Friday, 11 January 2019

Egypt...10

कालपासून माझी आणि मुलीची इजिप्त ट्रिपमधली फारकत झाली. ती तिच्या कामाला गेली आणि आता पुढचे चार दिवस माझी मी एकटीच इथे कैरो आणि आसपास फिरणार आहे.
परक्या देशात तेही गेले दहा दिवस अनुभवलेल्या इस्लामिक देशात तिचं आता कॉर्पोरेट टीमबरोबर एकटं रहाणं साहजिकच मला चिंतीत करत होतं तर उबर टैक्सी, डॉलर-पौंड-रुपयांचे घोळ, कार्डांनी ट्रॅंझॅक्शन्स करणं, एटिएममधनं पैसे काढणं, जीपीएसनी ट्रॅक ठेवणं ही असली माथापच्ची पण महत्त्वाची कामं आपली आई आता कशी करेल या काळजीने तिला ग्रासलं.

हल्लीच्या काळात तेही परक्या देशात कायमचं दक्ष रहायला लावणारी ही कामं कन्या बिनबोभाट करत होती. म्हणजे मला या गोष्टी खरोखर सफाईने (म्हणजे करताच) करता येत नाहीत, आणि शिकायचीही माझी इच्छा नसते. तरीही शेवटच्या रात्री एक क्रॅश कोर्स लेकीने घेतला आणि सकाळी छुप्या काळजीने पण प्रसन्न वदनाने एकमेकींना बाय-बाय केला.

सुन्न-रिकामी खोली. तिची कामाच्या ठिकाणावरची स्थिरस्थावर होईपर्यंतची काळजी. त्याहून माझ्यासाठी आ वासून पडलेला कैरोतला आजचा आणि पुढचे चार दिवस.
आणि पर्याय नसलेली वर नमूद केलेली अलर्टनेस आणि टेक्नोसॅव्हीनेसची अवघड प्रश्न पत्रीका.
त्यात आता इस्लामिक कैरोच बघायचं राहिलं आहे. (दहा-बारा दिवसांपूर्वी इथे टुरिस्ट बसवर बॉंबस्फोट झालेला त्यामुळे एकटीचं एॅलेक्झ्रांडिया व इतर ठिकाणं कधीच निकालात निघालेली) आता फक्त कैरो फिरण्याशिवाय पर्याय नाही.
अवाढव्य कैरो शहर. मॉन्युमेंटस, मशिदी, म्युझियम्स्, बाजारांनी खच्चून भरलेलं कैरो. कसं मी बघणार आता? इंग्लीशचा तर इथे आनंदच आहे. जाऊ तिथे तगडी तिकिटं, वेळप्रसंगी फिरवा फिरवी. गुगल ट्रांन्सलेटर, जीपीएस, उबर बोलावणं, तिचं ट्रॅकिंग करणं, टॉयलेट्स, व्हेजफूड...राम..राम...राम....
कसं निभणार आता लेकी शिवाय ?
पर्यायच नसतो तेव्हा हिंमतीचाच दोर पकडावा लागतो.

हॉस्टेलवर मालकाच्या सदिच्छा घेऊन भरदूपारी बाहेर पडले. खटपट करुन उबर बोलावली. जवळच्याच ३-४ आर्ट गॅलरीज् पाहिल्या. रस्त्यावरच्या ठेल्यावरचे खारे दाणे खात भरपूर पायी फिरले. घासाघीस करुन विस इजिप्तशियन पौंडांना किलोभर सफरचंद घेतली आणि ब-यापैकी कंफर्टझोनमधे आले.
संध्याकाळी कैरो टॉवर पहायला गेले. ६७-६८ मजली टॉवर. वरुन कैरो-नाईलचं विहंगम दृश्य दिसतं. गार हवा, भन्नाट वारं... भरभरून श्वास घेतला. जरासा कॉन्फिडन्स वाढला. सकाळची अवघड प्रश्न पत्रिका जराशी सोपी वाटायला लागली.
हॉस्टेलवर पोहोचले. सुखरुपतेचा पहिला मेसेज लेकीला टाकला. तेवढ्यात सुखरुप आहात का, पोहोंचलात का अशी विचारणा करणारा दुसरा मेसेज हॉस्टेल ओनरचा आला.
So everything is good that ends well.

Life is beautiful and promising

No comments:

Post a Comment