Sunday, 23 December 2018

घर घर पाण्याची.

काल स्वप्नात औरंगाबादला एवढ्यातच पण अवकाळी पाऊस पडला असं आलं. आज सकाळी उठून विचार करत बसले तर लक्षात आलं, काल पाण्याचा दिवस होता. खालच्या टाकीच्या जेमतेम तीनफूटसुध्दा पाणी काल नाही आलं. उदया टॅंकर बोलवायचा हे कालपासूनच मनात घोळत होतं.

इतक्यातच ऑस्ट्रेलियातला दिर्घ दौरा आटोपून घरी आले आहे. औरंगाबाद-मुंबई-पूणे करत पोहोचल्यानंतर येऊन पाहिलं तर घरात वापरातल्या पाण्याचा ठणठणात. वरची सोलार टाकीही रिकामी. वैतागून चरफडत पहिला फोन कूणाला केला असेल तर टॅंकरवाल्याला. पाणी येईस्तोवर तशीच बसून राहिले. तासाभरात टॅंकर आला. परतल्यानंतरची सहाशेची पहिली बिदागी त्याच्या हातावर टिकवली आणि उद्विग्नपणे रुटीन कामाला लागले.

बहुदा गेले पंचवीस वर्षं औरंगाबादला तीन दिवसा आड पाणी येतंय. त्या आधी एक दिवसा आड येत होतं. ७०-७५च्या काळात रोज तेही एक-दोन तासांसाठीच येत होतं बहुदा. आठवत नाही.
तर गेल्या पंचवीस वर्षांत देखील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी पाणी यायचं. वेगळी वेळ म्हणजे पहाटेचे चार ते रात्रीचे अकरा या वेळात ठरलेल्या प्रमाणे विभागवार पाणी यायचं. तेही दिड-दोन तास म्हणजे फार झालं. त्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकानुसार आपला दिनक्रम आखणं, तशा टाक्या, मोटरी वैयक्तिकपणे बसवून घेणं, अडचणीच्या वेळी एखाद्याला त्या वेळी घरात बसवून पाणी भरुन घेणं हे तमाम शहरवासीयांच्या इतकं अंगवळणी पडलं आहे की विनातक्रार या गोष्टी आम्ही सहन करत आलो आहोत.
एकतर उच्चभ्रू ठिकाणी जरा सैलसर आणि सोईचं वेळापत्रक असायचं आणि असतही. परत पाणी भरायला माणसं ठेवायचीही ऐपत असते अशा वसाहतींमध्ये. आणि अगदीच गेलाबाजार टॅंकर बोलवायची वेळ आलीच तर असली कामं करुन घेणारे नोकरचाकरही घरोघर असतात आणि महिन्यातले दोनेक हजार टॅंकरवर खर्च करणही परवडत असतं. मधल्यामध्ये मात्र कष्टक-यांच्या वसाहतीत, नव्याने डेव्हलप झालेल्या भागात, अपार्टमेंट्स ही पाणी टंचाई फार भीषण रुप धारण करते. विशेषतः फेब्रुवारी नंतर तर कहरच असतो.
या इतक्या निकडीच्या प्रश्नावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा असं एकाही राजकारण्याला वाटत नाही याचं नवल वाटतं.
आता तर नवल वाटण्यापलिकडे गोष्टी गेलेल्या आहेत. खरंतर रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता अशा सार्वजनिक गोष्टींमुळे हे राजकारणी आणि त्यांचे कुटुंबीय देखील भरडलेच जातात तरीपण यांना कशी जाग येत नाही याचा प्रचंड संताप येतो हल्ली.

ऑस्ट्रेलियातून आल्यावर तर मी हादरलेच. सध्या चक्क दर पाच दिवसांनीच पाणी येतयं, तेही असं अपूरं.
अख्ख आयुष्य पाणी हा विषय मॅनेज करण्यात चाललंय. रोजची स्तोत्र म्हणावीत तशी घरातल्यांना जाता येता पाणी कमी वापरायचे, सांभाळून वापरायचे सल्ले कम आदेश देणं चाललंय. घरकामवाल्यांकडे बारकाईने नजर ठेवावी लागत आहे. म्हणजे अक्षरशः ध्यानी मनी पाणी आणि पाणीच आहे. तरी अजून डिसेंबर देखील मावळायचा आहे. खरंच पुढचे चारसहा महिने कसे काढणार आपण ?
गरीब-टरीब गेले हो तेल लावत, माझं, आमचं, हिरण्यचं कसं होईल ही चिंता जीवाला घोर लावत आहे. घरी तरी दोन नाही चार टॅंकर बोलावता येतील. पण त्या हिरण्यच्या एकरी लॉन्स, ऐसपैस लावलेली, जगवलेली झाडं त्यांना या भयाण उन्हाळ्यात कसं जगवू, तगवू ? तिथला तर पसारा फारच मोठा आहे. असले पाच-दहा टॅंकर्स जरी बोलावले तरी किस झाड की पत्ती वाटेल अशी परिस्थिती. सगळीकडेच असा हाहा:कार असेल तर जिथे मुबलक पाणी आहे, जिथून हे टॅंकर्स पाणी भरतात ते पाणी तरी किती पुरणार आहे हो ?
म्हणजे गुलाबी थंडीची मजा घेतानाच येऊ घातलेल्या ऊन्हाळ्याच्या कल्पनेनेच अक्षरशः कापरं भरतंय. टुरिझमच्या ऐन बहारीच्या मोसमातच स्थानिक लोकं स्थलांतरीत होत असल्याच्या बातम्या थडकताहेत. जो तो पुणे-मुंबई आपलंसं करतोय.
चहुबाजूंनी येणा-या या अगडबंब रेट्याला ही महानगरं देखील किती पुरतील ?
विचार करता सर्वकष भयावह परिस्थिती जाणवायला लागते. माझ्यासारख्या सर्वसामान्य बाईला हे कळतंय तर मुरब्बी राजकारण्यांना, एॅडमिनिस्ट्रेशनला हे कळत नसावं का ? का सगळे कानाडोळा करताहेत या पाण्याच्या प्रश्नाकडे ?

