Wednesday, 19 December 2018

अपना बाजार

ओ..म्याडम..कुठं ती गाडी इथं लावता माझ्या पथारी समोर ?
गि-हाईक यायची वेळ झाली नव्हं, लावा ती स्कुटर तिकडं.

ताई..घ्या..मस्त लालजर्द गाजरं, साखरेवानी गोड मटारं..या..खाऊन तं बघा.

पेरु घ्या म्याडम..
अहो नको.
अहो घ्या, लई गोड आहे..या..यक फोड खाऊन तं बघा नुस्ती.
अहो..नको. इतक्या सकाळी पेरु तोही इतक्या गारठ्यात ? नको रे देवा.
आवो फोड तं खावा, नका पेरु घेऊ. आन यका फोडीनं काय होतं नाय म्याडम. घ्या...
पेरु..प्लिज नको हो.
बरं -हायलं, तुमची मर्जी.

अरे वा..वा..ताई लगी फारंच दिवसांनी दिसू -हायल्यात ! आन मी वळखलंच न्हाई तुम्हाला आदी. ते आज तुम्ही डोक्याला फडकं बांधून आल्या म्हनून वळखूच आल्या न्हाईत. लईच हिवं पडलं हो यंदा. बरं हाय पन. पावसाचा छान पडला पन हिवाळा बेतशीर हाय यंदा. या ताई..घ्या, हिवाळ्याचा बाजार लगी टच्च भरलाय. मटार, गाजरं, भेंडी, फ्लॉवर, वांगी, लिंबू-मिर्ची-अद्रक..बोला काय द्यू ?
तुमच्यासाठी समदं ५ रुपये स्वस्त, आज लई दिसानं आल्यात ताई.

ताई मटार घ्या. पन्नासनं लावली, पन तुमच्यासाठी चाळीस. बोला करु शंभराची अडीच किलो ?
विचार नका करु. लगी घेऊनच टाका. साखरंसारखी गोड हाये मटार.बसल्या बसल्या अर्धा किलो खाईल यखादा.

झाडून सगळे भाजीवाले उन्नीस-बीस फरकानी अशाच अगत्यानी विक्री करणारे. व्यवसायामुळे तोंडांत साखर असणं अपरिहार्य असलं तरी जुजबी का होत नाही पण इतकी आत्मिय देवाण घेवाण बघून, अनुभवून दिलको सच्ची में सुकून मिला.

ऑस्ट्रेलियातून आल्यापासून पहिल्यांदाच या नियमितच्या बाजारात डोकावले.

कुठे ते ऑस्ट्रेलियातले चकाचक, निशब्द, गंभीर आणि प्लास्टीकबंद भाजीबाजार कम टोलेजंग मॉल्स आणि कुठे हे आपले रस्त्याच्या बाजूला थाटलेले, धुळीने भरलेले पण रसरशीत व आत्मियतेने ओथंबलेले टिचभर भाजी बाजार ?

ताई-दादा-मावशी-काका-म्याडमचे ह्रद्य हाकारे आणि आपल्याच घामाने वावरात रुजवलेल्या, निगुतीने वाढविलेल्या भाजीपाल्याची रसभरीत कौतुकभरी वर्णनं...
Aha ! The entire scene so adorable and easily connectable !

❤️youindia!

No comments:

Post a Comment