कैरो म्युझियमची दिवसभराची पायपीट आणि संध्याकाळी अल् खलिली खान मार्केटची सफर. आज वर्षांचा शेवटचा दिवस.
सुप्रसिद्ध हुसेनी मॉस्कजवळच हा रसरसलेला बाजार आहे. चोवीस तास चालू असतो म्हटलं तरी वावगं होणार नाही इतका हा बाजार सळसळता आहे. आपल्या मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटची आठवण यावी असा. इथलंच एक नगीब महफूज़ नावाचं कॉफी शॉप फार प्रसिध्द आहे. मीना प्रभूंच्या इजिप्तायन मधे यांचा उल्लेख आहे.
जून्या भागातलं जूनं रेस्टॉरंट. नगीब महफूज़ हे नोबल पारितोषिक विजेते लेखक आहेत. त्यांच्या तारुण्यात ते बहुतेक वेळा इथेच येऊन लिहित बसायचे. त्यांचा सन्मान म्हणून रेस्टॉरंट मालकाने आता त्यांचंच नावं त्या कॉफी शॉपला कौतुकाने, आदराने दिलंय.
गेलो तर रेस्टॉरंट तुडूंब भरलेलं. वेटिंग होतं. बरेचसे मोठे ग्रुप्सही थांबले होते. आम्ही दोघीही तशाच थांबलो. आतली रंगारंग, सुवास आणि संगीतमय झलक बघूनच बाहेरच्या बाहेर जायला पाय निघेनात. १५ मिनिटात प्रवेश मिळालाच.
मंद उबदार उजेड, अरेबिक सजावट, सांताचही स्वागत झालेलं जाणवतच होतं. अरेबिक पेहरावातले मार्दवशील वेटर्स, शिशाचा मादक वास आणि धूरांच्या लोटात बाजूलाच गायक वाद्यांच्या जोडीने गातोय. सगळी गाणी वैयक्तिक आणि देशप्रेमाने ओथंबलेली. इजिप्तशियन, अरेबिक आणि सौदी भाषेतली. बहुतेक गाणी सगळ्या ग्राहकांना पाठ दिसताहेत. त्यामुळे सगळ्यांनी गाऊन आणि टाळ्या वाजवत, ठेका धरत साथ द्यायला सुरुवात केली आहे. पुरुष-स्त्रियांची सरमिसळच आहे. बहुतेक जणं कुटुंबाबरोबरच आलेले आहेत. देखणे पुरुष, सुंदर स्त्रिया, सगळेच जणं तयार होऊन आलेले. उत्तम खाणं, चहा-कॉफीपान आणि संगीताच्या तालावर मंदपणे लहरवत नेणारा शिशा म्हणजे हुक्का.
One of the best new year's celebration of my life.
कुठलाही गोंधळ, कोलाहल नाही. कर्कश्यपणा नाही.अलगदपणे जून्या वर्षाला निरोप आणि उबदारपणे नव्याचं स्वागत. इस्लामिक संस्कृती असली तरी महिलांमध्येही आदबशीर मोकळेपणा होता. हिजाबवाल्या, अंगभर कपडेवाल्या, आधुनिक वेषातल्या..काळे-सोनेरी, कुरळे-सरळ केसवाल्या सुंदर महिला मोकळेपणाने शिशा घेत गाण्यांना दाद देताना बघून मस्तच वाटलं.
नाही म्हटलं तरी आपल्या इथलं दारुमय-नाचमयचं सरसकट सेलेब्रेशन आठवलंच. आपल्या इथे धांगडधिंगायुक्त जल्लोष असतो तर इथे नगीब महफुज़मधे आदबशीर, नजाकतदार सादरीकरण आहे.
It just seeped in us very elegantly.
मस्त नजाकतदार स्वागत झालं नववर्षाच.
सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि खुषीतच परतलो.
रस्त्यांवर गर्दी. माणसांची, गाड्यांची. पण सगळीकडे फक्त आनंदी आणि उत्साही वातावरण. कुठेही दारुचा वास देखील आला नाही. पण हां, सिगारेटचा आणि शिशाचा उबदार धूर मात्र सगळीकडे सोबतीला होताच.
नव्याच्या स्वागतासाठी जून्या वर्षातली शेवटची खरेदी म्हणून लेकीने रंगबिरंगी सुवासिक धूप घेतला तर अस्मादिकांनी नेफ्रेतिती नावाचा सुरमा घेऊन अल् खलिली बाजाराला चारचांद लावले.
No comments:
Post a Comment