प्रत्येक रेस्टॉरंट किचन मधे पितळी छोटेखानी कॉफीचा डाव असतो. टर्किश कॉफीसाठी हा कप वापरतात. खरी पध्दत छोट्या स्टोव्हवर या ओगराळ्यासारख्या डावात पाणी गरम करायची पध्दत आहे. आता बहुदा फक्त मापटं म्हणून त्याचा वापर करतात असं मला वाटतं. भलताच गोंडस दिसतो हा डाव. खान अल् खलिली बाजारात तिही भांडी सोवेनियर म्हणून घेऊन टाकली.

आस्वानला नाईलच्या किनारी शोकेशी न्युबियन व्हिलेजेस आहेत. बोटीतून तिथे जाता येते. तिथेच हॅन्डीक्राफ्टचा रंगारंग बाजारही भरतो तसेच न्युबियन घरातनं चहाही विकत घेऊन पिता येतो. पर्यटनाच्या दृष्टीने जबरदस्त जमलेला खेळ आहे. चहा तर नाही घेतला आम्ही पण बाजारात खूप फिरलो. त्यात परत इंदिया, नमस्ते, अमिताभ, शाहरुखचे उस्फुर्त हाकारे. जत्रेसारखा देखणा, रसरसलेला बाजार, उंटावरच्या सफारी, हिना काढून द्यायला रुपवती पण धटिंगण न्युबियन महिला. हिनासाठी आमच्या बोट चालकाने आधीच सावध करुन ठेवलं होतं आम्हाला. हिना..हिना करत, काढत या महिला चक्क बायकांच्याही अंगचटीला येतात म्हणून. ऐकावं ते नवलंच. पण या महिला पाहिल्यावर या कथेत तथ्य असावं अशीच खात्री वाटली. 😲
हं..तर काय सांगत होते ? तर इथे टेबलमॅटस् सारख्या रंगीत दोरे गुंडाळलेल्या मॅटस् मिळतात. खूप छान दिसतात. त्यातली एक मॅट घेतली. तिला भिंतीला अडकवायला एक लूप पण आहे. तर ही मॅट भट्टीतला गरम ब्रेड काढण्यासाठी वापरतात. आणि सुपासारखी फडकवत ब्रेड गार करतात. ब्रेड करणा-या महिलेचे हात पोळून नये म्हणून या सुपलीमॅटचा वापर घरोघर करायचे पुर्वी. आता एवढी छान माहिती दिल्यावर मॅट घेतल्याशिवाय पर्याय नव्हता.😌

रेड सीच्या जवळच्या हरघड्याला काही नाही तर अस्मादिकांनी लाकडी खलबत्ताच घेतला म्हणजे घ्यावा लागला. तिथल्या एका रेस्टॉरंटच्या किचनमधे डोकावले असताना असा खलबत्ता दिसला. जरा कौतुक मिश्रीत कुठे-कसं मिळेल अशा चौकशा केल्या तर, दुस-या दिवशी रेस्टॉरंट मालकाने लागली टैक्सीच बोलावली बाजारात जायला. अगदी नाईलाज झाला. खलबत्ता आवडालाच होता पण प्रवासातल्या वजनाचाही धाक होताच. आणि आता खलबत्त्यांची माळ गळ्यात घालावी लागेल इतके खलबत्ते झालेत घरात.
देशोदेशीचे, प्रांतोप्रांतीचे खलबत्ते...एक म्युझियमच करावं म्हणतेय आता.😉

तसंच कैरोतल्या खान अल् खलिलीमधे गेल्यासरशी सुरमा घेतला.👁️👁️ राणी नेफरतिती ब्रॅंडचा.🧖 लाल-काळ्या गुंजायुक्त रंगीत, सुगंधी धूपही घेतला.
ताहरिर चौकात तमाम इजिप्तशियन मिस्र आणि इस्लामिक संस्कृतीतल्या विख्यात व्यक्तींच्या नावे असलेले बरेच परफ्युम्स घेतले.🏵️💮🌸🌺🌹 कैरोतच अल् अझार पार्कमधल्या आपल्या फॅब इंडियासारख्या स्टुडियोमधून एक छानसा टिपिकल इजिप्तशियन जाळीदार इलेक्ट्रिकचा दिवा घेतला. आदल्या दिवशीच इस्लामिक आर्ट म्युझियममधे कैरोच सिटी ऑफ ऑल काईंड ऑफ लॅंपस् एॅंड 'क्वानादील' ( Cairo..souq el-Qanadil' कंदील) हे प्राचीन बिरुद मनात ठसलं होतं. खरंतर खान अल् खलिली बाजार या दिव्यांनी भरलाय. पण तेव्हा 'qanadil'ची महत्ता कळली नव्हती. कैरो आणि कंदीलाचं नातं कळलं आणि तोही लैंप लगोलग घेऊन टाकला. मनात भरलेला इजिप्तशियन ड्रेस गलेबियाही घेतलाच.
बाकी शास्त्रापुरते नाईलचे गोटे, वाळवंटातील वाळूही हातासरशी उचललीच.😜
एकूणातच नाही म्हणता माफकच पण वैशिष्ट्यपूर्ण खरेदी झाली.
फक्त इच्छित असं पपायरस पेपरवरचं हॅंडपेंटेड पेंटिंग, कोरीव काम केलेली धातुची प्लेट आणि अॅलॅबॅस्टरचा कॅन्डल स्टॅन्ड घ्यायचा राहिला.

पुढच्या ट्रिपसाठी काहीतरी शिल्लक नको का ?🤔

No comments:

Post a Comment