आज केर्नसमधला शेवटचा दिवस. दूपारी निघायचय. फ्लाईट म्हणजे अजूनच दोनतास हातात कमी. सकाळीच केर्नस बॉटनिकल गार्डनमधे गेलो. आधीच सगळा जंगलाचा परिसर त्यात पुन्हा बॉटनिकल गार्डन त्यामुळे आरक्षीत असा सुरेखच तुडूंब हिरवागार परिसर. तोही लंबा चौडा रस्त्याच्या दुतर्फा पसरलेला. कमी वेळात नुसतं नजरेखालून घालणंही अशक्य होतं, तरी कंझर्वैटरीत पहिलं पाऊल ठेवलं. सुरेख ऑर्किड्स, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचं वैशिष्ट्य असलेले अनेक अनोखी झाडं-फुलं, फुलपाखरं. नजर हरखून जाईल इतकं तजेलदार, रंगीत आणि सुवासिक दृश्य. कितीही फोटो काढले तरी झाडाझुडपांचही वैविध्य संपेना आमचंही मन भरेना. असाच दिशांचा मागोवा घेत, अनोखी फुलं बघत निघालो आणि पोहोंचलो तो गार्डन मधल्याच एका आर्ट गॅलरीत. पुर्वी इथे ऑईल, डिझेलचं स्टेशन होतं. त्यामुळे इथले पत्ते पण टॅंक १,२,३..असे आहेत. तर अशाच एका भव्य गोलाकार टॅंकमधे गॅलरी थाटली आहेत. जवळपासच्याच एका चित्रकाराचं प्रदर्शन चालू होतं. महाराष्ट्रात सध्या पेव फुटलेल्या स्टाईलमधली इथली चित्र बघून आश्चर्य वाटलं. इथे इतर आर्ट फॉर्मचीही बरीच वर्कशॉप्स होतं असतात. गर्द झाडीत लपलेली ही गॅलरी बघताक्षणीच आवडून गेली. गॅलरी समोर चक्क भारतीय पदार्थांचा स्टॉल. चक्क पुरी भाजी, पकोड्यांच आमिष आणि बुरी नजरवाले तेरा मुहं कालाची कोपरखळी पण. पण हाय ! स्टॉल बंद होता.
इथल्या प्रचंड महाकाय पारंब्या असलेल्या झाडातून झिरपणा-या उन्हात बरेच फोटो काढले आणि नाईलाजाने पण घाईनेच गावातल्या रस्टीज् मार्केटकडे पळालो.
आडबाजूला जायचं आणि तिथला आठवडी बाजार न बघता येणं अस्मादिकांना अशक्य आहे. अडीच-तिन दिवसांचा हा रस्टीज् विकेंड बाजार, भलताच रसरसलेला निघाला. भाजी-पाला-फळं, कपडालत्ता, फुलं-पानं, शोच्या वस्तू..दुनियेभरच्या वस्तू इथे विक्रीला. भरपूर नाही पण ब-यापैकी कलकलाट असलेला हा बाजार सगळ्यांनाच भावला. सगळी फळं चाखून बघायची आणि मगच घ्यायची. क्राफ्टी गोष्टीही भरपूर होत्या. कुरांदात शिल्लक राहिलेलं खरेदीचा काम इथे पुर्ण केलं. थाई, चिनी, मलेशियन, फिलिपिनो लोकांची भरपूर दूकानं आहेत इथे. वेळ आणि वजनाचा धाक होता नसता मनसोक्त खरेदी करायला, केर्न्सच लोकजीवन समजून घ्यायला ही परफेक्ट जागा आहे.
घड्याळ बघत धावतपळत आमचं अपार्टमेंट गाठलं, सामान उचललं आणि एयरपोर्ट गाठला.
केर्न्स. इथे जे काही पाहिलं ते सगळं अद्भुत होतं, जीवाला भावणारं होतं, मनाला ढवळून काढणारं होतं. पण हेही खरं की जे पाहिलं ते फक्त चाटवण होतं. मनभरुन जर इथली ठिकाणं पहायची असतील तर प्रत्येकच ठिकाणी निदान चारदोन दिवस रहायला पाहिजे. अगदी महिनाभर जरी राहिलात तरी इथलं नैसर्गिक वैविध्य न संपणारं आहे.
खरोखर जीव रिझवायला, या भुमातेशी, स्वतःशी कनेक्ट व्हायला निसर्गासारखी उत्तम जागा नाही आणि निसर्गाशिवाय पर्यायही नाही.
Cairns stole my heart ! ❤️
No comments:
Post a Comment