Friday, 21 December 2018

मार्जारानुभव.

अस्मादिकांच्या घरापासून दूर असण्याच्या दिर्घ कालावधीत दोन्ही मुलांनी कुठलं सत्कर्म केलं असेल तर घरामधे कॅटफूडचा लंगर सुरु केला.

का कुणास ठावूक या घराला मांजरींचा वरदहस्तच आहे. रहायला आलो तेव्हा एक तिन लेकरांची आई होतीच. तिचं खनपटीचं पोट आणि दूध पिती लेकरं बघून तिला सांभाळलं. त्यातलं एक काळं पिल्लू भलतचं कुपोषित होतं. लेकीचा जीव त्यावरचं जडला. पण लेक सतत पुणे-औरंगाबाद जाऊन येऊन करणारी त्यामुळे एक गुटगुटीत पोरं आमच्या पदरात घालून काळ्यासहच्या इतर पिल्लांबरोबर मार्जार आईने पोबारा केला. मग काय येता-जाता याचेच लाड. तशी अधूनमधून हिरण्यची श्वानंही असतातच घरी. पण ती नसली की सगळा प्रेमरुपी शॉवर या पिल्लावर. काळ्या कुपोषिताची हळवी आठवण काढायची आणि याला भरमसाठ खायला स्वहस्ते द्यायचं हा मुलांचा खाक्या. बरं नुस्त दूध तरी चालेल का ? तर नाही. त्याला भुक असो वा नसो दोनेक मूठ कॅटफूड दिलच पाहिजे हा अट्टाहास. खाऊन, खाऊन पिल्लू थोराडपणेच वाढलं. पोटभरलं की ते त्या दूधाकडे, फूडकडे ढुंकून बघायचं नाही. (कळलं ना मांजरी सडपातळ आणि चपळ का असतात ते !) मग ते व्हरांड्यात ठेवलेल्या कॅटफूडचा सुगावा लागला की ते खायला बाकीचे मांजरं, एकमेकांचे हाडवैरी असलेले बोकेही यायला लागले, आसपास घुटमळायला लागले. आयतं रुचकर फूड कुणाला नको असतं हो. मग काय हा बेरक्या, तो गब्दुल्या, ती भुरकी, ही राखाडी अशी एकेकाची नामकरणं करत घरात त्यांच्या विषयीच चर्चा झडायला लागल्या.
मला तर लेकरांपेक्षा मांजरच उदंड झाल्यासारखी वाटायला लागली. झाली मुलांची सकाळ की झर्रकीनी एखादं भांड घ्यायचं आणि द्यायचं बचकाभर फूड त्यांना. स्वच्छतेच्या नावाने कितीही अरे..अरे केलं तरी मुलांचं अतिरेकी मार्जारप्रेम कमीच होईना.
मग झाली त्यावरुन बाचाबाची की आई तुला माणूसकी नाही असा दे माय धरणी ठायवाला जहरी डायलॉग पदरात टाकून मुलं मोकळी होतात आणि आता काही मांजरींमूळेच आपलं घरटं मोडीत निघते का काय असं वाटायची वेळ येते अस्मादिकांवर.

तर माझ्या एवढ्यातल्या दिर्घ गैरहजेरीचा फायदा घेत दोन्ही मुलांनी कॅटफूड नामक पौष्टिक अनलिमिटेड शिध्यावर मांजरींचा अख्खा ताफा सांभाळला आहे. भरीस भर एक हाडकळलेली श्वान आई आणि तिचं त्याहून कुपोषित पिल्लूही हल्ली हजेरी लावून चाललं आहे.

तर कालच मुलं दोनेक दिवसांसाठी पुण्याला गेली आहेत. आज थंडी जरा कमी आहे. उबदार उन्हासाठी दरवाजा उघडा ठेवून अस्मादिक वाफाळत्या चहाबरोबर सोशल मिडिया वर हजेरी लावताहेत तर दरेक १०-१५ मिनिटांनी एकेक मांजर डोकावून जात आहे. रिकामं भांड बघून खट्टू होताहेत आणि माझ्याकडे अशोकवनातल्या सीतेचं रक्षण करणा-या राक्षसिणींकडे भेदरुन आणि भयचकीत नजरेनं बघावं तसा एक कटाक्ष टाकून निघून जात आहेत.
अस्मादिकांना हसावं का रडावं कळेना झालयं. एकीकडे मार्जारांवरच्या स्वत:च्या दरा-याचं कौतुकही वाटतंय तर दुसरीकडे त्यांची हिवाळी भूक, मुलांचा त्यांच्या प्रतीचा कळवळाही गलबलून टाकतोय.

No comments:

Post a Comment