कालचा कुरांदाचा अनुभव बघता, पुनः पुन्हा ग्रेट बॅरियर रिफ आठवायला लागली. पुन्हा तिथेच जावेसे वाटायला लागले तरी बस आली आणि निघालोच डेंट्री रेन फॉरेस्ट कडे. आजच्या टूरबरोबर मार्क नावाचा उत्साही ड्रायव्हर कम गाईड. सगळ्या इतर सहप्रवाश्यांची ओळख करुन दिली आणि अखंडपणे आसपासच्या झाडाझुडुपांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची, इथल्या शेतपिकांची, राहणीमानाची सद्य परिस्थिती, इतिहासाची इतकी मनलावून आणि सलगपणे माहिती हा माणूस सांगत होता की त्याच्या स्टॅमिन्याचीच कमाल वाटतं होती. भरपूर जनरल नॉलेज असलेला बडबडा, उत्साही आणि तरतरीत मार्क सगळ्यांनाच आवडला. रस्ता तोच केर्न्सच्या उत्तरेकडचा तरी देखील वैविध्यपूर्ण झाडा फुलांनी नटलेला. प्रत्येक वळणावर नाविन्यपूर्ण झाडं आणि प्रत्येक थांब्यावर नवलाईचीच फुलं स्वागताला होती म्हटलं तरी वावगं होणार नाही.
एका ठिकाणी थांबून आम्हाला बोटीत बसवण्यात आलं आणि तिथल्या एका नदीत फिरवण्यात आलं. या नदीत भरपूर मगरी आहेत. नैसर्गिक अवस्थेत या मगरी पहाण्यासाठी बराच आटापिटा करावा लागला. पण या बोटीवरचाही चालक कम गाईड इतकी अभ्यासपूर्ण माहिती पूरवत होता की निसर्गाची, त्या साखळीची किमया फार अपुर्वाईची वाटत राहीली. झाडांची मुळं, पानं, फुलं, फळं आणि त्यावर जगणारे किडे-मकोडे, पक्षी-पाखरं-प्राणी, त्या सर्वांच या जीवनसाखळीतलं योगदान आणि महत्व इतकं छानपणे ही मंडळी समजावून देत होती ना की क्षणभर आपणच या निसर्गात उपरे आहोत हे जाणवलं. निरभ्र निळं आभाळ, निरव परिसर आणि स्वच्छ नदी या समजूतदार अनुभवाला चारचांद लावत होती.
हा प्रवास संपला की परत बसमधून जंगलात निघालो. या पूर्ण प्रवासात डेस्टिनेशन महत्वाचं नसून अख्खा प्रवासच अनोख्या आणि अचंबित करणा-या गोष्टींनी भरलेला होता.
आत्तापर्यंत इथली बरीच झाडंझुडपं भारतीय उपखंडाशी नातं सांगणारी होती, पण या डेंट्री जंगलातली सगळीच जीवसृष्टी पुर्णतः वेगळी होती. नावं तरी कशा कशाची विचारणार आणि लक्षात तरी कीती ठेवणार हो ? तरी पण अस्मादिकांचा चौकसपणा बघून मार्कसाहेबांनी आम्हाला बॉस ही पदवी बहाल केली.
झक्कास हिरवगार, घनदाट, दमट वासाचं उबदार आणि निर्मनुष्य जीतं जागतं जंगलं.
उंचच उंच सरळसोट वाढलेली झाडं-वेली, वरच्यावर एकमेकांत गुंफून सुर्यकिरणं पिणारा त्यांचा पर्णपिसारा आणि त्या सळसळत्या डोला-यात घुमणा-या चित्तार्षक पंक्ष्यांच्या अविट शिळा...
एखाद्या सुरम्य स्वप्नदृश्याचा भाग वाटावा असा हा अनुभव. या घनदाटतेतून अक्षरशः पाऊल निघत नाही. पण परत वेळेचा तगादा होताच मागे.
मध्य जंगलातच एका गोजिरवाण्या ठिकाणी लंचब्रेक घेतला. मार्क आता झटपट होस्टच्या भुमिकेत शिरला. आपल्या ग्रुपसाठी फटाफट टेबलं-बुफे लावणं, व्हेजवाल्यासाठी विषेश दक्ष असणं आणि हे करताना आपलंही जेवण चटकीनी उरकणं. मार्कला याहीसाठी पैकीच्या पैकी मार्कस. जवळच कांगारुंसारखे वालाबीज हे प्राणी होते. त्यांना स्वत:च्या हाताने गाजर खाऊ घालून आनंद लुटण्याचा एक कार्यक्रम साजरा झाला.
