Tuesday, 25 December 2018

RYE

आजपर्यंत रोटरी युथ एक्स्चेंज अंतर्गत घरी राहून गेलेल्या सगळ्या परदेशी मुलांना क्रिसमसच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. ही सगळी परदेशी तरुण मुलं सणासाठी म्हणून आपापल्या पालकांसोबत, कुटूंबियांसोबतच आहेत आज.

ही परदेशी मुलं भारतात दहा महिन्यांसाठी येतात तेव्हा जेमतेम १५-१६ वर्षांची असतात. पालक सोडून समस्त वडीलधा-यांना नावाने हाक मारायची तिथल्यासारखी आपली पध्दत नाही. पण या एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत तुम्ही त्या परदेशी मुलांचे १० महिन्यांसाठी आईबाबाचं असता. भारतात आल्यानंतर इथल्या सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक आणि इतरही धक्क्यांनी ही प्रचंड बावरलेली मुलं तुम्हाला आई म्हणायलाही कचरतात आणि नावाने हाक मारायला ही बिचकतात.
एका परक्या बाईला आई-मॉम म्हणताना एक प्रचंड घालमेलच ही मुलं अनुभवतात. बरं आपणही असे की इतक्या लहान मुलाने नावाने बोलावलं तरी आपणही बिचकणार. सगळं कळतं पण वळणं अवघड असतं. बिचकतच आई - मेधा अशी हाक मारणारी मुलं हळूहळू खुलत जातात. मनमोकळे करायला लागतात. तुमचं-आमचं करत, वाद घालत, समझदारी दाखवत का होत नाही पण एका क्षणी ही मुलं तुम्हाला मनापासून आई संबोधायला लागतात.
सततच आई..आई..करणारी तुमची स्वत:ची मुलं असली तरी या मुलांची ही हाक अक्षरशः जीव सुपा एवढा करुन जाते.

मुलं स्वगृही परततात. परतल्यानंतरचे चार-सहा महिने त्या मुलांना स्वत:च्या देशात सुध्दा फार कठीण जातात.
पण नंतर ही मुलं शिक्षणाच्या मागे लागतात, तरुण होतात आणि दोनेक वर्षांत आपापल्या आयुष्यात दंग होऊन जातात. मग वाढदिवस, क्रिसमसच्या शुभेच्छा एवढाच संवाद शिल्लक रहातो.

तरीपण आज देखील शुभेच्छांना रिप्लाय देताना आठवणीने या मुलांपैकी कुणी आई म्हणून एड्रेस केलं की मन पुन्हा एकदा सुपा एवढं होतं आणि एक बेमिसाल गिफ्ट आपल्यासाठी देखील या सांताक्लॅजने न विसरता आणलं या अपुर्वाईने मन मोहरुन जातं.🎅❤️

No comments:

Post a Comment