Friday, 21 December 2018

कजरारे..कजरारे...

काल एकीची चार्मिस क्रिमच्या बाटल्यांच्या डिझाईन, रंगसंगती आणि इतर आठवणीं बद्दलची पोस्ट वाचनात आली आणि लगेच पॉन्डसचा त्या काळच्या गुलाबी पावडरचा गुलबट-बदामी रंगाचा कार्डबोर्डने बनलेला गोल डबा आणि 'अफगाण स्नो' हे अनाकलनीय नाव असलेल्या कोल्ड क्रीमची जाहिरातही आठवली. तशीच सुलोचना या लोभस  अभिनेत्रीच्या घरंदाज अंदाजातली जीवनदया नेत्रप्रभा(?) नेत्रांजनाचीही ब्लॅक एॅंड व्हाईट जाहिरात आठवली.
खरंतर या विषयावर म्हणजे जूने चहाचे, साबणाचे टिनचे डबे यावर मलाही काहीतरी लिहावंस वाटलं पण तसंच राहून गेलं. आत्ताच ऑस्ट्रेलियातून मिंटचे झक्कास टिन डबे अक्षरशः जमा करुन, माग..मागून आणलेत. लिहीन यावरही एकदा.

तर आज स्नानानंतर बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदिक काजळ लावायला गेले तर कालच्या त्या पोस्टीमुळे लक्षात आलं की किती चुकीचं डिझाईन आहे या काजळडबीचे. मी फारच सातत्याने काजळ आणि लायनर वापरत असते त्यामुळे घर, हिरण्यचे वास्तव्य आणि बाकीची भटकंती करताना अडचण नको म्हणून काजळ आणि लायनर चे दोन-तीन सेट तयार असतात माझ्याकडे. तशी मी जाई काजळ भक्त. पण त्या हिरव्या डब्या प्रवासात, सामानाखाली पटकन टिचतात आणि भयानक रांडा करतात. आणि हिवाळ्यात हे काजळ जास्तच गोठतं आणि उन्हाळ्यात जरा अतिच पाघळतं.
So at times it gets difficult to handle.
मग त्यावर उपाय म्हणून आयटेक्स, शृंगारच्या काजळ डब्या हाताशी ठेवायच्या. शहनाझची काजळडबी बहुदा नसावी. पण एवढ्यातच बालाजी तांबे यांची बरीच महागडी काजळडबी आणली आहे. हे काजळ अतिशय उत्तम आहे. मस्त व्हिस्कोसिटी असलेलं काळंभोर काजळ झकासपणे डोळे उठावदार करतं आणि गारवा पण देतं.
डोळ्यांसाठीही उत्तमच असावं. पण डबीचं डिझाईन मात्र चुकीचं आहे. एकतर बरीचशी उभट डबी, त्यात खोल काजळ. बोटावर काजळाचे वेढे घेताना हमखास नखंच भरतं काजळानी. प्रत्येक वेळेसच हे जाणवतं. बोट केसांना पुसलं जातं पण नखातलं काजळ दिवसभर खुणावत रहातं. त्यामुळे या प्रिमियम प्रॉडक्टपूढे ती गेलाबाजार जाई काजळाच्या पसरट डबीचं डिझाईन जास्त युजर फ्रेंडली आणि एॅप्ट आहे.

कदाचित तांबे ग्रुपला ही गोष्ट कोणी निदर्शनास आजपर्यंत आणून दिली नसेल. आणि इतके बारकावे रोज वापरणा-यालाच कळत असावेत. तर बालाजी तांबे ग्रुपने या काजळडबीचं डिझाईन मॉडिफाय केल्यास नक्कीच बरं होईल.

स्मिता थोरात..बघ तुझ्या पोस्टमुळे या लिखाणाला निमित्त मिळालं.

No comments:

Post a Comment