कालचा दिवस इस्लामिक कैरोचा होता.
सकाळीच बाहेर पडले. सर्वप्रथम कैरो सिटॅडलला गेले. भरपूर मोठा परिसर. एका राजवटीने इनव्हेडर्सपासून सुरक्षितता म्हणून ठरवून बांधून घेतलेला मोठा परिसर. चौफेर तटबंदी. मधे प्रशस्त देखण्या मशिदी. पण जशा जशा राजवटी बदलत गेलेल्या तशा तशा जून्या राजवटी नामशेष करण्यासाठी म्हणून जून्या इमारती पाडून त्यावर नवर्या इमारती बांधल्या गेल्या. म्हणजे जुन्यातही अनेक पदर आहेत. पण सद्य परिस्थितीत एक देखंण, उंचावरचं धार्मिक आणि पर्यटनप्रेमी ठिकाण म्हणजे सिटॅडल हा भाग आहे. भरपूर गर्दी. त्यात आज सुक्किरवार. सगळ्या मशिदी चहलपहलने भरलेल्या, स्पिकर्सवरच्या प्रार्थनेने आसमंत दुमदुमून टाकणा-या. मागच्या सुक्किरवारी लुक्सारला होते, आज कैरोत, तेही पुरातन कैरोच्या भागात.
नंतर इथुनच जवळ असलेल्या जगद्विख्यात अल् अझार आणि अल् हुस्सेनी या दोन आमने-सामने मशिदीत गेले. जवळच खान अल् खलिली हा प्राचीन बाजार. तुंबळच गर्दी. सगळे धार्मिकतेने ओतप्रोत भारावलेले. धर्म आणि बाजार हातात हात घालून. त्यामुळे रेटारेटी, अस्वच्छता पराकोटीची. अस्मादिकांनी आज नेमकं पॅन्ट-टॉप घातलेला. स्कार्फ तर असतोच नेहमी. तरीही एका पो-याने हटकलंच पॅन्टस् चालणार नाही म्हणून. म्हटलं आता मी काय करु तर लगेच एक ढगळा गाऊन माझ्यापुढे ठेवला. हे घाला आणि फिरा म्हणाला. नसता प्रवेश नाही. सारासार विचार केला आणि बुध्दीचा कौल घेत नको म्हटलं. जरा निरखून पाहिलं तर खरोखर सर्व महिलांनी पायघोळच कपडे घातलेले. पण तेवढ्यात एक मुस्लिम जोडी दिसली. त्या महिलेने ही जिन्स आणि वर उबदार पण अर्ध्या मांड्या झाकल्या जातील असं उबदार जॅकेट घातलं होतं. लगेच त्या पोरवसदा मुलाच्या लक्षात आणुन दिलं. जरा तिचे आणि माझे कपडे निरखून म्हणाला तिचा टॉप लांब आहे तुमचा लांडा आहे. नाही तुम्हाला आत जाता येणार. आयुष्यात कुणी असलं माप माझं काढलं नव्हतं. आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत नट्यांच्या स्कर्टसच्या, गळ्याच्या लांबी-उंची-रुंदी वरुन बरीच अनऑप्रेप्रियेट खदखद होत असते हे वाचून होते.
असो.
एक जगतविख्यात टोलेजंग वास्तू, न बघता परतणं जीवावर आलं. पण तो गाऊन घालणंही वैचारिक दृष्ट्या पटेना. मग अस्मादिकांनी आपला शेवटचा हुकमी छाप का काटा मनोमन केला.
अल् अझार न बघता आयुष्यातली पंचावन्न वर्ष गेली, आता पुढची पण जातील. चला, निघा.
या वास्तुचं धार्मिक महत्व मला जाणवत नव्हतं. पण आर्किटेक्चरली, ऐतिहासिक दृष्ट्या मात्र कौतुक होतंच आणि आहेही. पण आजच्या या रेटारेटीत आणि धार्मिक दरवळात त्या दृष्टीने ही वास्तु बघणं अशक्य होतं. माघारी फिरले.
मशिदीला ओसरीसारख्या चारी बाजूंनी गॅल-या होत्या. डावी-उजवी बाजू कापडांनी बंदिस्त, एकांती केलेली. तिथे तमाम महिलावर्ग घोळक्यानी कुराणाची पठणं करत बसलेल्या. मिळेल ती जागा आणि दिशा घेऊन बैठकमारुन पठण चालू होतं. वातावरणात गांभिर्य आणि दरारा जाणवत होता. निघाले. तरीही शेवटचा उपाय म्हणून एका सुशिक्षित पोलिसाला विचारलंच. No madam, rule is rule म्हणत त्यानेही हात झटकले. पण त्या महिलेच्या कुडत्याची लांबी आणि माझ्या कुडत्याची लांबी यासाठी त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आणि त्यासाठी अजून रस्सीखेच करण्यात मला स्वारस्थ्य उरलं नव्हतं.
रस्ता ओलांडला की दुसरी अल् हुस्सेनी मशिद. मुहंमदाच्या नातवाची. जागतिक इस्लाम धर्मातलं एक प्राचीन पवित्र ठिकाण. एकतीस डिसेंबरला आम्ही मायलेकी इथेच आलो होतो. एक जानेवारीला मशिदीचा बहुदा स्थापना दिवस असतो म्हणून भरपूरच रोषणाई केलेली होती. आणि अर्थातच उत्साही गर्दी अफाटच होती.
आजही आहेच. परत तेच, बाजार, धार्मिकस्थळं, तिथली जत्रा, दानधर्मी कार्यक्रम. हवश्या नवश्यांची रेटारेटी. तरीही खास महिलांसाठी असलेल्या दारातून शिरले. भलामोठा उंचापुरा हॉल पण तोही महिलांच्या लेकूरवाळ्या काबिल्याने भरलेला. मिळेल त्या ठिकाणी बसून पठणं नसता प्रार्थना करणं चालू होतं. पण अल् अझार मशिदीसारखं दबकं वातावरण इथे नव्हतं. नतमस्तक व्हायच्या ठिकाणी तर अजून गर्दी. तिही स्त्री पुरुषांची. जीव-बुध्दी गुदमरायला लागली. जवळ जाऊन काय मिळणार आहे आपल्याला ? हरवल्यासारखी होत भांबावून तशीच बाहेर पडले आणि तडक खान अल् खलिली बाजाराकडे वळले.
जगातल्या एका प्राचीन आणि झगझगीत बाजारगल्ल्यांमधनं पुन्हा इंदीया, नमस्ते, अभिताभ आणि शारुकचे परिचित हाकारे आले आणि अक्षरशः हायसं वाटलं.
No comments:
Post a Comment