Wednesday, 9 January 2019

Egypt...9 शिशा..हुक्का.

इजिप्तमध्ये आल्याच्या पहिल्या दिवशीच फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि धक्काच बसला. आम्ही रहातोय अगदी मध्यवर्ती अशा ताहरीर स्क्वेयरजवळ. चतुरस्र रस्त्यांची गुंफण. चारसहा मजली एकसारख्या इमारती, एका जवळ एक. झाडांचा अर्थातच पत्ता नाही. गॅरेजेस, टप-या, कॅफेज्, रेस्टॉरंट्सची सरमिसळ. तरीपण फुटपाथ वरती आणि दोन इमारतींच्या मधल्या बोळात ठिकठिकाणी हुक्का जॉईंटस चालू होते. छोटासाच एक टेबल, छोट्याच खुर्च्या आणि फक्त हुक्का, टर्कीश चहा-कॉफी, करकडी, लेमन ड्रिंक अशी मोजकीच गरम-थंड पेय. तिही माफक दरात.
दर दोनेक इमारती नंतर साताठ टेबलांचा एक स्टॉल लागलेलाच दिसतो इथे. सध्या थंडी आणि वारंही खूप आहे इथे. त्यामुळे झाला सुर्यास्त की हे स्टॉल्स भरायला लागतात. येणारे जाणारे पुरुष, महिला अगदी आवर्जून इथे निवांत बसून हुक्का ओढत बसतात. एखादा चहा कॉफी घोटा घोटाने घेतात आणि घटका दोन घटका जीवाची मौज करतात.

इस्लामिक देश असला तरी हिजाब घातलेल्या आधुनिक महिलाही एकट्या-दुकट्या शांतपणे हुक्का पित बसतात इथे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे वाकड्या नजरेनी कुणीही बघत नाही. न जाणारे येणारे नजर लावतात न ही हुक्का पेटवून देणारा नजर वाकडी करतो त्यांच्याकडे. वाळवंटी प्रदेश असल्यामुळे रात्रीच्या दहा-आकरापर्यंत मंडळी सुखनैव बाहेर रमतात. थंडीचा कडाका बघून निवांतपणे हुक्का ओढत बसतात. अर्थात कामं धामं नसलेली पुरुषमंडळी दिवसादेखील ब्लॅक टी बरोबर हुक्का मारत ऊन घेत बसतात अंगावर.
म्हणजे आपल्याकडे जशा चहाच्या टप-या असतात तसेच इथे हुक्का जॉईंटस संध्याकाळनंतर अहमिकेने चालतात. नौकरी धंदा आटोपून मित्रांबरोबर हुक्का मारत बसणे, गरम चहाच्या घोटांबरोबर शिळोप्याच्या गप्पा मारणे नसता चेकर्सचा गेम खेळत बसणे हा इथल्या बहुतेक लोकांचा छंद आहे.
महिला मात्र कामावरनं घरी जाताना घटकाभर टेकतात. एक हुक्का मारत मारत फोनवरनंच गप्पा आटोपतात आणि पळतात घराकडे.
वेगवेगळ्या फ्लेवर्सचा हुक्का कम तंबाखू मसाला मिळतो. आवडीपणाने तो मसाला कोळशाच्या मदतीने जाळायचा, त्याचा धूर तोंडांत घेऊन छाती गरम करुन तो धूर बाहेर सोडून द्यायचा. हुक्का ओढणं इथल्या आणि मिडल इस्ट परिसरातील थंड हवेच्या ठिकाणांचा जगण्याचा भाग आहे.
मध्यंतरी आपल्याहीकडे या हुक्का-शिशाची शहरी लाट आली होती, पण संभाव्य गैरवापरामुळे त्यावर बंदी आली. पण कश्मीर, राजस्थान, हिमाचल, उत्तरप्रदेशातल्या ग्रामीण भागात हुक्का ओढला जातो.
भारतात मी कधी हुक्क्याच्या नादी लागले नव्हते.
पण इथल्या कडकडीत थंडीत, असल्या धुवां ही धुवां वातावरणात परका वाहता रस्ता बघत उबदार हुक्का ओढत बसणं भलतचं जीवाला भावलं राव.

No comments:

Post a Comment