Saturday, 5 January 2019

Egypt...6 निल..नाईल...

इजिप्तशियन संस्कृती नाईल नदीला 'नील' म्हणते. आस्वानमधे तर अजूनही तिचा नील म्हणूनच उल्लेख करतात. आस्वानच्या लोकांना नीलचं, लेक नासेरचं, हाय डॅमचं भलतचं कौतुक. आणि का नसावं ?
जगातल्या सगळ्यात प्राचीन संस्कृतीला नावारुपाला आणणारे रामेसिस आणि त्याची वंशावळ आस्वान परिसरातील होती असं म्हणतात.

या नीलच्या काठावरच एक प्राचीन आणि प्रगतीशील संस्कृती होती, बहरली होती यांच्या ठायीठायी खूणा आपल्याला दिसत रहातात.
इथली सगळी भग्नावषेशं मिस्र संस्कृतीचीच आहेत. देव ही संकल्पना,(विषेशकरुन सुर्याला परमस्थानी ठेवणारी) देवांची भव्य मंदीरं, देवी-देवांच्या मुर्त्या, त्यांच्या पुजा-समारंभ, त्यांचा दरारा-प्रेम आणि सगळ्यात शेवटी देवप्रदाला आपण म्हणजे राजाने पोहोचणं आणि मरणानंतरही 'अमर' होऊन आयुष्याचा आनंद लुटत रहाणं अशा ढोबळ विचारांनी ही संस्कृती बहरली होती, भरभराटीला आली होती. भरभराट म्हटली की आक्रमणं आलीच. ग्रीक, रोमन्स, क्रिश्चन्स आणि नंतरच्या इस्लाम धर्मामुळे ही प्राचीन संस्कृती आता नामषेश झाली आहे. फक्त दगडी भग्नावषेश शिल्लक आहेत. सद्यपरिस्थीत इथल्या तत्कालीक संस्कृतीच्या पोटापाण्याची सोय काही अंशी ही मिस्र भग्नावषेशं इमानेइतबारे लावताहेत.

गेल्या पाच हजारांहून जास्त वर्षांपासून आपल्या अंगाखांद्यावर अनेक विरोधाभासी संस्कृत्या खेळवणारी, बहरवणारी नील नदी ख-या अर्थाने जगन्माता आहे. सगळी स्थित्यंतर सोसून, चढ उतार बघून ही नदी अव्याहतपणे तीचती पुरातन निळाई घेऊन वहात आहे. कुठलाही दुजाभाव न करता या भुमीला सुजलाम्, सुफलाम् करते आहे.

आज जर रामेसिस अवतरलाच तर ही नील, तो आमुन रा(सुर्यदेव), हे वाळवंट आणि एकेकाळच्या संपन्नतेची खंडहरं याखेरीज कशाचीही ओळख त्याला लागणार नाही.

No comments:

Post a Comment