इथेच तुरुतुरु फिरणा-या मुंग्यांची रांग मार्कला दिसली. लगेच एक मुंगी चिमटीत पकडून त्यानी एका सहप्रवाशाला चाटवली. मलाही दिली.
अक्षरशः सिट्रिक एॅसिडच्या चवीची लागली ती मुंगी जिभेला.
खरंच जाणकार कंपनी असेल तर प्रवासात फार गहिरी मौज येते नाही ?
जवळंच पिंज-यात रंगबिरंगी पोपट आणि इतर पक्षी कर्कश्य ओरडत होते. इतक्या रसरसलेल्या जंगलात देखील त्यांना ही पिंजरा रुपी काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली पाहून वाईटच वाटले.
इथून निघालो ते जंगलातच पण एक उद्योजक महिला ताजी फळं वापरुन आईस्क्रीम्स बनवतात आणि विकतात त्या ठिकाणी गेलो.
तद्दन बेकार आईस्क्रीम आणि कमर्शियल प्लेस.
पण इथल्या चहुबाजूंनी गराडा घालणारा फ्लोरा फौना सगळं माफ करायला लावतो.
परतीच्या वाटेवर एक लहानसा बिच दाखवायचा कार्यक्रम होता. पण आम्ही बिचच्या नादी न लागता दहा मिनिटं जंगलंच धुंडाळत बसलो. या समुद्र किनारीच्या जंगलात भरपूर वेली होत्या. वेली म्हणजे वळणदार उंचच उंच गेलेली झाडंच. काय सुरेख लयदार वळणांच्या वेली होत्या त्या. काय त्यांचा तो गुंता, काय ते झोकदारपणे इकडून तिकडे वाढणं, झाडांना विळखा घालणं. खाली या वेलींचं मोह पाडणारं जाळं तर वरुन पाखरांच्या अनवट शिळांची हूल.
बस्स! इथे फक्त एका आराम खुर्चीत शांतपणे डोळे मिटून बसून रहावं आणि हे जंगल छाती भरुन सुंगाव, कान एकवटून ऐकावं. छातीभरुन या जिवंत हिरवेपणाचा वास अंगात भिनवावा.
काहीही हालचाल करु नये. बसू द्यावीत ती पाखरं डोक्यावर, वाढू द्याव्यात या वेली अंगाखांद्यावर, इथेच होऊ द्यावी माती या शरीराची,
रुजावं परत एकदा आणि व्हावं एखादं डौलदार झाड इथलंच.
खरोखर इथनं पाऊल निघत नाहीये.
हिप्नोटाईज केलंय या बेमिसाल जंगलानी, या अलौकिक निसर्गरुपानी.
पण..निघालो.
असल्या धावत्या भेटी म्हणजे अन्यायच आहे. स्वतःवर आणि जंगलावर पण.
जाताना आम्ही दोघंही मार्क शेजारी समोरच बसलो. आता अखंड चौकश्या माझ्या. हे झाड कोणतं, याचं नाव काय..वगैरे..वगैरे. अथकपणे साठीपूढचा मार्क उत्साहाने उत्तरं देतोय. उदया थांबणार असाल तर सांगा परत तुम्हाला जंगलात आणतो, अजून माहिती सांगतो..इति मार्क.
कसं थांबणार ? उदया सिडनीला परतायचं आहे.
रस्त्यातच मार्कने सर्रकन गाडी थांबवली. उतरा म्हणाला. एका झाडावर एकाच जातीच्या पक्ष्यांची हजारोंनी घरटी होती. तिन्हीसांजा झालेल्या. झाड पक्ष्यांनी गच्च भरलेलं. अखंड कलकलाट चालू होता. एखादा निसर्गप्रेमीच अशा गोष्टी दाखवू जाणे.
इथून निघाल्यावर परत एकदा एका मैदानावरचे वालाबीज-कांगारु ऑन डिमांड बघण्यासाठी मार्कने गाडी थांबवायचं सौजन्य दाखवलं. हा खरा निसर्गप्रेमी.
मार्कचे आभार मानावे तितके थोडेच होते.
कदाचित मार्क शिवाय या जंगलाशी इतका ह्रद्य संवाद साधणं अशक्य होतं !
No comments:
Post a Comment