ऑस्ट्रेलियात पंधराव्या दिवशीच लग्नाच्या भर मांडवात मला भारतातल्या आठवणीने अगदी गदगदून रडायला आलं होतं. आपलं गाव, आपले रस्ते, आपले बाजार, आपले लोकं..घरातली, घराबाहेरील, आपला परिसर, आपलं वातावरण, आपला गोंधळ, आपली बजबजपुरी..बरं-वाईट सगळं आठवून अगदी रडायलाच आलं. कधी परत येईन असं झालं. परत आले तर पहिलाच तडाखा पाण्याचा. नाही म्हटलं तरी आपली त्यांची तुलना झालीच सुरु मनात.

समुद्र किनारी वसलेल्या ऑस्ट्रेलियातल्या सिडनी या शहरी आणि इतरही किनारी महानगरात पाण्याचं सुरेख नियोजन आहे. घरोघर, दारोदारी भरपूर पाणी. कुठेही पाण्याचा अपव्यय नाही. पावसाचं पाणी देखील जमवून वापरलं जातं. इथले नियम पण फार चपखल आहेत आणि सगळ्यांकडनंच काटेकोरपणे पाळले जातात. एकूणच वेस्टर्न व पुढारलेल्या देशांत भरपूर टैक्स वसूल केला जातो. मग सर्विसेस पण तशाच जबरदस्त मिळतात. त्यातलीच एक प्राथमिक व अत्यंत निकडीची सोय म्हणजे पाणी. घरातल्या कुठल्याही नळाला येणारं पाणी पिण्या योग्यतेचच असतं. स्वैपाकघरातलं सिंक, दोन-चार बाथरुम्स, तेवढीच तिथली बेसीन्स, टॉयलेट पॉटस, डिशवॉशर, वॉशिंग मशीन, गार्डन वॉटर कनेक्शन, गराज कनेक्शन सगळीकडे नियमित, अखंडीत पाणी मिळतं. रोजच्या आंघोळीचं, बेसिनचं, वॉशिंग मशिनचं, डिशवॉशरचं आणि पावसाचं पाणी रिसायकलिंगला द्यावंच लागतं, न्यावंच लागतं. तशा सोई, पाईपलाईन्स बांधकाम करतानाच कराव्या लागतात. मग हे रिसायकल्ड पाणी गराजमधे गाड्या धुवायला, टॉयलेट्समधे वापरायला आपल्यापर्यंत पोहंचवलं जातं. हे प्रत्येकासाठी कंपल्सरीच आहे. नसता घर बांधायची परवानगीच मिळत नाही. म्हणजे बघा किती जपून आणि नियोजन करुन पाणी वापरलं जातं ते. लोकांनाही पाण्याचं महत्त्व कळतंय आणि सरकारही साथ देतय. खरोखर ऑस्ट्रेलीयातून आल्यावर पाच दिवसातून फक्त तासभर पाणी हा तमाशा पाहिला आणि आपण उगाच इथे परतलो असं वाटायला लागलं. बरं ही फुलप्रुफ सोय सगळीकडे. म्युझियम्सला जा, समुद्र किना-याला जा, थियेटर्सला जा ना निबीड जंगलात जा. पाणी आहे म्हणजे आहेच. किती सुखाचं आहे हे. नसता आपण ? बंगल्यात रहा का चाळीत रहा, पाण्याची तीच बोंब.
तरी औरंगाबाद जरा बरं आहे. खानदेशात तर आठ-आठ दिवसांनी पाणी येतं तेही कधीही आणि कमी वेळासाठी. पाणी येणारं म्हटलं की जणू काही देव अवतरणार अशी धांदल उडते सगळ्यांची.
विदेशी फिरलं की आपल्या देशातल्या संस्कृतीच्या, नैसर्गिक सौंदर्याच्या, व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टींचं महत्त्व फार जाणवतं. आपल्या वैभवशाली परंपरांचा अभिमानही वाटतो.
सगळी सुखं दारी आहेत पण हे पाण्याच्या दुर्भिक्षाचं आणि त्यासाठी समयोचित पावलं न उचलण्याचं फार मोठं गालबोटंच आहे या वैभवाला.

No comments:

Post a Comment