एक स्केच स्वत:चं काढून घेताना.
दोघं-तिघं मालती आर्ट गॅलरीच्या ओपन आर्ट गॅलरीत बसून गप्पा ठोकतोय. शिरस्त्याप्रमाणे स्केच काढायचं ठरतं. अस्मादिकांनाच बसवलं जातं मॉडेल म्हणून.
सुरवातीला चित्रकार आणि मॉडेल पोजला आणि स्केचिंगला अडथळा न होईल अशा चित्रांसंबधीतल्याच गप्पा मारताहेत.
हळूहळू चित्रकार रेषांमधेच गुरफटत निशब्द होत जातो आणि मॉडेल समोरच्या रस्त्यावरचं दृश्य टिपून मनातल्या मनात ते शब्दबद्ध करत स्वमग्न होऊन जाते.
ढगांच चिंधूकही नसलेलं मावळतीचं मुचूळ निळं आकाश. गारठ्यामुळे वाराही आडोश्याला गेल्यासारखा. अंधारही चोर पावलाने दबकत येणारा.
गारठ्याची धास्ती घेतलेला पण वाहता रस्ता.
समोरच एका सुमार इमारतीतलं फुटकळ दुकान. मल्टी सर्विसेस देणारं. ही लंबीचौडी लिस्ट काय काय सर्विसेस मिळतील याची. गि-हाईकांना आकर्षित करायला चौफेर पाट्या लावून ठेवल्यात. जणू काही अक्षरांच्या मुंडावळ्याच. दुकानात जेमतेम एकदोघं जणं. ही असली दुकानं खरंतर सकाळीच चालतात. तिन्हीसांजेला कोण फिरकत असेल कोण जाणे. त्यात हा आजचा रेकॉर्ड तोड गारठा.
जो तो शाली, मफलर, जॅकेट्स आणि स्वेटर्समधे. भराभर स्कुटीज्, बाइकर्स आणि चारचाकी जाताहेत. कुणाच्याही गावी नाहीये की इथे बाजूलाच एका शुभ्र कागदावर सरसर रेषा उमटताहेत ते.
चित्रकार आपल्यातच दंग. बघणं, टिपणं, रेषांनी उतरवणं आणि पुन्हा पुन्हा डोळे बारीक करुन रेखाटन अजमावणं.
He is lost in his own world.
ते पहा तो मल्टिसर्विसवाला लाईट लावून दुकानाचे बाहेरचे सगळे लाईट लागलेत का नाही हे बघायला बाहेर आलाय. बहुदा एक-दोन बल्बज उडालेलेच दिसताहेत. या दुकानाचं रंगरुप आणि दुकानदाराची बॉडी लॅंग्वेज बघून ही दुकानदारी आतबट्ट्याचीच वाटत आहे.
बघा, आता आहे का काही देणं घेणं आपलं त्याच्याशी. उगा आपलं वाहते चिंता जगाची.
अरे बापरे, स्केचमधे चिंताग्रस्त आठ्या पण येतील आता.
फिक्कन हसू आलं.
मॅडम..हलू नका. मी डोळे काढतोय.
डोळे, शरीर पुन्हा स्थिर.
हे बघा या पन्नाशी पुढच्या महिला. साताठ जणींचा घोळका. चारपूढे, तीन मागे. एकजात वजनानी मुसमुसलेल्या. एक डाव्या पायानी लंगडते आहे तर दूसरी उजवीने. एकीचे नैसर्गिक रुपेरी केस चमकताहेत तर एकीने रंगलेपन थांबवलय असं दिसतंय तर एकीचं सफाईने रंगवलेलं काळंभोर पोनीटेल टणटण उडतंय. इथे कागदावर पांढ-यावर काय काळंनिळं होतंय हे यांच्याही गावी नाही. नक्कीच या ४ ते ६ ची भिशी उरकून घरी परतताहेत. भरल्यापोटी गप्पांना तुफान रंग चढलाय.
हा छोकरा आपल्या कडेवरच्या बहिणीला स्केच दाखवतोय. साताठ महिन्याचं लेकरु सगळ्याच गोष्टी डोळे विस्फारुन बघतंय. स्केचिंगच म्हणून विशेष कौतुक नाही. त्याचे पालक दूरुनच स्केचिंग न्याहाळत आहेत.
संपलं स्केचिंग.
छान..छान..सगळ्यांचं एकमत.
तुम्ही छान, तुमचं चित्र छान.
चित्रकारानी पेन्सिलला आठवत नाईलाजाने पेनने स्केच केलयं. तेवढ्यात त्या मुलाच्या मावशीचं स्केच करायची टूम निघते. काळ्याभोर, टपो-या, बोलक्या डोळ्यांची तरुण महिला. पण मग तिची आईचं तयार होते स्केच करुन घ्यायला.
जेमतेम पन्नाशीची खुटखुटीत महिला. शिसवी रंगाची, काळे केस, गडद निळी साडी-ब्लाऊज, ठसठशीत मरुन कुंकू, सरळ नाक, चिरीसारखे डोळे आणि प्रसन्न, शुभ्र, रुंद हसू. उत्साहाने बसली आहे.
एक झकासच घनता आहे हिच्या चेह-यात आणि एकूणच रंगसंगतीत आणि व्यक्तिमत्वात लोभसपणा पण.
She is a perfect model for the portrait in oil colours. चमकदार गडद रंगात झकासच दिसेल हिचं पोर्ट्रेट.
तिचही स्केच झालं पण कॅरेक्टर रेषांमधून निसटलं. माझ्यामते. क्रियेटीव्ह स्केचेस-पोर्ट्रेटस् जरुर करावीत, असावीत पण रिझेंब्लन्स कुठेतरी डोकावला पाहिजे. प्रत्येकाच्या चेह-यावर एक कळीचं कॅरेक्टर असतंच, ते पकडता आलं पाहिजे. स्ट्रोक्स कसेही आणि कशाचेही असु देत.
असो. खयाल अपने, अपने.
पण एकूणातचं आजचा ऑस्ट्रेलियानंतरचा पहिला आर्टी डोस पथ्यावर पडला.
जवळच्याच टुट्या-फुट्या, गचाळ बाजारात जाऊन आले. सगळा कारभार भोंगळ, अस्ताव्यस्त आणि बजबजीत तरीही उब जाणवली. In fact हायसंच वाटलं.
So, at last a safe and sound landing from Australia.
No comments:
Post a Comment