आंतरराष्ट्रीय चहा दिनाचं पुराण संपलं असेल असं गृहीत धरुन एक गोष्ट सांगते.
या थंडीचं ना काही तंत्रंच कळत नाही. आज आहे तर उद्या नाही. रात्री गुलाबी तर सकाळी कडाका. कसं मॅनेज करावं माणसानी ?
बरं सकाळचा कडाकाही असला असतो ना की भले दोनेक टेले चहाचे रिचवले तरी पोटातल्या भुकेची भगभग काही थांबतच नाही. उलट त्या चहाने अजूनच भडकते हो भूक.
आता घरातल्या सगळ्यांचं रितसर बघता-करता बाईच्या जीवाला कुठे चैन असते हो?
आपल्याला कोणी बस म्हणत नाही का दमलीस का, खाल्लस का म्हणून विचारत नाही.
म्हणजे स्वामीनी अख्ख्या स्वैपाकघराची उपाशीच !
शेवटी सकाळच्या रामरगाड्यात भूक असह्य झाली की आपणच आपली खिंड लढवायची.
त्या नजाकती चहाचे चोचले बाजूला ठेवायचे आणि फिफ्टी-फिफ्टी दूध-पाणी गॅसवर खळखळायला ठेवायचं. सढळ हस्ते साखर आणि चहा पावडर टाकायची, कणभर वेलदोडा टाकायचा आणि दाटहोईस्तवर चहा उकळू द्यायचा आणि लगेच गाळायचा. हाताशी असलेल्या चारदोन ब्रेड स्लाइसेस लगे हाथ घेऊन गुमानी बसायचं हादडायला. कुणाचीही पर्वा न करता आपली भुक शमवावी आणि थंडीतला गरम चहाब्रेडचा आनंद लुटावा.
वाफाळत्या स्ट्रॉंग चहात दुमडलेला ब्रेड सचैलपणे अर्धा बुडवावा आणि लगेच कपातून वर काढून थोडीशी फुंकर मारत झपकीनी तोंडांत टाकावा. अ..हा..हा...काय मदहोशी चव लागते या चहा-ब्रेडची या गारठ्यात. पोटातले कावळे तर अजूनच चारचांद लावतात हो या चवीला.
आता भुकेजलं असताना असं बकाबका खाताना होते म्हणा थोडी गडबड. कधीतरी गरम चहाब्रेडने जीभ पोळते तर कधी तो भिजलेला, जडावलेला गरम ब्रेड टपकीनी अंगावर पडतो. पण आपल्याकडे कुणी बघत नाही हे चतुराईने टिपायचं आणि बेफिकीरीने पुढचा ब्रेड चहात बुडवायचा.
(होनं, आपल्या घरात आपल्यालाच चोरी ! )
ब्रेड कितीवेळ चहात बुडवायचा यांचंही तंत्रज्ञ असतं म्हटलं. पण सरावानी सगळं जमतं बरका.
पण एक नक्की, अख्खा चहा कधीच या ब्रेड बुडवा-बुडवीमधे संपवायचा नाही हं.
चहाचे निदान दोनेक घोट शिल्लक राहिलेच पाहिजेत शेवटी आचमनासारखे घ्यायला.
काय झक्कास लागतो हा ब्रेड बुडवून दाटसर झालेला चहा.
अगदी अमृताहून गोड हा चहाब्रेड लागतो बरं का !
No comments:
Post a Comment