Friday, 4 January 2019

Egypt...5

लुक्सारची दुपार झाली आहे. आज शुक्रवार आहे. सगळं गाव-बाजार सामसूम आहे शुक्रवार म्हणून. हॉस्टेलच्या टेरेसवर येऊन जरा पोटापाण्याची सोय लावून घेत आहोत. आम्ही उंच, चौफेर पसरलेलं लुक्सार. अचानक अष्टबाजूंच्या मशिदींमधून अझान सुरु झालेली. इथेही माईकचा तडाखेबंद बडगा आहेच. सगळ्या प्रार्थना एकावर एक आदळत आहे. प्रार्थना संपली आता मौलवींची आक्रस्ताळी, ठाशीव प्रवचनं सुरु झाली आहेत. अख्ख्या लुक्सारमधे हा आवाज एको होतं घुमत आहे. वर टळटळीत ऊन, चहुबाजूंनी फिक्कटलेले तपकिरी पिवळे डोंगर, तपकिरी बंदिस्त घरं खाली, अधूनमधून हिरवळीचे, झाडींचे ठिपके, गावांमधून वाहणारी प्राचीन जलमाता निल नदी, इथल्या किचनमधून येणारा भाताचा सुवास. इथल्या कर्मचा-यांना देखील प्रार्थनेची घाई झालेली. कूकला बिचा-याला नेमक्या प्रार्थनेच्या वेळीच काम करावं लागतंय. त्यात आज नेमका शुक्रवार. सगळे धर्माने पेटलेत. कूकला तू प्रार्थना करतोस का विचारलं तर तो म्हणाला
हो रोज करतो, दिवसातून पाच वेळा.
Don't you see this ?
..What ?
स्वत:च्या कपाळावरचा निबर काळपट डाग दाखवून मला म्हणाला, this mark shows that I do prayers regularly.
रोजच प्रार्थनेसाठी म्हणून पाच पाच वेळा नियमित माथा टेकवून त्याच्या कपाळावर निबर घट्टा झालेला.
आयुष्यात पहिल्यांदाच हा प्रकार बघताना, या निरभ्र आकाशाखाली इथे उपरं वाटतंय.

No comments:

Post a Comment