Monday, 14 January 2019

Egypt...13

थंडीने, वा-याने आणि मळभी धुक्याने कडाडलेल्या जून्या कैरोत आम्ही दोघी मायलेकी काल भरपूर फिरलो. जिद्दीने कैरोतला प्राचीन रस्ता मोइज् स्ट्रिटवर भटकलो. जगतविख्यात अल् हुसैनी, अल् अझार मशिदींजवळ असलेल्या खान अल् खलिली बाजारपेठेत हा गल्ली सदृश प्राचीन रस्ता आहे. आपल्या मुंबैतल्या भुलेश्वरसारखं इथे जंजाळ आहे गल्ल्यांच आणि दुकानांच आणि गर्दीचं. पण कालचा रविवार आणि हवामानाला बदल. रस्ते, गल्ल्या सामसूम. त्यामुळे प्रत्येकचं इमारतीचं देखणेपण, प्राचीनता नजरेत भरणारी. दगडी कमानी, छज्जे, कोरीव दरवाज्यांचा मागोवा घेत घेत आतपर्यंत गेलो तर एका ठिकाणी हे दृश्य दिसलं. आपल्याकडे सहसा जाऊ तिथल्या प्रांतांचे वैशिष्ट्यपूर्ण कपडे घालून फोटो काढून घ्यायची पर्यटकी हौस आहे. इथे चक्क साड्यांचा बाजार मांडला होता. एका साडीचे दोन तुकडे केल्यासारखी कापडं. तद्दन झगझगीत काठ-पदर असलेले. उत्साही इजिप्तशीयन तरुणी टाईट्सवरच ती जरतारी कापडं गुंडाळून, डोईवरनं पदर घेऊन, दागदागिने घालून, नाकात मोठाल्या कड्या अडकवून मुरकून, पोजेस देत फोटो काढून घेत होत्या. सगळे हावभाव, घुंगट बेमालूम आपले फिल्मी.
आम्ही मायलेकी अक्षरशः थक्क झालो हा इजिप्तशीयन तरुणाई वरचा बॉलीवूडीश चमत्कार आणि संस्कार बघून. एकजण जोधा, तर दुसरी मनकर्णिका, तर तिसरी पद्मीनी तर चौथी मस्तानी. भारतीय इतिहासात अजरामर झालेल्या या एके से एक धुरंधर ललनांच व्हाया बॉलीवूडच हे इजिप्तशीयन रुप या गारठ्यात देखील गुदगुल्या करुन गेलं.

No comments:

Post a Comment